संजय उवाच : ‘देवा गजानना’ Print
alt
डॉ. संजय ओक , रविवार  , ३० सप्टेंबर २०१२

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
हा लेख छापून येईल तेव्हा तुम्ही बहुधा परतण्याचा प्रवासात असाल. तुमच्या पुढे काय मागायचं? आमचं सारं अस्तित्व तुमच्या कृपाप्रसादावर अवलंबून, जगणं महाग आणि मरण स्वस्तं झालंय खरं आजच्या युगात. लांब आयुष्य तरी कशासाठी मागायचं? जेव्हा प्रेम कमी अन् हेवादावा जास्त, जेव्हा आपुलकी आटलेली आणि आप-पर भाव मात्र वाढलेला अशी रोजची अवस्था झालेली; अशा या जगात नेमक्या कोणत्या गोष्टींसाठी हात पुढे पसरायचा? पण मागायची सवय काही जात नाही आणि देणारा दाता तुमच्यासारखा प्रेमळ असेल तेव्हा हात पसरला जाणारच. पण देवा लई नाही मागणं आता!


  रोजचं आयुष्य जगताना दुसऱ्यांचा थोडा विचार करण्याची बुद्धी द्या देवा.
  रोजचं नवं नवं शोधताना दुसऱ्याकडे काही गोष्टी नाहीत याची जाण द्या देवा.
  रोज गडगडून हसताना शेजाऱ्यांच्या डोळयातले अश्रू आम्हाला दिसू द्यात देवा.
  महिन्याकाठी जे काही मिळवत आहे त्यातले थोडे दुखी - पीडितांसाठी बाजूला काढण्याची प्रगल्भता द्या देवा.
  मोबाइलचे मॉडेल बदलताना मोबाइलशिवाय इतरांशी हृदयस्थ वार्ता करण्याची संवेदना द्या देवा.
  मोबाइलने सारे जीवन इम्मोबाइल झाले असताना इतरांना जीवन जगू देण्याची बुद्धी द्या देवा.
  रस्ता ओलांडताना मोबाइल बाजूला ठेवण्याची सूचना द्या देवा.
  बाइकवरून दौडताना हेल्मेट आरशात न अडकवण्याची आज्ञा द्या देवा.
  रस्ता दळणवळणासाठी आहे, र्शयतीसाठी नाही हा सल्ला द्या देवा.
  सण साजरे करताना ऋण न काढण्याची दटावणी द्या देवा.
  बारशापासून बाराव्यापर्यंत साऱ्यांचेच उत्सव करताना इतरांना उपद्रव होणार नाही याची खबरदारी घेण्याची उमज द्या देवा.
  रुग्णालय मंदिराइतके स्वच्छ ठेवण्याची शक्ती द्या देवा.
  व्यसनांपासून चार हात दूर राहण्याची मती द्या देवा.
  आनंदात हुरळून न जाण्याची अन् दुखानं होरपळून न जाण्याची शक्ती द्या देवा.
 गरजा आणि मिळकत याची जुळणी करण्याची युक्ती द्या देवा.
 गमावल्याची खंत करण्यापेक्षा कमावण्याची ऊर्मी द्या देवा.
 स्वत:पेक्षा राज्यावर आणि राज्याहून राष्ट्रावर प्रेम करण्याची इच्छा द्या देवा.
 तुमचा शोध घेण्याची गरज नाही. त्यासाठी राऊळी किंवा मशिदी, चर्च, गुरुद्वारा यांना भेटण्याची गरज नाही, याची सूचना द्या देवा.
 प्रार्थना, अजान किंवा गुरुबाणी ही ओठाएवजी हृदयातून असावी तशी स्फूर्ती द्या देवा.
 अन् जाता जाता परत येण्याचा सांगावा देताना पुढच्या वर्षी हा परिसर, हे राज्य, हे राष्ट्र अधिक सुंदर करून सोडण्याचे वचन आमच्याकडून घ्या देवा.
 तुम्ही आजवर खूप काही दिलेत आता देण्याची पाळी आम्हा भक्तांची आहे देवा.