संजय उवाच , कथा प्रसूतीची..व्यथा व्यवस्थेची.. Print

डॉ. संजय ओक , रविवार , २ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

परवा ‘मेडिकल टाइम्स’ मध्ये छापून आलेल्या बातमीने मी अंतर्मुख झालो. बातमी दिल्लीची होती. मेट्रो रेल्वेमध्ये एका गर्भवती स्त्रीने मुलीला जन्म दिला होता. बाळ-बाळंतीण सुखरूप होत्या. मेट्रोने सगळा खर्च उचलला आणि मेट्रोत जन्मल्यामुळे तिचे नाव ‘मत्री’ ठेवण्यात आले आणि ती दिल्ली मेट्रो रेल्वेची ‘मॅस्कोट’ होईल असा निर्णय घेतला. रेल्वे अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या सहानुभूतीबद्दल कौतुक व्यक्त करावे की, आपल्या देशातल्या गर्भवती स्त्रियांच्या विद्यमान अवस्थेमुळे काही मूलभूत प्रश्नांना हात घालावा, या द्विधा अवस्थेत मी सापडलो.
रुग्णालयाबाहेर; रुग्णालयाच्या वाटेवर असताना प्रसूती होण्याची ही काही पहिलीच वेळ नसावी. मेट्रोत झाल्यामुळे ‘मत्री’ तर मग लोकलमध्ये झाल्यावर ‘लोकी’, रिक्षात झाल्यावर ‘रिक्षी (रिस्की)’, टांग्यात झाल्यावर ‘तंगी (टंगी)’ आणि विमानात झाल्यावर ‘हवा-हवाईच’ म्हणायला हवे. कोणत्या गोष्टीचा सोहोळा करायचा आणि कोणत्या गोष्टीबद्दल योजना-मंथन करावयाचे याचे तारतम्य ठेवायलाच हवे.
‘मत्री’ आणि तिची माता भाग्यवान ठरल्या, पण सगळ्यांच्याच नशिबी हे सुदैव येत नाही. अयोग्य ठिकाणी माता असताना प्रसूतीवेदना सुरू झाल्यावर अनेकदा अतिशय गंभीर प्रसंग ओढवू शकतो. प्रसंगी मातेचा जीव धोक्यात येऊ शकतो. अति-रक्तस्राव; जंतुसंसर्ग, घटसर्प; नवजात शिशूला प्राणवायू न मिळणे अशा अनेक अडचणी उद्भवू शकतात. जन्माच्या वेळी प्रसूती अडली आणि शिशूच्या मेंदूला प्राणवायूचा अपुरा पुरवठा झाला तर Cerebral palsy सारख्या आयुष्यभराच्या कठीण अस्तित्वाला सामोरे जावे लागते.
प्रसूतीची वेळ अंदाजित करता येते, पण छातीठोकपणे ती त्याच वेळेस होईल याची खात्री नाही. माणसाचं आयुष्य विस्मयकारक अनिश्चिततेवर Glorious uncertainties) अवलंबून असते याची सर्वात पहिली प्रचीती परमेश्वर अशा अनपेक्षित प्रसूतीच्या घटनांमधून देतो. या घटना टाळता येणार नाहीत; हे जितके सत्य आहे तितकेच त्याचे प्रमाण आजही आपल्या देशात विकसित देशांपेक्षा अधिक आहे हेही सत्य आहे.
स्वातंत्र्यानंतर सहा दशके उलटल्यावरही ‘सुरक्षित मातृत्व’ हे आमचे ‘मिळवावयाचे’ उद्दिष्ट राहते ही गोष्टच आरोग्य-आयोजकांना खडबडून जागं करणारी असावी. दिल्ली-मुंबईसारख्या विकसित शहरांमध्येही महिन्याकाठी दोन जर अशा घटना घडल्याचे ऐकायला-वाचायला मिळते तर वीज आणि दळणवळण पुरेसे न पोचलेल्या ग्रामीण अंतर्भागाची काय कथा असेल ?
