रसग्रहण : एक धगधगता जीवनप्रवास Print

प्रदीप राजगुरू , रविवार ,७ ऑक्टोबर २०१२
alt

वॉशिंग्टन शब्द उच्चारताच जागतिक महासत्तेचा युगपुरुष (जॉर्ज वॉशिंग्टन) व त्याच्या नावाने दिमाखात मिरवणारी महासत्तेची राजधानी डोळ्यासमोर तरळते. परंतु ‘वॉशिंग्टन’ नाव धारण केलेला दुसराही एक स्वयंप्रकाशित तारा कितीजणांना माहीत आहे? डॉ. बुकर टी. वॉशिंग्टन त्याचे नाव. बुकर टी. यांचे जीवनही जॉर्जच्या कर्तृत्वाचा वारसा सांगणारे आहे. या कर्तृत्वाचा, त्याच्या जीवनचरित्राला दिलेला उजाळा नव्या पिढीला निश्चितच प्रेरणादायी ठरेल. हीच गरज ओळखून कॅ. परशुराम गोखले  यांनी बुकरविषयी प्रसिद्ध झालेल्या वेगवेगळ्या चरित्रात्मक ग्रंथांचा धांडोळा घेत बुकरचे व्यक्तिमत्त्व पुस्तकरूपाने मराठी वाचकांसमोर ठेवले आहे. केवळ एका पिढीचा वा विशिष्ट समाजाचा (निग्रो) नव्हे, तर प्रगतीच्या वाटेवर स्वत:ची ओळख निर्माण करून काळाच्या प्रवाहाबरोबर धावू पाहणाऱ्या अप्रगत, मागास, उपेक्षित वर्गाचा प्रतिनिधी, प्रणेता बनून या अवलियाने शिक्षणक्षेत्रात पर्वताएवढे कार्य नेटाने उभे केले. त्याचे चरित्र अभ्यासताना या क्षेत्रात आधारवड ठरलेल्या, संतपदास पोहोचलेल्या तपस्वींविषयी वाचकांच्या मनात स्वाभाविकपणे आदराची भावना निर्माण होते. अमेरिकेसारख्या देशात तत्कालीन विषमतेच्या, सरंजामशाही व्यवस्थेत गुलामाचे जिणे जगावे लागलेल्या उपेक्षित स्त्रीच्या या गुलाम पुत्राची- बुकरची (१८५६-१९१५) ही यशोगाथा.
गुलामीत जीवन जगणाऱ्या आपल्या आईबरोबर शेतात काबाडकष्ट करून हा मुलगा स्वत:च्या बळावर, अंगमेहनतीच्या जोरावर अपार जिद्दीने खरोखरच दुष्प्राप्य ठरलेले शिक्षण घेतो आणि पुढे जाऊन अमेरिकेचे अध्यक्ष, ज्येष्ठ राजकारणी व उद्योगपती यांचा जवळचा मित्र होतो, याची एखाद्या चित्रपटाच्या वेगवान कथानकाप्रमाणे सरणारी कहाणी वाचताना थक्क व्हायला होते. महान व्यक्तीचा जीवनपट किती विलक्षण झपाटल्यासारखा असतो, याची साक्ष यावरून पटते.
प्रबळ इच्छाशक्तीला जिद्दीचे व सुयोग्य दिशादायी प्रयत्नांचे अमृत लाभल्यावर आकाशही कवेत यावे, असे या बुकरचे जीवनचरित्र आहे. निग्रो असलेल्या बुकरची गोष्टच वाखाणण्याजोगी. निग्रोंकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बराच सकारात्मक झाला असला, तरी समानतेच्या लढाईत अजून खूप काही पल्ला गाठायचा आहे, असे वाटते. परंतु विषमता, गरिबी, उपेक्षा वगैरे दलदलीच्या अंधारातून या वर्गाला समृद्धीचा कवडसा गवसला आहे, हेही नसे थोडके. अमेरिकेच्या अध्यक्षपदी बराक ओबामा यांच्यासारख्या व्यक्तीला विराजमान करून या लढय़ातला कळसाध्याय गाठला गेल्याचे मानले जाते. म्हणूनच राजकीय क्षेत्रात पुढे येऊन नवे काही अजोड करून दाखविणाऱ्या कृष्णवर्णी लोकांचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून बुकर यांच्यासारख्यांचे जीवनचरित्र नव्या पिढीने अभ्यासलेच पाहिजे.
