रसग्रहण : तमाशाकलेची नवी मांडणी Print

लोकनाथ यशवंत , रविवार ,२१ ऑक्टोबर २०१२
alt

अस्सल मातीतून जन्माला येणारी कुठलीही कला असो- ती तिथल्या भौगोलिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिवेशाच्या अवकाशातूनच जन्माला येते. विशेषत: लोककलांच्या परंपरेला तर हे परिमाण लावल्याशिवाय त्यांचा विचारच होऊ शकत नाही. यासंदर्भात महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा समृद्ध वारसा खरोखरच अभ्यसनीय आहे. ‘तमाशा’ हा शब्द उच्चारला तरी कानात ढोलकीवरची थाप आणि घुंगरांचा नाद घोळू लागतो. गण, गवळण, बतावणी, लावणी, वगनाटय़ अशा चढय़ा क्रमाने जेव्हा तमाशा उत्तरोत्तर रंगत जातो, तेव्हा रात्र कधी सरते याचं भान आजही ग्रामीण भागातल्या शेतकरी, कष्टकरी माणसांना राहत नाही. तमाशा हा ग्रामीण मातीतला, ग्रामीण माणसांचा अस्सल मनोरंजन व प्रबोधनाचा कलाविष्कार आहे. तमाशातले कलावंत हे गावगाडय़ाचाच भाग असल्याने या कलेला ग्रामीण भागात लोकाश्रय मिळणे क्रमप्राप्तच होते. आज काळाच्या रेटय़ाने मनोरंजनाची अनेकविध साधने पुढे आली आहेत. त्यामुळे या कलेला आपल्या अस्तित्वाच्या लढय़ासाठी आज वेगवेगळय़ा पातळ्यांवर लढावे लागते आहे.
आज तमाशाची कला तगण्यासाठी जसे आíथक पाठबळ महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे या कलेची ऐतिहासिक मांडणी आणि त्यातील वाङ्मयीन मूल्यांची जपणूक व संवर्धनाचीही गरज आहे. महाराष्ट्रात मुळात तमाशा जन्मला आणि जगवला तो या मातीतल्या अस्सल बहुजन कलावंतांनी! मधल्या काळात कलेच्या इतिहासात सोयीने केवळ उच्चवर्णीय तमासगिरांचीच नावं नोंदवून बहुजन वर्गातल्या कलावंतांची उपेक्षा केली होती. त्यांना पुन्हा प्रकाशात आणून या सांस्कृतिक संवर्धनाच्या साठय़ाच्या मुळाशी नेमकी कोणती कलावंतांची फळी काम करतेय, याबद्दलची पुनर्माडणी डॉ. मंगेश बनसोड यांनी त्यांच्या ‘तमाशा : रूप आणि परंपरा’ या संशोधनपर पुस्तकात केली आहे.
महाराष्ट्रात तमाशा या लोककलाप्रकाराची सुमारे सव्वादोनशे वर्षांची परंपरा आहे. एकीकडे अभिजन वर्गातील शाहिरांनी शृंगारिक, पौराणिक, आध्यात्मिक अशा विविध विषयांवर लावणीरचना केली, तर दुसऱ्या बाजूस महात्मा फुले यांच्या विचारप्रेरणेतून सत्यशोधकी जलशाचा जन्म झाला. शाहीर गोपाळबाबा वलंगकर, किसन फागुजी बनसोड या शाहिरांनी आंबेडकरी जलशांतून समाजप्रबोधनाचे काम केले. शाहीर भीमराव कर्डक, केरुबुवा गायकवाड ते वामनदादा कर्डक अशी भीमशाहिरांची मोठी परंपरा आंबेडकरी जलशांना लाभली. परंतु बहुजन वर्गातील या प्रतिभावान शाहिरांचा साधा नामोल्लेखही करण्याचे अभिजन इतिहासकर्त्यांनी टाळल्याचे डॉ. बनसोड आपल्या ग्रंथात नमुद करतात. बहुजनांतील मांग, महार, चांभार, कोल्हाटी, डोंबारी, डकलवार अशा मागास मानल्या गेलेल्या जातींच्या लोकांनीच तमाशा वाढवला आणि जगवला. तेच या भूमीतले मूळ अस्सल कलावंत आहेत, ही बाब या पुस्तकात अधोरेखित केलेली आहे.
पेशवाईच्या काळात तमाशाला मिळालेला राजाश्रय आणि सुरुवातीस साताप्पा व बाळा बहिरू, होनाजी बाळा, अनंत फंदी, परशराम, सगनभाऊ, रामजोशी, प्रभाकर यांच्या प्रतिभेने तमाशा या लोककलाप्रकाराला बळकटी दिली. यानंतरच्या शाहिरी परंपरेत हैबती घाटगे, उमाबाबू सावळजकर हे अत्यंत महत्त्वाचे शाहीर होऊन गेले. उमाबाबूंनी तर तमाशामध्ये ‘वगनाटय़’ हे नवीन अंग रूढ केले. ‘मोहना बटाव’ हा पहिला वग त्यांनी लिहिला. तेव्हापासून तमाशात वग सादर केला जाऊ लागला. तमाशात या लावणी-रचनाकारांचा मोलाचा वाटा आहे.
तमाशा या लोककलेचा येत्या काळात अनेक अंगांनी अभ्यास होत राहणार आहेच; परंतु या कलेचं मूळ अस्सल रूप व त्याचे अनुबंध जोपासणे ही जशी कलावंतांची जबाबदारी आहे, तेवढीच ती संशोधकांचीदेखील आहे. ‘तमाशा : रूप आणि परंपरा’च्या मलपृष्ठावर रामदास फुटाणे लिहितात- ‘आधी मस्तक व मग पुस्तक! छपाईयंत्र येण्यापूर्वी मौखिक परंपरा हीच सर्जनाची शक्ती होती. हजारो वषेर्ं दऱ्याखोऱ्यांतून आदिवासी गिरीजनांनी संगीत-नृत्य-नाटय़कला जोपासली. नंतर पुस्तक आलं आणि या लोककलांचं शास्त्र झालं. शास्त्र हे विद्यापीठात राहत असल्यामुळे क्लिष्टता हा त्याचा स्थायीभाव झाला.’ फुटाणे यांचे हे मत कोणालाही पटण्याजोगे आहे. परंतु या क्लिष्टतेतून सुटका करून घेत डॉ. बनसोड यांनी सुटसुटीत, स्वच्छ भूमिकेतून तमाशा या लोककलेची वस्तुनिष्ठपणे मांडणी केली आहे.
पुस्तकाचे देखणे मुखपृष्ठ आशुतोष आपटे यांनी केले असून, पुस्तकाच्या आतील पानांवर संदेश भंडारे आणि समाधान पारकर यांची छायाचित्रे आहेत. तमाशाकलेचा अभ्यास करणाऱ्यांना या ग्रंथाचा निश्चितच उपयोग होईल.
‘तमाशा : रूप  व परंपरा’- मंगेश बनसोड, अवेमारिया  पब्लिकेशन्स, पृष्ठे- २१६,  किंमत-  रु. २८०.