मला आज केवळ प्रश्न उपस्थित करून थांबायचे नाही तर काही मुलखावेगळी उत्तरेही सुचवायची आहेत. प्रसूतीपूर्व काळातील मातांची नोंदणी आणि त्यांची देखभाल; त्यांचा आहार-लसीकरण आणि प्रसूती जेथे होणार आहे त्या दवाखान्याची-रुग्णालयाची अन् रुग्णाची प्रत्यक्ष तोंडओळख आणि पूर्वभेट हे अतिशय काटेकोरपणे पाळले जायला हवे. केईएमसारख्या रुग्णालयात आजही unregistered; in labor म्हणजे पूर्वी नाव न नोंदविलेल्या आणि थेट वेदना सुरू झाल्यावर पहिल्यांदाच  मध्ये येणाऱ्या गर्भवती स्त्रियांची संख्याही काळजी करण्याइतपत मोठी आहे, हे आजचे वास्तव आहे. गर्भवती स्त्री नाव नोंदविण्यासाठी किंवा त्यापूर्वी तपासण्यांसाठी आली नाही हा तिचा अपराध असेल किंवा नसेलही, पण तिच्यापर्यंत पोहोचण्यात पर्यवेक्षी आरोग्य-योजना अपयशी ठरली हे मात्र निश्चित आहे. जिथे दोन वेळच्या भाकरीची भ्रांत आहे तेथे दोन तास रांगेत ताटकळणे म्हणजे रोजगार बुडून उपासमार हे वास्तव आहे.
प्राथमिक स्तरावर काम करणाऱ्या डॉक्टर; ANM; MPW यांच्या कार्याचा पुनर्आढावा घेऊन या कर्तव्याला प्राधान्य देण्याची गरज आहे. जिथे गर्भाचे वय अज्ञान आणि अपुऱ्या माहितीमुळे निश्चित करता येत नाही तेथे Antenatal Sonography चा तपास प्रसूतीच्या संभाव्य तारखेसाठी अनिवार्य असावा. PNDT Act अन् गर्भिलगनिदान या कात्रीत सापडलेल्या या निदान-तंत्रज्ञानाची चांगली बाजू आपल्याला व्यावहारिक उपयोगात आणणे गरजेचे आहे. वेदना सुरू झालेल्या स्त्रीला जवळच्या रुग्णालयात पोहोचविणे; स्त्रीची आíथक क्षमता महत्त्वाची न मानता जवळच्या खासगी आरोग्य संस्थांनीही ते आपले आद्य कर्तव्य मानणे; प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया आरोग्य-विम्याच्या छत्राखाली आणून कायद्याने बंधनकारक करणे; जेव्हा जेव्हा यापुढे नवे रस्ते; महामार्ग तयार होतील तेव्हा तेव्हा अ‍ॅम्ब्युलन्सला जाण्यासाठी Hard shoulder मार्गिका तयार करणे; वैद्यकीय विद्यार्थ्यांबरोबरच समाजातील काही जबाबदार महिलांना अशा प्रसूतीच्या वेळी शास्त्रीय पद्धतीने मदत करण्याचे तंत्र शिकविणे आणि फर्स्ट एड बॉक्समध्ये जुजबी आवश्यक सामुग्रीचा समावेश करणे; या साऱ्याच गोष्टी यापुढे गांभीर्याने घ्यावयास हव्यात. माता आणि नवजात शिशू मृत्यू दर अधिक झपाटय़ाने खाली आणणे, ही आपल्या आरोग्य-व्यवस्थेची यापुढील प्राथमिकता असावयास हवी.
..मत्रीला आणि तिच्या कुटुंबाला कदाचित मेट्रोचा आजन्म मोफत पासही मिळेल; पण अशा प्रसंगांचे उदात्तीकरण करण्याऐवजी आपण कुठे कमी पडतो आहोत याचा विचार होणे गरजेचे आहे.
..आपल्या घरात आपण पाळलेल्या चंपी कुत्रीकडे किंवा मनी भाटीकडे पाहा. प्रसूतीच्या आधी दोन दिवस ती आपली जागा-बाडबिस्तरा निश्चित करते. बागेत पळताना; उंदराच्या मागे धावताना प्रसूती झाल्याचे वाचायला मिळत नाही.There is yet lot to learn from animal kingdom...