‘कृत्रिम प्रस्तर भिंत आरोहण स्पर्धे’त महाराष्ट्राचे वर्चस्व Print

प्रशांत ननावरे
पुणे येथे पार पडलेल्या ‘कृत्रिम प्रस्तर भिंत आरोहण स्पर्धा २०१२’मध्ये (आर्टिफिशियल वॉल क्लायम्बिंग) गेल्या १७ वर्षांत पहिल्यांदाच पश्चिम विभागातून महाराष्ट्रातील तब्बल २३ खेळाडूंची ‘१८ व्या राष्ट्रीय क्रीडा कृत्रिम प्रस्तर भिंत आरोहण स्पर्धे’साठी निवड झाली आहे.
पुणे महानगरपालिका, इंडियन माऊंटेनीअरिंग पश्चिम क्रीडा विभाग आणि शिवाजी व्यायाम मित्र मंडळातर्फे १४ ते १७ ऑक्टोबर रोजी पुणे येथे ‘महापौर चषक - कृत्रिम प्रस्तर भिंत आरोहण स्पर्धा २०१२’चे आयोजन करण्यात आले होते. पश्चिम विभागात महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश असून, या राज्यांतील सुमारे २०२ खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील १०३ मुले आणि ३० मुलींचा समावेश होता. यात मुंबईतील १२, पुण्यातील ११, नाशिक व लोणावळ्याच्या प्रत्येकी एका खेळाडूची दिल्लीत १९ ते २१ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आजवरच्या स्पर्धेमध्ये दक्षिण विभागाचे वर्चस्व कायम राहिले आहे.  पश्चिम विभाग संघ पुढीलप्रमाणे - अजित शेख, तुहिन सातारकर, विकी भालेराव, नमिता सावंत, स्मिता शहाणे, सिद्धी मणेरीकर, मयूरी देशमुख, मृणाल काळे, हृतिक मारणे, गौरव साळवे, काजल कांबळे, काजल टोपळे, माहिनी गुंजाल, विनोद साळवे, इंद्राणी खरंगळे, आकाश गायकवाड, शैलेश वायंगणकर, बंटी काकडे, प्रिया ठोके, रोहित वर्तक, ईशानी सावंत, अमेय महाडिक (सर्व महाराष्ट्रातील) आणि ममता पासवान (भोपाळ).