रसग्रहण : संक्षेपात.. Print

सुचिता देशपांडे ,रविवार ४ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
महाराष्ट्रीय संतकोश
alt

संत साहित्याचे गाढे अब्यासक डॉ. यू. म. पठाण लिखित ‘महाराष्ट्राची संतपरंपरा’ या ग्रंथाच्या तीन भागांतील हा पहिला भाग. यात जैन, शैव, वारकरी, महानुभाव, नाथ, समर्थ, दत्त, नागेश आदी विविध धर्माच्या, पंथांच्या आणि जातीच्या संतकवी - संतकवयित्रींची ओळख करून देण्यात आली आहे. त्यातील विविध नावांमध्ये त्या त्या संस्कृतीचे वेगळेपण जाणवते. धर्म, संप्रदाय, तत्त्वज्ञान, धर्मग्रंथ, उपासनापद्धती यात वेगळेपण असूनही मराठी मातीशी समरस झालेल्या संतांचा समावेश या ग्रंथात करण्यात आला आहे. यात समाविष्ट केलेल्या संतांच्या साहित्यातून वेगवेगळ्या भागातील महाराष्ट्रीय जीवनशैली तसेच तिथल्या सामाजिक समस्या लक्षात येतात. मराठी वाङ्मय समृद्ध करणाऱ्या या संतांचं जीवन, त्यांचं तत्त्वज्ञान आणि प्रबोधनकार्य याचा पट या ग्रंथाद्वारे लेखकाने नेटकेपणाने उभा केला आहे.
महाराष्ट्राची संतपरंपरा - डॉ. यू. म. पठाण, दिलीपराज प्रकाशन, पृष्ठे- २८०, किंमत- ३०० रु.

वृत्तपत्रे आणि मराठी भाषा
मराठी वृत्तपत्राच्या नवनव्या अवतारांचा मराठी भाषेचा जडणघडणीवर नेमका काय परिणाम झाला आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न ‘मराठीचे आधुनिकीकरण’ (मराठी वृत्तपत्रांचे योगदान) या ग्रंथात करण्यात आला आहे. मराठी वृत्तपत्रांचे मूलस्रोत, मराठी वृत्तपत्रे - १९वे शतक, मराठी वृत्तपत्रे - २०वे शतक, आधुनिकीकरण - परिभाषा, स्वरूप आणि घडण, वृत्तपत्रीय भाषा - स्वरूप आणि वैशिष्टय़े, अन्यभाषा प्रभाव, वृत्तपत्रातील व्याकरणिक बदल, लेखनविषयक व मद्रणविषयक बदल, शैलीतील बदल, जाहिरातींची मराठी तऱ्हा, अग्रलेखांचे वेगळेपण, वाचकांचा पत्रव्यवहार, वृत्तपत्रातील अनुवादाचे स्वरूप, भाषिक आधुनिकीकरणाच्या प्रधान प्रक्रिया यावर स्वतंत्र प्रकरणे बेतली आहेत.
मराठीचे आधुनिकीकरण - डॉ. विलास देशपांडे, विसा बुक्स, पृष्ठे -२५४, किंमत - २७५ रु.

धर्म आणि सत्ताव्यवहार
धर्माशी जोडला गेलेला सत्ताव्यवहार आणि सामाजिक व्यवहारांतील धर्माच्या हस्तक्षेपांचे स्वरूप वेगवेगळ्या कालखंडात, निरनिराळ्या समाजात बदलत राहिले. धर्म, सामाजिक व्यवहार आणि धर्मकारणाशी जोडले गेलेले धार्मिक, बिगरधार्मिक सत्ताव्यवहार यातील अनोन्यसंबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न या ग्रंथात करण्यात आला आहे. समकालीन धर्मकारण आणि त्यातील व्यवहारांभोवती गुंतत जाणाऱ्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अशा बहुपेडी बदलांचा शोध घेण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. या पुस्तकात शिर्डी, अक्कलकोट, शेगाव, पंढरपूर, तुळजापूर, त्र्यंबकेश्वर, शनिशिंगणापूर, सिद्धिविनायक, प्रतिदेवस्थानं या देवस्थानांवर आधारित लेख आहेत.
देवाच्या नावानं- युनिक फीचर्स, समकालीन प्रकाशन, पृष्ठे - १८८, किंमत - १८० रु.

तेजस्वी ज्ञानपरंपरेचा आद्यग्रंथ
alt
प्राचीन भारतीय विज्ञानाचा एक अनमोल ठेवा या दृष्टीने वेदांग ज्योतिषाकडे पाहायला हवे. वेदांग ज्योतिष म्हणजे नेमके काय, त्यातील महत्त्वाच्या संकल्पना व त्यांचे स्पष्टीकरण, वेदांग ज्योतिष : त्रुटी आणि निराकरण, कै. प्रा. अभ्यंकरप्रणीत निराकरण तसेच वेदांग ज्योतिषाशी निगडित विविध गोष्टींचे स्पष्टीकरण या पुस्तकात देण्यात आले आहे. प्रा. मोहन आपटे यांनी या पुस्तकात वेदांग ज्योतिष संबंधित विविध संकल्पना आणि श्लोकांच्या अर्थाचा मागोवा घेत त्याचे स्पष्टीकरण सुलभरीत्या सादर केले आहे. त्यातील गणिती आणि खगोलशास्त्रीय क्रियांचा सविस्तर अभ्यास करून वेदांग ज्योतिषांवरील ग्रंथ लिहिला आहे. वेदकालीन ऋषींनी संपादन केलेल्या खगोलशास्त्र, गणित आणि कालगणना यासंबंधीच्या ज्ञानाचा हा अमोल ठेवा या पुस्तकाच्या रूपाने मराठीत उपलब्ध झाला आहे.
वेदांग ज्योतिष - मोहन आपटे, राजहंस प्रकाशन, पृष्ठे - ८९, किंमत - १५० रु.

प्रेमचंद यांच्या कथांचा भावानुवाद
हिंदीतील मातब्बर साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांच्या दहा अनुवादित कथांचा समावेश या कथासंग्रहात करण्यात आला आहे. शाश्वत सुख, लेखक, शाप जीवनाचा, कैदी, कफन, पौष महिन्यातील एक रात्र, म्हातारी काकी, होळी - आसवांची, श्रीमंताची श्रीमंत मुलगी, ईदगाह अशा या कथा आहेत. या कथा समाजजीवनावर आणि सामाजिक समस्यांवर बेतलेल्या असल्या तरी परस्परांतील नातेसंबंधांचं अलवारपण आणि गुंतागुंत या कथांमध्ये आणि त्यांच्या अनुवादामध्येही नेमकेपणाने व्यक्त होते.
कालजयी कथा - मूळ लेखक - मुन्शी प्रेमचंद, अनुवाद - विजया भुसारी, पृष्ठे  -१२०, किंमत - १४० रु.