रसग्रहण : कर्ण समजून घेताना.. Print

अभय जोशी,रविवार, २३ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

महर्षी  व्यासांनी ‘महाभारत’ लिहिल्यानंतर गेली हजारो वर्षे त्यावर अनेक प्रकारे उलटसुलट खल, चर्चा, लिखाण सुरू असून, महाभारताचा व्यापक वेध अजूनही संपलेला नाही. महाभारतात श्रीकृष्ण, भीष्म, धृतराष्ट्र, गांधारी, कुंती, द्रौपदी, युधिष्ठिर, अर्जुन, भीम, दुर्योधन, कर्ण, शकुनी आदींनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्या- त्या भूमिकेतील त्यांचे वर्तन प्रसंगानुरूप साजेसेच होते. या सर्वामध्ये वादग्रस्त ठरला तो महारथी कर्ण. कर्णाला आजही ‘दानशूर’ म्हणून ओळखले जाते. परंतु सबंध आयुष्यात कर्णाने ज्या अनेक भूमिका बजावल्या, त्यावर अद्यापि टीकाटिप्पणी सुरू असते. काहीजण कर्णाला क्षमतावान, कर्तृत्ववान, हुशार, शूर, लढवय्या, आत्यंतिक दानशूर असूनही परिस्थितीवश नशिबाच्या दुर्दैवी फेऱ्यात अडकलेला एक योद्धा समजतात. तर काहीजणांच्या मते, हे सर्व गुण अंगी असूनही केवळ अहंगंड बाळगणारा, गर्विष्ठ आणि काही अंशी भित्रा असे अत्यंत टोकाचे गुण असलेला असा कर्ण होता. ‘मी कोण?’ या प्रश्नाच्या फेऱ्यात अडकलेला कर्ण आयुष्यभर कायम गोंधळलेलाच होता. आणि या गोंधळलेपणामुळे त्याच्यातल्या चांगल्या गुणांचीही माती झाली, असेही काहींचे मत आहे. अशा या कर्णावर मराठीत गेल्या ५० वर्षांत विविधांगी लेखन झालेले आहे. शिवाजी सावंत यांची ‘मृत्युंजय’ तसेच रणजित देसाईंची ‘राधेय’ कादंबरी, दाजी पणशीकरांचे ‘कर्ण खरा कोण होता?’, आनंद साधले यांचे ‘महापुरुष’, रा. शं. वाळिंबे यांचे ‘राधेय कर्ण’, वि. वा. शिरवाडकर यांचे ‘कौंतेय’ हे नाटक, गो. नी. दांडेकरांचे ‘कर्णायन’ आदी पुस्तकांखेरीज अन्य काही लेखकांनीही कर्णाच्या जीवनाचा आढावा घेणारे लेखन केलेले आहे. कर्णावर टीकात्मक लेखन करणाऱ्या लेखकांनी- ‘केवळ अहंकार आणि गर्विष्ठपणामुळेच कर्णाच्या गुणांकडे लक्ष न जाता त्याच्या अवगुणांनी त्याचे नुकसान झाले,’ असा निष्कर्ष काढलेला आहे.
अशा या कर्णाच्या समग्र जीवनाचा वेध घेणारा माधुरी सप्रे यांचा ‘कर्ण- महापुरुष की खलपुरुष?’ हा अभ्यासपूर्ण ग्रंथ अलीकडेच प्रसिद्ध झाला आहे. या ग्रंथाचे दोन भाग असून, पहिल्या भागातील २० प्रकरणांतून लेखिकेने स्वत:च्या नजरेतून कर्णजीवनाचे अवलोकन केले आहे. तर दुसऱ्या भागात उपरोक्त लेखकांनी कर्णाच्या रंगविलेल्या जीवनाचा आढावा घेण्यात आलेला आहे. कर्णाचे आयुष्य, त्याच्या जन्माची पाश्र्वभूमी, त्याच्या वाटय़ाला आलेली खडतर परिस्थिती, द्रौपदीने कर्णाला नाकारणे, कर्ण-श्रीकृष्ण, कर्ण-कुंती, कर्ण-भीष्म भेटींमध्ये झडलेले संवाद- ज्यामुळे महाभारतात कुरूक्षेत्रावरील युद्धाला मिळालेली कलाटणी, कर्णाने कुंतीला ‘मी किंवा अर्जुन सोडून तुझे पाच पुत्र जिवंत राहतील’ असे दिलेले आश्वासन, किंवा ‘युद्धोत्तर मी दुर्योधनालाच राज्य देईन. परंतु त्याच्यापेक्षा युधिष्ठिरच राज्य करण्यास योग्य आहे,’ हा कर्णाने कृष्णाला प्रत्यक्ष भेटीत दिलेला सल्ला आदी घटना-प्रसंगांची