बाल हक्क आयोगाची शाहरुख, मारू, पोलीस यांना नोटीस Print

वानखेडे स्टेडियमवरील शिवीगाळ प्रकरण
प्रतिनिधी

वानखेडे स्टेडियमवर शाहरुख खानने केलेल्या शिवीगाळप्रकरणी बाल हक्क संरक्षण आयोगाने अभिनेता शाहरुख खानसह तक्रारकर्ते अमित मारू, मुंबई पोलीस यांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता ही सुनावणी होणार आहे. अमित मारू यांनी शाहरुख खानविरुद्ध केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशी करणे आवश्यक असल्याने आयोगाच्या कार्यालयात सुनावणी आयोजित करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने नोटिशीत म्हटले आहे.  अमित मारू यांनी आपले वकील वाय. पी. सिंग यांच्यामार्फत आयोगाशी संपर्क साधून शाहरुखच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
सुनावणीदरम्यान मारू यांना किंग खानविरुद्ध तक्रार का दाखल केली ते समजावून सांगावे लागेल. नंतर या संदर्भात पुढे काय करायचे याची दिशा आयोग ठरविणार आहे.  
शाहरुख खान हा सेलिब्रिटी असून लहान मुले त्याचे अनुकरण करतात असे मारू यांनी तक्रारीत म्हटले आहे. १६ मे रोजी किंग खानने वानखेडे स्टेडियमवर सुरक्षारक्षकांना शिवीगाळ केली होती. त्या दिवशी शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाइट रायडर्स संघाने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात विजय मिळविला होता.