संजय उवाचा - दो वक्त की रोटी Print

  alt

डॉं. संजय ओक , रविवार , २८ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘सर, १६ ऑक्टोबरला जागतिक ब्रेड दिवस आहे, त्याच्या उद्घाटनाला तुम्ही अगत्याने या,’ आमच्या हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचे विद्यार्थी मला आग्रह करीत होते आणि १६ ऑक्टोबर म्हणजे जागतिक ब्रेड दिवस-  World bread day ही माझ्या ज्ञानात नवीन भर पडत होती.
के. ई. एम. रुग्णालयात काम करताना अनेक वर्षांच्या खंडानंतर चपात्या बनवण्याचे नवीन मशीन तयार करून आम्ही रुग्णांना दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात चपात्या द्यायला प्रारंभ केला होता, हे आठवले आणि माणसाच्या आयुष्यातल्या चटक्यांची साथसंगत करणाऱ्या या भाकरीचं अन् माणसाचं नातं किती जुनं आहे, याची प्रचीती आली.


अनादी काळापासून मानवाला गव्हाची पेरणी ज्ञात होती; पण उगवलेल्या दाण्याचे नेमके करायचे काय, याबाबत मात्र संभ्रम होता. दाणा साठवून ठेवण्याची प्रवृत्ती होती. मेसापोटेमिया आणि इजिप्तमध्ये गहू मुबलक उगवत होता. सुरुवातीला मनुष्य गव्हाचे दाणे जसेच्या तसे दाताने चावून खात होता. काही दाणे भिजत, त्यातून अंकुर फुटत आणि पुन्हा ओंब्या लोंबू लागत. गव्हाचे दाणे भरडून पीठ करायला नंतर प्रारंभ झाला. पिठात पाणी मिसळून त्याचे केकसदृश तुकडे बनवले गेले, ते उन्हात भाजले गेले. ऑस्ट्रेलियामध्ये कोळशाचा वापर होऊन कणकेचे गोळे भाजण्याची पद्धत अनुसरली गेली. ख्रिस्तपूर्व १००० वर्षांत एका घराबाहेर भिजत पडलेल्या गव्हाच्या ओलसर पिठावर बुरशी चढली आणि यीस्टच्या वापरातून फसफसण्याच्या क्रियेला अर्थात  fermentation ला प्रारंभ झाला. या अपघाताने ब्रेड बनविण्याच्या प्रक्रियेला नवा अर्थ आणि तंत्र प्राप्त झाले. इजिप्शियन, रोमन, ग्रीक, अमेरिकन इंडिअन, आशियाई, भारतीय आणि आफ्रिकन संस्कृतींनीही गव्हाला आणि ब्रेडला आपलेसे केले. कुठे त्याने टोर्टिलाचे रूप घेतले तर कुठे चपाती, नान, रोटी आणि मिरालीचे. ब्रेड हा असा उदरभरण्याची यज्ञकर्म- समीधा बनला. रोममध्ये ब्रेड बनविण्याला राजाश्रय मिळाला आणि शासन जनतेला ब्रेड वाटू लागले. एखादी व्यक्ती कोणत्या रंगाचा ब्रेड खाते आहे, यावर तिची सामाजिक पत ठरू लागली. ब्रेड जितका काळपट तितकी व्यक्ती निम्नस्तरीय. पांढरा शुभ्र आटा महाग ठरू लागला. आज चित्र उलटे आहे आणि ब्राऊन ब्रेडला उच्चवर्गीय लोकाश्रय लाभला आहे. फ्रेंच राज्यक्रांती झाली, लोकांची उपासमार झाली, पण जनतेची भूक न जाणवणाऱ्या धुंद राज्यकर्त्यांनी ब्रेडसाठी होणाऱ्या दंग्यांकडे दुर्लक्ष करीत उद्गार काढले- 'Let them eat cake!'
