रसग्गहण : महानुभाव पंथ समजून घेताना... Print
alt
रविवार  , ३० सप्टेंबर २०१२

बाराव्या शतकातील चक्रधरस्वामी व त्यांनी स्थापन केलेला महानुभाव संप्रदाय काहीसा दुर्लक्षित राहिला. पण अभ्यासक व संशोधकांच्या अथक प्रयत्नांनी हा संप्रदाय प्रकाशात आला. या संप्रदायातील मंडळींनी विपुल लेखन केले आहे. परंतु  महाराष्ट्राने त्याची नीट दखल घेतली नाही. मोजक्या मंडळींनी त्याकडे महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यात संशोधक शं. गो. तुळपुळे यांचं कार्य मोलाचं आहे.
हा संप्रदाय जरी दुर्लक्षित राहिला तरीही त्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि साहित्यिक इतिहासात मोलाची भर घातली आहे. या संप्रदायात विद्वान, अभ्यासक, चर्चकांची मांदियाळी होती;  तशीच स्त्री-पुरुष समानताही होती. हा संप्रदाय आधुनिक विचारसरणीची धुरा वाहणारा होता. या पाश्र्वभूमीवर डॉ. श्रीधर आकाशकर यांचे ‘महानुभावांचे योगदान’  व प्रभाकर वैद्य यांचे ‘चक्रधर’ ही पुस्तके चक्रधरस्वामी व त्यांचा महानुभाव पंथ यांची ओळख करून देण्यात मोलाची भर घालतात.


‘महानुभावांचे योगदान’ या पुस्तकात लेखकाने सुरुवातीला पाश्चात्य व भारतीय अर्थनिर्धारणशास्त्रीय परंपरेची ओळख करून दिली आहे. त्यात सॉक्रेटिस, प्लेटोपासून ते शालमाकर, ऑगस्ट बोईख, कांट, हुसेल, मार्टिन होयडेगर, पॉल रिकर यांचे विचार मांडले आहेत. पुढे भारतीय अर्थनिर्धारणशास्त्रीय परंपरेत भारतीय मीमांसाशास्त्राविषयीचे सखोल विश्लेषण केलेले आहे. पुढे या शास्त्राची पायाभरणी करणारे चक्रधरस्वामी व त्यांच्या संप्रदायाची लेखकाने माहिती दिली आहे. अर्थनिर्धारणशास्त्र परंपरेतील महानुभावांचे स्थान आणि योगदान यांचे नेमके विश्लेषण या पुस्तकात आढळते.
या पुस्तकाची मांडणी जरी तात्त्विक असली तरीही ती सोप्या पद्धतीने केलेली आहे. या पुस्तकातून महानुभावांचे मराठी साहित्य आणि त्यातील योगदान यावर लेखकाने प्रकाश टाकला आहे. साहित्य व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक महत्त्वाचे ठरावे.
‘चक्रधर : संतांनीसुद्धा वाळीत टाकलेला संतश्रेष्ठ’ हे प्रभाकर वैद्य यांचं पुस्तक महानुभाव पंथ व चक्रधरस्वामी समजून घेण्यास अधिक मदत करतं. महाराष्ट्राच्या संतपरंपरेत चक्रधरांचं नाव क्वचितच घेतलं जातं. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक-सामाजिक इतिहासात वारकरी संप्रदायाप्रमाणेच महानुभाव पंथाचं कामही मोलाचं आहे. चक्रधर हे परंपरेविरुद्ध बंडखोरी करणारे होते. त्यांनी वेदप्रामाण्याला झिडकारले. स्त्री, शूद्रांनाही संन्यासधर्म खुला केला. चक्रधरांच्या दृष्टीने माणूस हा एकच वर्ण कसा होता आणि स्त्रियांनाही त्यांनी समानतेची वागणूक कशी दिली, याविषयीचे पुस्तकातील विवेचन या पंथाविषयीचे आधुनिक विचार अधोरेखित करते. महानुभाव पंथाच्या या समानतेच्या वागणुकीला सनातन्यांचा प्रखर विरोध होणे साहजिकच होते. त्यातून या पंथाला विरोध झाला व हा पंथ समाजापासून दूर गेला. चक्रधरांना तर देहदंडाला सामोरे जावे लागले.  
महानुभाव पंथाच्या साहित्यसंपदेचा विचार करता या पंथातील आधुनिक विचारसरणी त्यांच्या साहित्यात प्रकर्षांने डोकावताना दिसते. ‘लीळाचरित्र’ हा मराठीतील आद्य गद्यग्रंथ. चक्रधरांचे नि:संकोच निवेदन हे मराठी साहित्यातीलच नव्हे, तर जगातील वेगवेगळ्या धर्म व पंथ संस्थापकांच्या इतिहासात अपूर्व ठरावे, असे मत लेखक मांडतात. प्रांजळपणा, सच्चेपणा, निरागसपणा हे चक्रधरांच्या निवेदनातील महत्त्वाचे गुण. महानुभवी साहित्यात मराठी भाषेचे सौंदर्य आणि सामथ्र्य विशेषत्वाने जाणवते, हे सांगताना लेखकाने हेही नमूद केले आहे की, बोलीभाषेतच लिहिण्याचे सक्त आदेश या पंथातील ग्रंथकारांना होते. पुढे सनातन्यांकडून या पंथातील ग्रंथांवर बंदीआदेश निघाल्याने सांकेतिक लिपीचा आश्रय घेतला गेला. त्यामुळे हे साहित्य लोकांपर्यंत फारसे पोहोचू शकले नाही. या पंथात लीळाचरित्राबरोबरच सूत्रपाठ, रुक्मिणी-स्वयंवर, शिशुपालवध, धवळे अशी महत्त्वपूर्ण गं्रथसंपदा आढळते.
सनातन्यांचा प्रखर धर्मवाद या पंथास मारक ठरला. महानुभाव पंथ समाजापासून दुर्लक्षित राहिला तरी त्याचे योगदान मोठे आहे. या पुस्तकांमधील महानुभाव पंथाविषयीची सामाजिक, सांस्कृतिक पाश्र्वभूमी समजून घेत असतानाच या पंथाचे तत्त्वज्ञान व साहित्यातील योगदान अधोरेखित होत जाते.
‘महानुभावांचे योगदान’- डॉ. श्रीधर आकाशकर, स्नेहवर्धन प्रकाशन, पृष्ठे-१६२, मूल्य- १५० रुपये. ‘ चक्रधर : संतांनीसुद्धा वाळीत टाकलेला संतश्रेष्ठ’- प्रभाकर वैद्य,  लोकवाड्.मय गृह प्रकाशन, पृष्ठे-८४, मूल्य-५० रुपये.
लता दाभोळकर
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it