आंतरराष्ट्रीय पर्यटनावर आजपासून रिअ‍ॅलिटी शो Print

प्रतिनिधी
पर्यटनविषयक कार्यक्रमांची अनेक खाजगी दूरचित्रवाहिन्यांवर रेलचेल असते. परंतु, मराठी वाहिनीवर आंतरराष्ट्रीय पर्यटन सफरीवर कार्यक्रम नाहीत. स्टार प्रवाह वाहिनीवर रविवार, ४ नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय पर्यटनावर ‘आम्ही ट्रॅव्हलकर’ नावाचा रिअ‍ॅलिटी शो सुरू होत आहे. अभिनेत्री प्रिया बापट या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. दर रविवारी सकाळी १० वाजता दाखविण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाचे केवळ १३ भाग पाहायला मिळणार आहेत.
आंतरराष्ट्रीय पर्यटन सहलीचे आयोजन कसे करावे, विमान प्रवास, वास्तव्य आणि भोजनाची व्यवस्था कशी असावी याचे मार्गदर्शन या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना मिळू शकेल. रविवारी दाखविण्यात येणाऱ्या पहिल्या भागात अभिनेत्री प्रिया बापट कार्यक्रमाची संकल्पना सांगणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत जिंकलेल्या विजेत्यांची ओळखही ती करून देणार आहे. विजेत्यांनी निवडलेल्या ठिकाणांची माहिती, स्थळांचा इतिहास, तेथील संस्कृती आणि महत्त्व याबद्दल प्रिया बापट माहिती देणार आहे. लकी ड्रॉच्या माध्यमातून १३ विजेत्यांची निवड करण्यात आली आहे.
जर्मनीतील हेडलबर्ग, स्वित्झर्लण्डमधील ग्लेसिअर ३०००, रोम, इटली, फ्रान्स, अ‍ॅम्सटरडॅम, बेल्जियम इत्यादी ठिकाणांचे पर्यटन, तेथील महत्त्वाची ठिकाणे या कार्यक्रमात पाहायला मिळतील.