संजय उवाच : दिवस गणपतीचे! Print

डॉ. संजय ओक रविवार, २३ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

हे दोन आठवडे गणेशोत्सवाचे.. धामधुमीचे.. सजावटीचे.. आरत्यांचे.. मिरवणुकींचे.. ढोल-ताशांचे.. गुलालाचे.. प्रसादाचे.. मोदकांचे आणि स्नेही-आप्तेष्टांच्या घरी ‘आमच्या गणपतीला या हं’ या प्रेमभऱ्या आमंत्रणाला मान देण्याचे. हिंदू धर्मातली माझी सर्वात आवडती गोष्ट म्हणजे सणांची रेलचेल. दिवाळी अर्थातच सणांचा राजा. पण सामूहिकरीत्या साजरे करण्याचा अग्रपूजेचा मान गणोबालाच!
हा माझा सर्वात लाडका देव आहे. रेघोटीला गोलत्व प्राप्त झाले की त्यात हा दिसू लागतो. कधी नुसत्या सोंडेच्या रूपाने हा आपल्या अस्तित्वाची चुणूक दाखवतो, तर कधी तुंदिलतनू गोलावा चित्राला आकार देता होतो. याला आपण अनेक रूपांत पाहतो. अगदी स्कूटरवर बसवतो, चांद्रयानातून अंतराळात धाडतो आणि पाणबुडीतून जलसफरही घडवून आणतो. हा कशालाही नाही म्हणत नाही. बाली, जावा, सुमात्रापासून सॅनफ्रॅन्सिस्को आणि ऑस्ट्रेलियापासून ऑस्ट्रियापर्यंत सर्व जाती, धर्म, पंथ, भाषा बोलणाऱ्या वैश्विक नागरिकांना हा Elephant God सुपरिचित असतो. ब्रॅण्ड विकसित करणे याचे गणपती हे माझ्या मते उत्कृष्ट उदाहरण आहे. गणरायाचा स्वत:चा असा एक ब्रॅण्ड आहे. उंदीरमामा खऱ्या अर्थाने ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर आहे. आणि मोदकांची फ्रँचायजी ठिकठिकाणी विखुरली गेली आहे. गणोबा हा अशा रीतीने मार्केटिंग मॅनेजमेंट आणि ब्रॅण्ड डेव्हलपमेंट या शास्त्रांचा आद्यगुरू आहे.
वेगवेगळ्या रूपांत साकारल्यामुळे याचे मूल्य आणि महत्त्व कधी कमी झालेले नाही. कधी त्याने टिळकांची पगडी घातलीय, तर कधी अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी कमांडोची कॅप. कधी गांधी टोपी, तर कधी अ‍ॅस्ट्रोनॉटस्चे हेल्मेट. महत्त्व डोक्यावरच्या परिधानाला नसून डोक्यामधल्या बुद्धिमत्तेला आहे, हाच संदेश त्याने शतकानुशतके त्याच्या विचार- आचार- उच्चारांतून दिलेला आहे. भक्तांच्या सोयीसाठी त्याने लवचिकता म्हणजे ऋ’ी७्र्रु’्र३८ चा गुण स्वीकारला आहे. देवाच्या षोडशोपचारांसाठी भक्त बदलतात; इथे भक्तांच्या हट्टासाठी देव बदलतो, हेच सत्य आहे.
