सोनेरी अनुभूती देणारा ‘काकस्पर्श’ Print

altप्रतिनिधी
altकलाकाराच्या आयुष्यात त्याच्या स्वतच्या कलेबद्दल समाधान मिळवून देणारा प्रसंग फार क्वचितच येतो. दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता महेश मांजरेकर यांना हा सोनेरी क्षण दिला तो ‘काकस्पर्श’ या त्यांच्या आगामी चित्रपटाने. त्याबद्दल त्यांनी  ‘रविवार वृत्तान्त’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या..
कोकणातलं एक गाव. त्या गावातला वाडा. त्या वाडय़ात राहणारं कर्मठ ब्राह्मण कुटुंब आणि त्यांचा इतिहास.. श्री. ना. पेंडसे, गो. नी. दांडेकर, जयवंत दळवी अशा लेखकांच्या काही कादंबऱ्यांतून हाताळला गेलेला हा विषय. पण या विषयातूनही अतिशय नावीन्यपूर्ण कथानक एका कथेतून मांडलं जातं आणि ती कथा नाटय़रूपात सादर होते. त्याहीपुढे जाऊन एखादा कलाकार ते नाटक किंवा कथा न वाचताच केवळ ती कथा ऐकून त्या कथेच्या प्रेमात पडतो. त्यावरच न थांबता आपल्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा असा एक चित्रपट तयार करतो.
कोणत्याही कलाकाराच्या आयुष्यात असा भाग्ययोग एकदाच येतो. महेश मांजरेकर यांच्या आयुष्यात हा भाग्ययोग येण्यासाठी तब्बल २०-२५ र्वष जावी लागली. यासाठी कारणीभूत ठरला महेश मांजरेकर यांचा जवळचा मित्र सचिन खेडेकर! एका दिवाळी अंकात उषा दातार यांची एक कथा प्रसिद्ध झाली होती. त्या कथेवर नंतर नाटकही करण्यात आलं. पाच वर्षांपूर्वी सचिन खेडेकरने ही कथा वाचली आणि त्या कथेत तो गुरफटला. त्यानंतर दीड-दोन वर्षांनी ती कथा त्याने महेश मांजरेकर यांना ऐकवली. ती कथा ऐकली आणि हा अतिशय मौल्यवान ऐवज आहे, हे माझ्या लक्षात आलं असं महेश मांजरेकर यांनी सांगितलं.
ही कथा ऐकल्यानंतर माझ्या मनात सतत ती कथाच रुळत होती. या कथेत जाणवलेली मुख्य गोष्ट म्हणजे या कथेत दडलेली प्रेमकहाणी. ही प्रेमकहाणी बाजीराव-मस्तानी, सलीम-अनारकली यांच्यापेक्षा उच्च दर्जाची आहे. काहीही करून या कथेचं सोनं करायचं, हे मी मनाशी पक्कं केलं. त्यानंतर मग कलाकारांची जमवाजमव हा प्रकार सुरू झाला. ब्राह्मण कुटुंब, तेदेखील १९३० ते १९५५ या काळातलं उभं करायचं, तर मग प्रत्येक पुरुषाला गोटा करणं भागच होतं. त्यामुळे त्या दृष्टीने कलाकार निवडायला घेतले. मुख्य भूमिकेसाठी सचिन खेडेकर सोडून दुसरा कोणताही पर्याय डोळ्यांसमोर नव्हताच. सविता मालपेकर यांनी तर अलवणातल्या म्हातारीची भूमिका करण्यासाठी केस भादरण्यापर्यंत तयारी दाखवली आणि एखादा कलाकार भूमिकेशी तद्रूप होण्यासाठी किती प्रयत्न करू शकतो, याचं प्रत्यंतर आलं, असं महेश सांगतात.
स्वातंत्र्यपूर्व काळातलं गाव आणि त्याहीपेक्षा घर शोधण्यात मांजरेकरांचा जास्त वेळ गेला. मात्र सगळ्या गोष्टी मनासारख्याच झाल्या पाहिजेत, या ईर्षेने पेटलेल्या सगळ्या टीमने अखेर गुहागरजवळ नेन्यांचा वाडा शोधून काढला. या नेनेकाकांनीही आम्हाला शूटिंगदरम्यान खूप मदत केली, असं महेश सांगतात. आज या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराचंच नाही, तर तंत्रज्ञांचंही ‘काकस्पर्श’शी जेवढं भावनिक नातं तयार झालंय, तेवढंच ते नेनेकाकांबरोबर आणि त्या वाडय़ाबरोबर झालं आहे.
‘काकस्पर्श’मध्ये आपण एवढे गुंतलोय की, आता तो चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार आहे. आत्ताच माझ्याकडे ‘नटसम्राट’चं स्क्रिप्ट पडलं आहे. पण या चित्रपटाचा प्रभाव एवढा जास्त आहे की, त्याकडे लक्ष देववतच नाही. कलाकाराच्या आयुष्यात काही कलाकृती अशा येतात की, त्या पूर्ण झाल्यानंतर एक अनामिक हुरहूर, एक अनामिक रितेपण जाणवत राहतं, ‘काकस्पर्श’ ही तशाच प्रकारची कलाकृती आहे. हा चित्रपट पुढे आमीर खानला घेऊन हिंदीत करण्याचाही माझा विचार आहे. कारण यातील प्रमुख भूमिका करण्यासाठी आमीरएवढा समर्थ अभिनेता आताच्या घडीला तरी मला समोर दिसत नाही. त्याचप्रमाणे मिथुन चक्रवर्ती यांना मी ही कथा ऐकवली, त्याचवेळी त्यांनी यावर बंगालीत चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. हा चित्रपट पुढे ‘ऑस्कर’मध्ये भारताकडून जावो, अशी मनोमन इच्छा आहे. पण अखेर ४ मेपासून प्रेक्षक काय कौल देतात, यावर सर्व अवलंबून आहे, असं मांजरेकर सांगतात.