‘जब तक है जान’चे अखेरचे गाणे अधुरेच राहणार Print

प्रतिनिधी
यश चोप्रांची अखेरची कलाकृती म्हणून ‘जब तक है जान’ या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहिली जात आहे. या चित्रपटातील एकच गाणे चित्रित व्हायचे राहिले होते. मात्र, आता हे गाणे चित्रित केले जाणार नाही, असे शाहरूख खानने पत्रकार परिषदेत जाहीर केले. ‘जब तक है जान’ चित्रपटाविषयी माहिती देण्यासाठी शाहरूख खान, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांनी यशराज स्टुडिओत नुकतीच पत्रकार परिषद घेतली.
‘जब तक है जान’ या चित्रपटातील एका गाण्याचा काही भाग चित्रित व्हायचा राहिला होता. हा भाग स्वित्र्झलडमध्ये चित्रित व्हावा, अशी यश चोप्रा यांची इच्छा होती. मात्र, त्यांच्या निधनामुळे या गाण्याचे चित्रिकरणच झाले नाही. यशजींचे गाणे त्यांच्या शैलीत चित्रित करणे म्हणजे त्यांच्या अप्रतिम कलाकृतीशी खेळल्यासारखे होईल. असे ठिगळकाम करण्याची आमच्यापैकी कोणाचीच इच्छा नाही. त्यामुळे हे गाणे आता अधुरेच राहणार, असे शाहरूखने सांगितले.
‘जब तक है जान’चे संकलनही यश चोप्रांनी पूर्ण केले होते. त्यामुळे चित्रपटाला पाश्र्वसंगीत देण्याचे काम शेवटच्या टप्प्यात सुरू होते. आता हा चित्रपट १३ नोव्हेंबरला प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. ‘जब तक है जान’ची सगळी गाणी गुलजार यांची आहेत तर त्याला संगीतसाज ए. आर. रेहमानचा आहे.
यशजींबरोबर काम करणे म्हणजे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे हे सांगताना हा आनंद त्यांच्याबरोबर अनुभवता येणार नाही, याबद्दल कतरिना कैफ ने खंत व्यक्त केली. तर ‘जब तक है जान’ हा पूर्णत: यशजींचा चित्रपट होता त्यामुळे मला या चित्रपटातून किती पैसा मिळणार, याची अजिबात काळजी नाही. मी आत्तापर्यंत माझ्या कारकीर्दीत अनेक पुरस्कार आणि मानसन्मान मिळवलेत. त्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाचा आनंद घ्यावा, एवढीच इच्छा असल्याचे शाहरूखने सांगितले.