बुकरने सुरू केलेल्या टस्कगी शाळेचे उदाहरण प्रमाण मानून महाराष्ट्राचे थोर शिक्षणमहर्षी कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांनी गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी रयत शिक्षण संस्थेत ‘कमवा व शिका’ ही यशस्वी योजना सुरू केली. आज ही योजना गरीब उपेक्षित निराधार विद्यार्थ्यांच्या जीवनात शाश्वत भविष्याविषयीची गुरूकिल्ली ठरली आहे.
१८६१च्या एप्रिलमध्ये अमेरिकेत वांशिक भेदाविरुद्ध युद्धाला तोंड फुटले आणि वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी बुकरला ब्युरोजच्या मळ्यावरून गुलाम म्हणून विकत घेण्यात आले. चारच वर्षांनी, १८६५ला युद्धाची समाप्ती होऊन बुकर व त्याचे सर्व बांधव गुलामीतून मुक्त झाले. आई व दोन लहान भावंडे यांच्यासमवेत या मंडळीने माल्डेनला प्रस्थान ठेवले. तेथे कोळशाच्या व मिठाच्या खाणीवर काम करताना शिकण्यासाठी रात्रशाळेत दाखल होणे. परंतु इतके सहज शिक्षण थोडेच घेता येणार होते? म्हणून मग मोठय़ा कष्टाने मिनतवारीने आप्तांना सोडून एकटय़ाने दूरवर हॅम्प्टन येथे जाऊन पदवीचे शिक्षण घेण,माल्डेनच्या शाळेत शिक्षकाची नोकरी, वॉशिंग्टन डी. सी. व लॉर्ड सेमिनरी येथे १८ महिन्यांसाठी शिक्षण, हॅम्प्टन येथील शाळेत रेड इंडियन्स मुलांना शिकवणे, वयाच्या २५व्या वर्षी टस्कगी येथे जुन्या चर्चमध्ये शाळा सुरू करणे.. असा त्याचा जीवनपट पुस्तकात रेखाटण्यात आला आहे. ‘दि स्टोरी ऑफ माय लाइफ अँड वर्क’ आणि ‘अप फ्रॉम स्लॅव्हरी’ ही बुकरची दोन आत्मचरित्रे प्रसिद्ध आहेत.
गोखले यांचे पुस्तक बुकरवरील चरित्रात्मक पुस्तक असल्याने आजच्या भाषेत सेलिब्रिटी वा नायक म्हणून बुकर आपल्यासमोर उभे राहतात. चरित्रात्मक पुस्तकाचा हेतू लोकोत्तर पुरुषाला नायक म्हणून समोर ठेवण्याचा असतो. साहजिकच त्याचे काही गुणदोष मान्य केले, तरी ते झाकोळले जाण्याची शक्यता गृहित धरली जाते. तरीही या नायकांचे कार्य व त्याची महती लपून राहू शकत नाही. डॉ. बुकर यांचे चरित्र वाचताना ही पूर्वपीठिका महत्त्वाची. संपूर्ण पुस्तकात बुकर यांच्याशी संबंधित विविध कृष्णधवल छायाचित्रे प्रसंगानुरूप टाकल्याने पुस्तक रंजक झाले आहे.  
 ‘बुकर टी. वॉशिंग्टन’-  कॅप्टन परशुराम गोखले, प्रकाशक- आशिष गोखले, औरंगाबाद, पृष्ठसंख्या- १२०, किंमत- १३० रुपये.