संगीतकार अशोक पत्की, अभिनेत्री फैयाज यांची ‘कोमसाप’ साहित्य संमेलनात प्रकट मुलाखत Print

दापोलीत रंगणार साहित्य सोहळा
 प्रतिनिधी
कोकण मराठी साहित्य परिषदेचे १४ वे कोकण मराठी साहित्य संमेलन येत्या ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत दापोली येथे होणार आहे. चर्चा, परिसंवाद, निमंत्रितांचे काव्य संमेलन, संगीतकार अशोक पत्की आणि ज्येष्ठ अभिनेत्री फैयाज यांची प्रकट मुलाखत आणि अन्य विविध कार्यक्रम संमेलनात होणार आहेत. ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते होणार आहे.
उद्घाटनाचा सोहळा सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत होणार असून दुपारी २ ते ३ या वेळेत ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी ३ ते ५ या वेळेत ‘कोमसाप’तर्फे घेण्यात आलेल्या ‘श्री. ना. पेंडसे कादंबरी स्पर्धे’चा निकाल जाहीर करण्यात येणार असून विजेत्यांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. चिपळूण येथे होणाऱ्या ८६ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. सायंकाळी ६ ते ९ या वेळेत डॉ. प्रभा गणोरकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे काव्य संमेलन होणार आहे. शनिवार, ८ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते ११.४५ या वेळेत ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांची प्रकट मुलाखत होणार असून दीपाली केळकर त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. सकाळी ११.४५ ते २.१५ या वेळेत ‘मराठी भाषेतील शिक्षण-सद्यस्थितील आव्हाने’ हा परिसंवाद, दुपारी २.३० ते ३.३० या वेळेत ‘चरित्रकार धनंजय कीर स्मरणयात्रा’ हा कार्यक्रम, दुपारी ३.३० ते ५ ‘गाजलेल्या बातम्या-काही अनुभव’ हा कार्यक्रम, सायंकाळी ५.३० ते ८.३० या वेळेत विष्णू सूर्या वाघ यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन, तर रात्री ९.३० ते ११ या वेळेत ‘आठवणीतील श्री.ना.’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे. रविवार, ९ डिसेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेत्री फैय्याज यांची अभिनेते प्रमोद पवार मुलाखत घेतील. याच दिवशी दुपारी २ ते ५ या वेळेत संमेलनाचा समारोप सोहळा होणार आहे. सारस्वत बँकेचे उपाध्यक्ष किशोर रांगणेकर हे समारोप सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.  संमेलनाविषयी अधिक माहितीसाठी ‘कोमसाप’ कार्यालय प्रमुख कार्यवाह प्रशांत परांजपे यांच्याशी ०२३५८-२८३२१४/९४२२४३०२१४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ‘कोमसाप’ने केले आहे.