संजय उवाच : मेडिकल कॅम्प्स आणि मी! Print

डॉ.संजय ओक,रविवार ९ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

पावसाळा जवळ आला की, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला जलजन्य आजारांची चिंता भेडसावू लागते. रुग्णालयाची ओ.पी.डी. माणसांनी फुलून जाते. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची शटर्स रात्री बारा-बारा वाजेपर्यंत खुली राहू लागतात. अत्यवस्थ रुग्णांना घेऊन धावणाऱ्या अ‍ॅम्ब्युलन्सेसना सुगीचे दिवस येतात, पण आय.सी.यू.ची बेड मिळणे दुरापास्त होते.मध्यमवर्गीयांचे महिन्याचे बजेट कोलमडते.औषधांची खरेदी चार आकडय़ांत जाऊन पोहोचते आणि हे सगळं होतं, त्या काही आजारांच्या त्रिकूट किंवा चांडाळ चौकडीमुळे, ज्यांचे नामोनिशाण विकसित देशांनी पुसून टाकले आहे. मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आणि काविळीचे नाना प्रकार. दोन वर्षांपूर्वी मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता यावर काही वेगळा विचार करण्याची गरज आह,े हे आमच्या ध्यानात आले आणि सार्वत्रिक, सर्वसमावेशक विचारमंथनातून आरोग्य शिबिरे (कॅम्प्स) भरविण्याचा निर्णय झाला. आज दोन वर्षांनंतर या शिबिरांची उपयुक्तता माझी मलाच पूर्णपणे पटली आहे आणि आरोग्य-सेवा इतरही आजारांच्या बाबतीत लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही संकल्पना राबविणे गरजेचे आहे, या निर्णयाप्रत मी आलो आहे.
शिबीर म्हणजे नेमके काय? शिबीर म्हणजे शिस्त. शिबीर म्हणजे विचार. शिबीर म्हणजे योजलेल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग. कधी महामार्ग, तर कधी बिकट पायवाट. शिबीर म्हणजे पताका-पोस्टर्स- घोषवाक्ये-आवाहने आणि आरोग्य जागर. शिबीर म्हणजे धन्वंतरीच्या आशीर्वादासाठी, त्याच्या आगमनासाठी घातलेला गोंधळ. शिबीर म्हणजे वाडी-वस्तीची स्वच्छता.. फवारलेला धूर.. उचललेला कचरा; काढून टाकलेली टपांवरची टायर्स.. कोरडय़ा केलेल्या कुंडय़ा.. उपडी पिंपे अन् झाडलेली मदानं. शिबीर म्हणजे बॅनर्स; शिबीर म्हणजे पॅम्प्लेट्स; शिबीर म्हणजे लाउडस्पीकर अन् शिबीर म्हणजे खांद्यावरून लटकलेला मेगाफोन.. शिबीर म्हणजे गाडीवर बसविलेले  vehicle mounted fogging machine  आणि खांद्यावर वाहून न्यायचे. प्रचंड कानठळ्या बसविणारा आवाज निर्माण करणारे अन् आसमंत धुरात लपेटून टाकणारे धूम्रफवारक आणि त्यांच्या मागे मागे पळणारी हाफ-चड्डीतील काळी-सावळी पोरा-टोरांची गँग म्हणजे शिबीर. शिबिराच्या दिवशी घरातले पाणी भरून झाल्यावर मंडपात लावलेली रांग.. कडेवरची शेंबडी पोरं.. रुग्णांत बाया-म्हाताऱ्यांचाच भरणा अधिक.. पुरुष मंडळींची उपस्थिती आयोजक म्हणून.. हे सारं मी गेले अनेक रविवार अनुभवतोय आणि आजवर न उमगलेल्या आरोग्य रक्षणासाठी आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी मला या शिबिरातून उलगडल्या आहेत. हे पुस्तकी ज्ञान नाही तर हा प्रत्यक्षस्पर्शी अनुभव आहे.