गणोबाने माणसाला तो रांगायला लागल्यापासून साथसंगत केली आहे. ‘टाळ्या हाताच्या..’ करायला लागल्यापासून मोरया करणारे काही महिन्यांचे तान्हुले आपल्या प्रत्येकाच्या घरात वाढले आहे. हा गणोबा पुढे त्या तान्हुल्याचे बोट धरून त्याला शाळेत घेऊन गेला आहे. पुढे शाळेतला गणपती बसविणे, वक्तृत्व स्पर्धात बोलणे, नाटय़छटा करणे, बतावण्या शिकणे, गाऱ्हाणे घालणे.. या साऱ्या सांस्कृतिक गोष्टींचा वारसा यातूनच जपला गेला आहे आणि कळत-नकळत आपल्याला अभिप्रेत असलेले संस्कार बालमनावर झाले आहेत. अतिशय सुसंस्कृत, संस्कृतिवर्धक आणि सुसंस्कारकारक असा हा देव आहे. हा आपल्याला गायला संधी देतो, नाचायचा अवसर देतो आणि नाटय़शास्त्राचेही धडे देतो. विद्या संपादन करताना व्यवहार शिकवतो. नाती जोडायला अन् जपायला शिकवतो. कलांचा आविष्कार शिकवतो. रसांचा स्वाद घ्यायला शिकवतो. नादब्रह्माचा परिचय करून देतो. अन् सर्वात वेगळे म्हणजे एकत्र यायला शिकवतो.
..गणपती आला की मला मॉडर्न हायस्कूल आणि पुणे आठवते. ओकांच्या घरी थोरल्या काकांकडे तो कोकणस्थी वृत्तीला अनुसरून दीड दिवसांपुरताच यायचा. माझी मोठी काकू- आत्या.. ओल्या खोबऱ्याचे मोदक.. वरून रवाळ तुपाची धार.. विसर्जनाच्या वेळी वाटल्या डाळीचा नवेद्य.. आज चाळीस वषेर्ं उलटून गेली. ती सोन्यासारखी घरातली माणसे गेली, पण ते सोनेरी क्षण मात्र आजही मला गणपतीच्या आदल्या दिवशी हळवे करतात. गेली अनेक वषेर्ं मी गणपती रुग्णालयातच साजरा करतोय. गणपती म्हटला की के. ई. एम. कात टाकते; युनियन्स भांडणे विसरतात.. सारे एकत्र येतात.. आरतीच्या वेळी रुग्णांचे नातेवाईक आणि सर्जन सारेच उभे राहतात. ‘सर, ‘मुझिक’वर लायटिनग करूया,’ ही विनंती मी हळू आवाजात ‘मुझिक’ लावण्याची ऑर्डर देऊन मान्य करतो; आणि सात दिवस रुग्णालयातला तो सर्वात महत्त्वाचा पाहुणा ठरतो.
बुद्धीचा हा एवढा मोठा देव; पण व्यासांसाठी स्टेनो बनण्याची नम्रता त्याने आपल्या आचरणातून दाखवून दिली. भल्यामोठय़ा कानांनी रुग्णालय मॅनेज करताना कोपऱ्या-कोपऱ्यातली कुजबुज टिपण्याची सवय त्याने मला लावली. बारीक डोळ्यांनी सूक्ष्मातले सूक्ष्म निरीक्षण करा, पण कमी बोला. सोंडेचा उपयोग गुण-दोष शोषण्यासाठी आणि सिस्टीममधल्या चुकीच्या गोष्टींना तडाखा देण्यासाठीच! तुटका दातही गोड दिसतो, कारण बाह्य़ रूपापेक्षा आंतरिक बुद्धिमत्ता आणि विचारक्षमता महत्त्वाची! इतरांचे प्रमाद पोटात घेणे आणि स्वत: न केलेल्या चुकांबद्दलही दोषारोप स्वीकारणे, हे डीनचे काम गणपतीच त्याला शिकवतो. डीनचे पोट सुटते ते उगाच नाही!
..या वर्षी मात्र मला त्याला वेगळी विनवणी करायचीय. सहनशक्ती वाढवायला शिकव. सहिष्णुता जोपासायला शिकव. संस्कार हस्तांतरित करायला शिकव. स्वत:चा विचार करण्यापूर्वी दुसऱ्यांच्या नावाचा किमान उच्चार करायला शिकव. कुटुंबाआधी देशाचा विचार करायला शिकव. दहा दिवसांनी जाता जाता वेगाने दौडणाऱ्या आम्हाला थोडेसे थांबून मागे वळून पाहायला शिकव. देवा.. तुम्ही दरवर्षी याच.. कधी नाही इतकी माझ्या लाडक्या देशाला यापुढे तुमची गरज लागणार आहे.