संजय उवाच : ॐ धन्वंतराय नम: Print

डॉं.संजय ओक, रविवार ११ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

दिवाळीचा प्रारंभ म्हणजे धन्वंतरी पूजन. हिंदू धर्मानुसार प्रत्येक सणाच्या प्रत्येक दिवसाला एक आगळे महत्त्व आहे. धन्वंतरी हा तर देवांचा वैद्य. क्षीरसागराच्या मंथनातून समुद्रातून निर्माण झालेला. मंदार पर्वताची रवी.. वासुकी सर्पाची दोरी.. अमृतकुंभाच्या प्राप्त्यर्थ वेडावलेले देव-दानव आणि सागराच्या उदरातून बाहेर पडणारी अमोल रत्ने.. ऐरावत, लक्ष्मी आणि तिच्यापाठोपाठ तिचा सहोदर धन्वंतरी. निळसर क्रांती, चतुर्भुज, पीळदार शरीरयष्टी.. आणि चारही हातांत वैद्यकाची चार प्रतीके.. रक्तपिती जळू, अमृतकुंभ, शंख आणि चक्र. मला या संपूर्ण उत्पत्तीचा परामर्श आजच्या आरोग्यव्यवस्थेच्या परिघात शोधायचा आहे.
धन्वंतरी हा बोलून-चालून महाविष्णूचा अवतार. त्यामुळे समुद्रमंथनातून बाहेर आलेल्या प्रतिमेच्या एका हातात चक्र आहे. चक्र म्हणजे ऊर्जा. रुग्णाला बरे करायचे तर ऊर्जा आवश्यक. अगदी दोन अश्म एकमेकांवर घासून निर्माण केलेली उष्णता रक्त वाहताना थांबविणाऱ्या वैद्यकाने पुढे ऊर्जेची नाना रूपे धारण केली. पट्टय़ाने दाब देणे, इलेक्ट्रिसिटी- डायथर्मी; पाण्याचा प्रचंड वेग असणारे वॉटर जेट, लेझर किरण आणि अल्ट्रासाऊंड ध्वनिलहरी. यकृताचे विभाजन करताना वॉटर जेट कामी येऊ लागले, तर डोळ्यातला मोतीबिंदू काढताना Phaco-emulsifier,गर्भाशयातल्या फ्रायब्रॉइडवर  हाय इन्टेन्सिटी अल्ट्रासाऊंड उपयोगी पडू लागला, तर कधी आतले अस्तर मायक्रोवेव्हनी भाजून काढून रक्तस्राव थांबविणे शक्य होऊ लागले. प्रोस्टेट ग्रंथींचा कॅन्सर, डोक्यातले आजार, पार्किनसोनिझम, अपस्माराचे झटके अशा दुर्धर आजारांवर लेझर, अल्ट्रासाऊंडचा वापर सुरू झाला. हृदयाच्या धमन्यांमधील गाठी काढून रक्तप्रवाह पूर्ववत करण्याच्या कामी ‘फेम्टोसेकंड लेझर’ या अतिशक्तिशाली, अल्पक्षणी लेझरचा वापर आता होतो आहे. उद्याच्या भविष्यात बायपास सर्जरी आणि अ‍ॅन्जिओप्लास्टी स्टेन्ट्सना हा पर्याय उपयुक्त ठरेल, अशी लक्षणे दिसू लागली आहेत. हे सारे ऊर्जेचेच नवे स्रोत आहेत.
धन्वंतरीच्या दुसऱ्या हातात आहेत रक्तपित्या जळवा. विषाणूंचा प्रभाव कमी करण्यासाठी दूषित रक्त वाहण्याची संकल्पना जवळजवळ सर्वच वैद्यकसत्तांमध्ये पूर्वापार राबविली गेली आहेत. रक्तील विषद्रव्यांचे प्रमाण वाढल्यावर निर्माण होणारी Septicaemia आणि ‘मल्टिपल ऑर्गन फेल्युअर’ची गुंतागुंत वेळीच रोखण्यासाठी , रक्तशुद्धीकरणासाठी आज आपण हिमोडायलिसिसचा पर्याय वापरतो, पण ही संकल्पना योग्य वेळीच वापरण्यासाठी तिची सुविधा फार मोठय़ा प्रमाणावर राज्यात ठिकठिकाणी कार्यान्वित करणे गरजेचे आहे. डायलिसिस करणारे तंत्रज्ञ आणि देखरेख ठेवणारे एम.डी. (मेडिसीन) आणि डी. एम.(नेफ्रॉलॉजी) हे डॉक्टर अधिक संख्येने सर्वदूर उपलब्ध करण्यासाठी या शाखांच्या सीट्स वाढायलाच हव्यात. एम.बी.बी.एस. झालेल्या डॉक्टरला एक वर्षांचा डिप्लोमा अभ्यासक्रम शिकवून त्याला डायलिसिस शास्त्रात प्रगत करणे शक्य आहे. असे प्रशिक्षण घेतलेला डॉक्टर, तंत्रज्ञ आणि संयंत्र वेगवेगळ्या आय.सी.यू.मध्ये आणि शहरात ठिकठिकाणी उभारलेल्या डायलिसिस सेंटर्समध्ये कार्यरत व्हावेत. डायलिसिसची सेवा मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून घरी अंथरुणाला खिळलेल्या रुग्णापर्यंत पोहोचविणे हे आपले उद्दिष्ट असावे. धन्वंतरीला अभिप्रेत असलेला ‘जलौघां’ चा संदर्भ हा असा रक्त शुद्धीकरण प्रक्रियेशी जोडला जायला हवा. शासकीय-खासगी क्षेत्रांना एकत्रपणे काम करण्याचे हे उत्तम क्षेत्र आहे, असा माझा विश्वास आहे.