ब्रेडने जगाच्या इतिहासात क्रांती घडविली, राज्यसत्ता उलथून टाकल्या. पांढरा आटा आणि काळपट आटा दळणाऱ्या चक्क्यांची वेगवेगळी युनियन बांधली गेली. १५६१ मध्ये इंग्लंडच्या राणी क्वीन एलिझाबेथ पहिली हिला हस्तक्षेप करून दोघांत समेट घडवावा लागला. ‘द वरशिपफुल कंपनी ऑफ बेकर्स’ची स्थापना झाली. १६६६ मध्ये लंडनला भस्मसात करणारी प्रचंड आग एका बेकरीपासून सुरू झाली आणि तिने साऱ्या बेकरी उद्योगाचे कंबरडेच मोडले. ब्रेड चोरल्याबद्दल निष्कासित केलेले काही आरोपी ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर पाठविले गेले आणि त्यांनी तेथे गहू उद्योग, बेकऱ्या आणि चक्क्य़ा यांचे जाळे विणले. कालांतराने ओव्हनचा शोध लागला, ब्रेड बनविण्याच्या पद्धतीत सुधार झाला, यीस्टचे असंख्य प्रकार हाती लागले आणि ब्रेड नवनव्या चवीत, रंगा-रूपात आपल्यापर्यंत पोहोचू लागला.
'Give us this day our daily bread' ही मध्यपूर्व आणि पश्चिमेतील प्रार्थना आणि ‘वदनी कवळ घेता’ ही आळवणी यातला सामायिक भाव त्या ब्रेडमध्येच एकवटला. ब्रेडवरून अनेक भाषिक वचने आणि उदाहरणे तयार झाली. तकलादू राजकारण्यांची खिल्ली उडविताना रोमन कवी ज्युवेनल याने 'paem et circenses' (bread & circuses) असा प्रयोग केला. इस्रायलमध्ये कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाशी तो 'lekhem, avoda' (bread, work) असा जोडला गेला. ब्रेड हाच जणू  पैसा ठरला. इंग्रजी भाषेतही त्यामुळे 'bread-winner', 'putting bread on table' असे वाक्प्रचार रूढ झाले. कोणत्याही महत्त्वाच्या क्रांतिकारी उपलब्धीचे वर्णन करताना- 'The greatest thing since sliced bread' असा उल्लेख होऊ लागला. रशियात १९१७ साली लेनिनने आपल्या नागरिकांना ‘शांतता, भूमी आणि ब्रेड’ पुरविण्याचे वचन दिले. ब्रेडवर येशू ख्रिस्ताचे क्रॉसचे चिन्ह रेखून मगच तो कापण्याची परंपरा काही पंथांनी स्वीकारली. तो टाकणे महापाप मानले गेले. आज वेगवेगळ्या देशांत, वेगवेगळ्या धर्म-पंथ-जमातीत कधी माण्टो, कधी पुरी, टोर्टिला, माटझो, लोफ, पम्पकिन ब्रेड, बनाना ब्रेड, जिंजर ब्रेड, डोफ, क्रोंशे, क्रोयझंट, पिझ्झा, बोकॅडिलो, बॅग्युएटेस्, ब्रायोचे, लव्हाश, नान, बॅगेल आणि चीझ ब्रेडच्या रूपात तो आपल्याला सादर होतो. ब्रेडने माणसाची क्षुधा-तृप्ती केली आहे आणि त्याच्या जिभेचे चोचलेही पुरविले आहेत. त्याच्या प्रगतीचा तो साक्षीदार आहे. बेकरीच्या तंत्रज्ञान विकासाला त्याने पावला-पावलावर साथ दिली आहे.
‘पापी पेट का सवाल है. इन्सान को और क्या चाहिए सिवा एक दो वक्त की रोटी के!’ या हिंदी सिनेमातला ठरलेला डायलॉग दिलाय, पंचतारांकित हॉटेलात वाइन पिताना त्याने स्वत:ला भाजलेल्या सळयांचे रूप घेऊन ‘ब्रेड-स्टिक्स’ दिल्यात आणि रस्त्यावर राबणाऱ्या, हातगाडी ढकलणाऱ्या सच्च्या मुंबईकराला त्याचा हक्काचा वडा- ‘पाव’ही दिलाय.
प्रश्न एवढाच उरतो की, २३०० वर्षे ख्रिस्तपूर्व काळापासून गहू पिकविणारी इंडस-व्हॅली सिव्हिलायझेशनची संस्कृती आणि वारसा लाभणाऱ्या या माझ्या गौरवशाली देशात एका बाजूला दुथडी भरून वाहणारी गव्हाची गोदामे, भिजलेली पोती, सडलेले गव्हाचे दाणे आणि दुसऱ्या बाजूला पोट खपाटी गेलेले, सुकलेले चेहरे भाकरीसाठी हात पसरताना दिसतात, तेव्हा निर्मितीत नाही, पण वितरणात आमचं बरंच काही चुकतंय, हे टोचत राहतं. ‘वर्ल्ड ब्रेड डे’च्या निमित्ताने ब्रेडला सलाम करताना तो समाजात साऱ्यांपर्यंत पोहोचेल यासाठी काम करण्याची शपथ घेऊ या.