भारतासारख्या विकसनशील देशात आरोग्याला असायला हवे तेवढे प्राधान्य नाही. ते जसे आíथक नियोजनात कमी आहे, तसेच ते जनसामान्यांच्या मनातही कमीच आहे. आजारपण अंगावर काढण्याची प्रवृत्ती. ऋण काढून सण साजरे करतील, पण ऋण काढून आरोग्य संपादनाचा विचारही होणार नाही. ताप आला तर दोन-चार दिवस वाट पाहतील. खाडा होईल; रोजगार बुडेल, म्हणून पुरुष आणि एवढय़ा-तेवढय़ासाठी डॉक्टर कशाला? नखरा नको, म्हणून स्त्रिया.. रुग्णालयाची वाट  सुरुवातीच्या काळात धरणार नाहीत आणि अनेकदा याच कारणामुळे आजार बळावल्यावर रुग्णालयाची वाट धरण्याइतपतही शक्ती न उरल्याच्या घटना घडत आहेत. या सर्वावर उत्तम उपाय म्हणजे शिबिरे!
रुग्णालयाने आपल्या परिघाच्या आणि कुंपणाच्या बाहेर पडून वाडय़ा-वस्ती; झुग्गी-झोपडय़ांपर्यंत पोहोचणे. ‘डॉक्टर मला अमुक-तमुक होतंय’ हे उत्तर ऐकण्यापूर्वी, आजी/ मावशी/ मामा.. काय होतंय तुम्हाला? हा प्रश्न विचारणे; आणि आसन्नमरण अवस्थेत रुग्ण तुमच्या दारात येण्यापूर्वी तुम्ही हसतमुख चेहऱ्याने त्यांच्या झोपडीच्या चौकट नसलेल्या झापांत जाऊन उभे राहणे.. म्हणजे शिबीर.
या वर्षीच्या शिबिरांनी आम्हाला मलेरियाचे नियंत्रण दिले; निदान आणि उपचार घरच्या घरी करण्याची संधी दिली; कॉम्प्युटरचा सक्षम डेटा-बेस दिला; वैद्यक क्षेत्रातील स्टॅटिस्टिकल टूल्स लावण्याचाी७ी१्रू२ी दिला; केंद्रीय निरीक्षक चमूने कौतुकाचे चार शब्द दिले; नगरसेवकांना उत्तम आयोजनाचे उपक्रम दिले; अधिकारी आणि नगरसेवकांमध्ये नागरिकांच्या सेवेचे सेतूबंधन दिले, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे माझ्यातल्या वैद्यकीय शिक्षकाला आणि आरोग्य-सेवा नियोजकाला भारतात नेमके काय हवे आहे, याचे साक्षेपी वस्तुपाठ दिले. माझ्या लाडक्या पदवीपूर्व; पदव्युत्तर विद्यार्थ्यांना रुग्णालयाच्या कोंडवाडय़ातून बाहेर काढून समाजात जेथे त्यांनी प्रत्यक्ष काम करणे अपेक्षित आहे, त्या वास्तवाची तोंडओळख दिली. जलजन्य आजारावरचे नियंत्रण या उद्देशातून चालू झालेला हा उपक्रम खरे तर वर्षभर चालावा. त्यात खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सार्वजनिक आरोग्य सेवेच्या खांद्यास खांदा लावून उतरावे. आरोग्य विद्यापीठाने या अनुभवाचा आवश्यक अनुभव-पूर्ती म्हणून समावेश करावा. मधुमेह, त्वचा-विकार, बालविकार, वयोवृद्धांच्या समस्या, आयुर्वेदोपचार, वेगवेगळे कॅन्सर, विशेषत: स्तन आणि योनीमुखाचा कॅन्सर, तोंडाचे कर्करोग या विषयांना वाहिलेली शिबिरे हे आपल्या महानगरांची पुढील उद्दिष्टे असावीत. विचार केला तर व्याप्ती वाढेल आणि वैविध्याने वैद्यकसत्ता समृद्धच होईल. बळ एकीचे आहे.
..एकटय़ाच्या जोरावर लंकादहन करायला आपण महाबली हनुमान नाही. आपण बोलून-चालून छोटी वानरे.. पण अशा वानरांनीच एकेक दगड टाकून सेतू बांधला होता आणि दगड अवजड असला म्हणून काय झाले.. ‘श्रीराम’ तेवढे लिहायचे.