धन्वंतरीच्या काही प्रतिमांमध्ये एका हातात औषधी वनस्पतीची जुडी आहे. हळदीचे महत्त्व विशद करणारा अनेक औषधांचा वनस्पतीजन्य जन्म आणि कर्मकहाणी सांगणाऱ्या या पुरुषोत्तम धन्वंतरीचा पुनर्विचार करताना मला जेनेरिक मेडिसीन्स, हर्बल उत्पादने यांच्या अधिक प्रात्यक्षिक उपयोगावरच भर देणे अपेक्षित आहे. पाच पट किमतीचे ब्रॅण्डेड औषध अर्धवट घेऊन किंवा अजिबात न घेऊन गुंतागुंत वाढविण्यापेक्षा एकपंचमांश किंमत असलेले, साध्या पॅकेजमधले गुणकारी जेनेरिक औषध नाकारण्याचा करंटेपणा आधुनिक वैद्यकाने करू नये. कारण तो धन्वंतरीचा उपमर्द आणि समाजकल्याणाचा अपमान ठरेल.
काही प्रतिमांमध्ये धन्वंतरीच्या हातात आयुर्वेदाची पोथी आहे. तो आयुर्वेदाचा जनकच आहे. पिकते तेथे विकत नाही हा सिद्धान्त दुर्दैवाने आयुर्वेदाबाबत खरा ठरला आहे. इण्डियन मेडिकल काऊन्सिल ³FZ दुराग्रह सोडून आयुर्वेदाच्या सप्रमाण सिद्ध झालेल्या तंत्राचा स्वीकार करून अ‍ॅलोपथी समृद्ध करणे गरजेचे आहे. एमबीबीएस ही इंग्रजांची देणगी आहे, पण आपण बीआयएमएसचा संयुक्त अभ्यासक्रम करणे, आयएएस, आयपीएसच्या धर्तीवर आयएचएस (इण्डियन हेल्थ सव्‍‌र्हिस)ची उभारणी करणे ही धन्वंतरीला वाहिलेली खरी आदरांजली ठरेल.
धन्वंतरीच्या तिसऱ्या हातातील शंखाकडे संपूर्ण वैद्यकसत्तेने जागरूकतेने पाहावयास हवे. शंख हा प्रबोधनाचे प्रतीक आहे. मलेरिआ, डेंग्यू, कावीळ, वाढते कर्करोग, रस्ते-रेल्वेचे अपघात या सर्वावर परिणामकारक उपाययोजनांचे प्रकल्प राबविताना कोणत्याही डॉक्टरने प्रबोधन करणे थांबवू नये. पथनाटय़े, कीर्तन, पोवाडे, गोंधळ, जागर, नाटय़छटा, नाटक, काव्य, सिनेमा, इंटरनेट, यू टय़ूब आणि पुढे जी जी नवी प्रसारमाध्यमे हाती येतील त्या सर्वाचा वापर करून आरोग्याचा प्रसार आणि प्रचार करावयास हवा. अन्यथा वैयक्तिक आरोग्य उत्तम आणि सार्वजनिक आरोग्यात नापास, अशी स्थिती होईल. कोणीही, कितीही मोठा सुपरस्पेश्ॉलिस्ट डॉक्टर असला तरी या कर्तव्याला पर्याय नसावा. कुलगुरूची वस्त्रे स्वीकारल्यावरही मला ए.पी.एम.सी. मार्केटमध्ये आरोग्य कॅम्पमध्ये सहभागी व्हावेसे वाटले ते याच भावनेतून. आरोग्य शिक्षणाचा शंख फुंकण्यासाठी इतर सारी कवच-कुंडले बाजूला ठेवावीत आणि रुग्णाशी थेट नाते जोडावे, हेच उत्तम.
राहता राहिला अमृत-कुंभ. अमरत्वाचे प्रतीक. किती जगलात यापेक्षा जास्त कसे जगलात हे महत्त्वाचे. मधुमेह, कंप, पक्षाघात, मूत्रपिंड-विकार, अल्झायमर्स किंवा पार्किन्सन्स आणि बायपास का स्टेन्ट्स.. असे जगण्यासाठी का हवाय तो कुंभ? या सगळ्या आजच्या युगातल्या ‘मोहिनी’ आहेत, हे लक्षात घ्यावयास हवे आणि जगण्याची परिमाणे ठरवावयास हवीत.
धन्वंतरीची मंदिरे अभावाने आढळतात. ती दक्षिणेत केरळमध्ये प्रामुख्याने आहेत आणि त्याचा उत्सव किंवा सण साजरा होत नाही. कारण या आरोग्यदेवतेला षोडशोपचार पूजा अभिप्रेत नाही. त्याला हवी आहे नि:स्वार्थ वृत्तीने केलेली सामाजिक वैद्यकसेवा. चला तर मग, आगामी वर्षांत ती पूजा बांधू या.