कधी ‘हिंदुस्थानी’, कधी ‘इंडियन’; ‘भारतीय’ कधी? Print

प्रतिनिधी

‘भारतीय’, ‘हिंदुस्थानी’ व ‘इंडियन’ एकच. पण ‘सिनेमाच्या जगा’त त्यांच्या ‘नावाचा खेळ’ मात्र केवढा तरी गमतीशीर.निर्माता पहलाज निहलानी यांच्या सनी देवल व ऐश्वर्या रॉय जोडीच्या ‘इंडियन’ नावाच्या चित्रपटाच्या चित्रनगरीतील मुहूर्ताला हजर राहताना झेंडय़ाच्या नक्षीकामाच्या ऐशच्या साडीचीच चर्चा जास्त रंगली, पण चित्रपट मुहूर्तालाच बंद पडला. ए. महाराजन दिग्दर्शित ‘इंडियन’चा या ‘इंडियन’शी फक्त सनी देवलपुरता संबंध, कथानक मात्र वेगळे म्हणायचे तर पहलाजच्या ‘इंडियन’चे कथानक काय होते कसे कळणार? या वेळी शिल्पा शेट्टी ‘नायिका’ होती. तिचं व्यक्तिमत्त्व ‘इंडियन’ आहे. शंकर दिग्दर्शित व कमल हसनची दुहेरी भूमिका असणारा ‘हिंदुस्थानी’ मूळ तमिळमध्ये ‘इंडियन’ नावानेच झळकला. ‘झटका दिया रे हमने’चा ऊर्मिला मातोंडकरचा नृत्य ठेचा यातलाच.

‘हम हिंदुस्थानी’ (‘छोडो कल की बाते’ आठवले असेलच), ‘सात हिंदुस्थानी’ (अमिताभचा पहिला चित्रपट), ‘हिंदुस्थान की कसम’ (चेतन आनंदचा युद्धपट) अशा प्रकारे नावात ‘हिंदुस्थान’ आलाच, पण एकदा राजकुमार संतोषीने फिल्मीस्तान स्टुडिओत सनी देवल व अनंत महादेवन यांच्यावर ‘एक हिंदुस्थानी’ चित्रपटाचा देशभक्तीवाल्या संवादाने दणक्यात मुहूर्त केला, पण त्याची प्रगती तेथेच खुंटली. सिनेमातील ‘भारतीय’करणाबाबत मनोजकुमारच्या नावाभोवती ‘वलय आणि वळण’ वाढले. ‘उपकार’पासून त्याला ही ‘ओळख’ मिळाली. ‘शोर’, ‘रोटी, कपडा और मकान’, ‘पूरब और पश्चिम’ने त्याची प्रतिमा घट्ट केली. मेहुलकुमारही ‘तिरंगा’, ‘क्रांतिवीर’, ‘कोहराम’ अशा चित्रपटांच्या वेळी ‘दुसरा मनोजकुमार’ म्हणून ओळखला गेला. जोगिंदरचे ‘भारतीय’पण आक्रस्ताळे होते. ‘दो चट्टाने’, ‘िबदिया और बंदूक’, ‘फौजी’ अशा काही चित्रपटांतून त्याने ‘देशप्रेम’ व्यक्त केले. अमिताभनेही ‘काही वेगळे करायचे’ म्हणून टिनू आनंद दिग्दर्शित ‘मैं आझाद हूँ’मध्ये ‘जागो दुनियावाले’ अशा स्वरूपाची भूमिका साकारली. यात ‘आझाद’ अर्थात अमिताभ सामाजिक जागरूकतेची हाक देतो. असा ‘वास्तववादी अमिताभ’ रसिकांना रुचला नाही.
‘स्वदेस’ या सगळ्या वाटचालीचा वेगळा टप्पा. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरने स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या ५० वर्षांनंतरही देशातील पाच हजार गावांत वीज नाही यावर ‘फोकस’ टाकला. शाहरुखच्या अवाजवी ‘स्टाइल’ नियंत्रणात ठेवून चित्रपट साकारायचे आव्हान पेलले होते. गिरीश मोहितेचा ‘भारतीय’ येईपर्यंत हिंदीत या संकल्पनेवर बरेच बरे-वाईट चित्रपट आले-गेले. तरी काही प्रश्न कायम आहेत. खेडय़ातला ‘हिंदुस्थान’ व शहरातील ‘इंडियन’ यात ‘भारतीय’ नेमका कुठे आहे? ‘मी मराठी’चा अभिमान बाळगावा तर प्रांताभिमान जागा होतो, मग ‘मी भारतीय कधी असतो?’..