ही तो प्रेक्षकांची कृपा! Print

altमहेश मांजरेकर यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून प्रदर्शित झालेल्या ‘काकस्पर्श’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचं चित्र निदान पहिल्या आठवडय़ात तरी कायम आहे. ‘काकस्पर्श’ बनवण्याचा विचार करतानाही, प्रेक्षकांची बदललेली अभिरुची, हे महत्त्वाचं कारण ध्यानात आल्याचं सांगताहेत सचिन खेडेकर..
पाच वर्षांपूर्वी ‘काकस्पर्श’ या चित्रपटाची संहिता माझ्या हाती आली, त्या वेळी मी अक्षरश: झपाटून गेलो होतो. ‘जन्मगाठ’ नावाने हीच गोष्ट २० वर्षांपूर्वी विनय आपटेने रंगमंचावर साकारली होती. आता विनय आपटेच त्या गोष्टीचं चित्रपटाच्या रूपात सोनं करण्यासाठी सरसावला होता. मात्र त्या वेळी ते गणित जमू शकलं नाही. त्यानंतर ही कथा महेश मांजरेकरला ऐकवली आणि तोदेखील माझ्यासारखा झपाटला गेला, पण इथे मला एक गोष्ट प्रकर्षांनं नमूद करावीशी वाटते. पाच वर्षांपूर्वी हा चित्रपट आला असता, तर प्रेक्षकांनी कदाचित तो स्वीकारला नसता. गेल्या पाच वर्षांत मराठी चित्रपटांमध्ये एवढे वैविध्यपूर्ण विषय हाताळले गेले की, ‘काकस्पर्श’सारखा चित्रपट आणायचं धाडस आम्ही केलं.
या पाच वर्षांमधील मराठी चित्रपटांवर नजर टाकली, तर मला काय म्हणायचं आहे, ते अगदीच चांगल्या प्रकारे लक्षात येईल. ‘नटरंग’ असो, ‘जोगवा’सारखा धाडसी विषय असो, ‘शिक्षणाच्या आयचा घो’ असो, ‘देऊळ’ असो, प्रत्येक चित्रपटानं एक वेगळा विषय घेत वेगवेगळे प्रयोग केले. माझ्या मते मराठी सिनेमा सध्या प्रायोगिकतेचं धाडस करू धजावतोय. विशेष म्हणजे प्रेक्षकांनाही हे धाडस आवडतंय हे या प्रत्येक चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादावरून नक्कीच लक्षात येतं. ‘काकस्पर्श’चा विचार करताना प्रेक्षकांनी या इतर चित्रपटांना दिलेला प्रतिसादही विचारात घेतला होता. त्यामुळे ‘काकस्पर्श’सारखा वेगळ्या धाटणीचा चित्रपट येण्यामागे प्रेक्षकांची वाढलेली समज, हे मोठं कारण आहे.
हा चित्रपट केवळ महेशसाठीच नाही, तर माझ्यासाठीही स्वप्न होतं. त्यामुळे आम्ही दोघं अजूनही या चित्रपटातून बाहेर येत आहोत. आता थोडीशी भीतीही वाटतेय. भीती याची की, एवढी चांगली कलाकृती दिल्यानंतर प्रेक्षकांना आता आमच्याकडून साहजिकच जास्त अपेक्षा असणार. आपण त्या अपेक्षांची पूर्तता करू शकू, असा विश्वास जोपर्यंत वाटत नाही, तोपर्यंत पुढचं प्रोजेक्ट हातात घेताना आम्हाला प्रचंड धास्ती वाटत राहील. तरीही एक कलाकार म्हणून मला विचाराल, तर वर्षांला एक प्रायोगिक नाटक, एक व्यावसायिक नाटक आणि एक मराठी चित्रपट करावा, असं मला सतत वाटत आलं आहे. यंदा नाटकात काम करण्याच्या दृष्टीने मी हालचाली सुरू केल्या आहेत. गिरीश जोशीचंच एक स्क्रिप्ट प्रचंड पसंत पडलं आहे आणि त्यावर कामही सुरू आहे. ‘काकस्पर्श’च्या निमित्ताने मला गिरीशचं विशेष कौतुक करावंसं वाटतं. पाच वर्षांपूर्वी जेव्हा या चित्रपटाचा विचार चालू होता, त्या वेळीही गिरीशनेच ती पटकथा लिहिली होती. महेशने आता त्या पटकथेत अगदी नाममात्र बदल करत ती जशीच्या तशी स्वीकारली आहे. एवढी बांधेसूद पटकथा क्वचितच पाहायला आणि वाचायला मिळते. त्यामुळे यानिमित्तानं आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे कोणत्याही सादरीकरणासाठी उत्तम संहिता आणि त्या संहितेची उत्तम बांधणी खूप आवश्यक असते. ‘काकस्पर्श’मध्ये या पटकथेनंच महेशचं निम्मं काम सोपं केलं. महेश आणि मी यांच्यात आता एक त्रिकोण पूर्ण झाला आहे. या त्रिकोणाची पहिली बाजू होती ‘अस्तित्व’! काळाच्या पुढचा चित्रपट होता तो. एक अप्रतिम चित्रपट देत महेशने त्याच्या आणि माझ्याही प्रतिभेचा प्रत्यय दिला. त्यानंतर अगदी दोन-तीन वर्षांपूर्वी या त्रिकोणाची दुसरी बाजू जुळली. आजच्या युगात इतिहासातले संदर्भ घेत केलेल्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाच्या निमित्ताने! तर त्रिकोण पूर्ण झाला ‘काकस्पर्श’मध्ये. हा चित्रपट ज्या काळातला आहे, त्या काळाचा विचार केला, तर आपण जेथून आलो आहोत, ती मुळं या चित्रपटाच्या निमित्ताने सापडतात. महेश आणि मी, आमच्यातलं नातं कलाकार म्हणून विचारात घेतलं, तर या चित्रपटाच्या निमित्ताने परिपूर्ण झालं.     
(शब्दांकन - रोहन टिल्लू)