विस्तृत माहिती या ग्रंथातून आपल्याला मिळते. महाभारतासंबंधी आपण नेहमी ऐकलेल्या गोष्टींखेरीज आपल्याला काही प्रमाणात माहीत नसलेल्या गोष्टीही या ग्रंथात दिलेल्या आहेत. उदा. कर्णाने श्रीकृष्णास दिलेला वरील सल्ला (पान क्र. ८९), किंवा ‘युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव यांना तर मारणार नाहीच; परंतु अर्जुनालाही मी संग्रामात मारणार नाही,’ हे कर्णाने कुंतीला दिलेले आश्वासन (पान क्र. १०१) आपल्याला चकित करून जाते. ‘माते, शेवटी तुझे पाच पुत्र राहतील..’ या प्रकरणात शेवटी लेखिका ‘पांडवद्वेषाचे प्रायश्चितच कर्णाने अखेर घेतले. आणि त्याने लढताना जो पराक्रम केला तो ज्यासाठी हे युद्ध उभे केले, ते उद्दिष्ट बाजूला ठेवूनच!’ असा निष्कर्ष लेखिकेने काढला आहे. महाभारतात आधी कर्ण जे वागत होता, त्याचे कारण या ठिकाणी स्पष्ट होते. ‘लायकी असूनही केवळ संस्कारांअभावी माणसाचे वर्तन निराळे होते, संस्कारच माणसाची जडणघडण करतात,’ असे मत लेखिकेने मांडले आहे.
स्वत: कर्ण प्रयत्नपूर्वक श्रेष्ठत्वाला पोहोचण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु नशीब म्हणा किंवा अन्य काही कारणांनी- त्याची जात, त्याचे सूतपुत्रत्व आड येते असे आपल्याला वरकरणी वाटत असले तरी त्याला अनेकदा संधी मिळालेल्या होत्या, हे नाकारता येत नाही. ब्रह्मास्त्र मिळविण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न, द्यूताच्या प्रसंगातील कर्णाचे वर्तन, घोषयात्रेप्रसंगी कर्णावर झालेला पलायनाचा आरोप आदी घटनांची कर्णाच्या जीवनावर कायमची काळी छाया पडलेली दिसते. तर इंद्राला केलेले कवचकुंडलांचे दान, कर्णाचा दिग्विजय, श्रीकृष्णाच्या भेटीत कर्णाचे वर्तन या घटनांनी कर्णाचे जीवन उजळून निघालेले दिसते. परंतु एखाद्या शापित यक्षाप्रमाणे कर्णाचे जीवनही शापित होते की काय, असे वाटल्यावाचून राहत नाही. या सर्व घटनांचा वेध घेण्याचा प्रयत्न माधुरी सप्रे यांनी या ग्रंथाद्वारे केला आहे. महाभारताचे युद्ध घडवून आणण्यास कर्णच जबाबदार होता.. ही जबाबदारी त्याच्यावर येते की नाही, याचं उत्तरही यातून काही अंशी मिळते.
या ग्रंथाच्या दुसऱ्या भागात विविध लेखकांनी कर्णजीवनावर केलेल्या लेखनाचा परामर्श घेण्यात आलेला आहे. कर्णासंबंधी या मंडळींनी केलेले लिखाण आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. कर्ण ही व्यक्तिरेखा कायमच वादग्रस्त ठरलेली आहे. कर्णाबद्दल आजही टोकाची मते व्यक्त केली जातात. म्हणूनच माधुरी सप्रे यांनाही या ग्रंथाचे नाव ‘कर्ण महापुरुष की खलपुरुष?’ असे ठेवणे सयुक्तिक वाटले असावे. कर्ण ही व्यक्तिरेखा पुढच्या काळात भारतीय समाजमनाचे प्रतीक ठरली. आजही आपल्यात असंख्य कर्ण वास्तव्यास आहेत, असे एकदा वाचनात आले होते. कर्ण हा नेमका कोण होता, त्याचे निर्णय बरोबर होते की नाही, या प्रश्नांच्या उत्तरांबरोबरच एकूणच ‘कर्ण’ समजावून घेण्यास हा ग्रंथ नक्की उपयुक्त ठरेल ..
‘कर्ण : महापुरुष की खलपुरुष?’- माधुरी सप्रे, प्रसाद प्रकाशन, पुणे, पाने- ३६५, किंमत- ३०० रुपये.