रसग्रहण :तरंगत्या भावभावनांचे चित्रण Print

शाम देशपांडे - रविवार ११ नोव्हेंबर २०१२

‘पाण्यावरचे दिवे’ हे लेखिका छाया महाजन यांचे अलीकडचे पुस्तक. यापूर्वी त्यांनी कथा, कादंबरी, ललित, अनुवादित असे वाङ्मयप्रकार समर्थपणे हाताळले आहेत. छाया महाजन यांनी सदरलेखनही केले आहे. त्यांनी ‘संवाद’ या वृत्तपत्रीय सदरात वर्षभर लेखन केले. या लेखांचे हे पुस्तक. या पुस्तकात ३६ लेख आहेत. त्यांचे विषयही वेगवेगळे आहेत. छाया महाजन या इंग्रजीच्या अध्यापक असल्यामुळे या विषयांतले त्यांचे वाचन अद्यावत आहे. त्यामुळे तुलनात्मक दृष्टीने साहित्याकडे पाहण्याची सवय त्यांना आहे.
‘पाण्यावरचे दिवे’ हे पुस्तकाचे शीर्षक अत्यंत समर्पक आहे. अथांग जलाशयातील पाण्यावर दिवे सोडल्यावर त्या दिव्यांच्या प्रकाशामुळे सारा परिसर उजळून निघतो. परंतु क्षणभरच. पाण्याची एखादी लाट येताच हे दिवे हेलकावू लागतात आणि काही काळ प्रसन्न उजेड देणारे हे दिवे क्षणात नष्ट होतील की काय, अशी भीती वाटू लागते. सदर- लेखनाचेही असेच असते. असे लेखन वाचल्यावर काही काळ बरे वाटते. परंतु पुढे पुढे त्याचे तात्कालिकपण जाणवू लागते. ‘पाण्यावरचे दिवे’ या पुस्तकात विषयांचे वैविध्य आढळते, त्याचबरोबर या लेखांमध्ये एक समान सूत्र असल्याचेही जाणवते. घरादारांत वावरत असताना आपल्याला अनेक बरेवाईट अनुभव येत असतात. हे अनुभव आपण फारसे गंभीरपणे घेत नाही. लेखकाकडे मात्र या अनुभवांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी असते. लेखिकेकडे अशी वेगळी नजर आहे. आलेल्या अनुभवांसंबंधी स्वत:चे चिंतन मांडताना लेखिकेने साहित्य, संस्कृती आणि समाजकारण यांचा मार्मिक उपयोग केलेला आहे. त्यामुळे त्यांनी केलेले एखाद्या घटनेवरचे भाष्य वाचकाला विचार करायला प्रवृत्त करते.
सरते वर्ष काळाच्या उदरात गडप होते. ते पुन्हा कदापि कुणाच्याही आयुष्यात पुन्हा येत नाही. परंतु जाताना मात्र त्याने आपल्या आयुष्याचा एक तुकडा बरोबर नेलेला असतो. या तुकडय़ाच्या आठवणी जपणे एवढेच आपल्या हाती उरते. लेखिकेची अवस्थाही अशीच आहे. या पुस्तकातील सर्वच लेख ओघवत्या ललित शैलीत लिहिलेले असले तरी त्यांतील अनुभव, विचार, भावना प्रतिक्रिया स्वरूपात गंभीरपणे आलेल्या आहेत. ‘कवितेच्या किनारी’ या पहिल्याच लेखात कवितेच्या स्तराविषयी लेखिकेने चर्चा केली आहे. यंत्रयुगाचा कवितेवर कसा परिणाम होतो, हे सांगताना त्यांनी जॉन गॉथच्या ‘मॉडर्न पोएट्स मिक्स टू मच वॉटर वुईथ देअर इंक’ या म्हणीचा चपखलपणे उल्लेख केलेला आहे. तर ‘सद्हेतूतला आनंद’ या लेखात संशोधनासंबंधीची चर्चा आहे. ही चर्चा आजच्या पाश्र्वभूमीवर महत्त्वाची वाटते. ‘पाणी’ हा या संग्रहातील अप्रतिम लेख आहे. ‘मला माहीत आहे पाऊस नळातून पडतो. पाऊस आला होता का, तो पाहिजे तितका पडला नाही, पडला तर किती पडला, कमी की जास्त, हे सगळं मला नळातून कळतं! पर्यावरणाच्या या नव्या संकल्पनेनं हादरून मी त्या साताठ वर्षांच्या मुलाकडे पाहत होते..’ असं लेखाच्या सुरुवातीलाच स्पष्ट करून लेखिका पाण्याविषयीच्या अनेक आठवणी कथन करत जाते आणि शेवटी ‘डोळ्यांतल्या पाण्यापेक्षा नळाच्या पाण्याचे मोल कितीतरी मोठे!’ अशी टिप्पणी नकळत करून जाते.
‘बॉन्साय’ या शेवटच्या लेखात छोटय़ा मुलांची ‘प्रौढ बाल्यावस्था’ कशी होत चालली आहे, याबद्दलचा प्रश्न लेखिकेला पडला आहे. खरं तर यातल्या सर्वच लेखांतून लेखिकेला असंख्य प्रश्न सतावत आहेत आणि त्यांची उत्तरेही त्यांनी आपल्या अनुभवांनुसार शोधली आहेत असे दिसते. या पुस्तकातले लेख नॉस्टेल्जिक वाटत असले तरी नॉस्टेल्जिकपणाचे समर्थन करणारे नाहीत. मनात उमटणाऱ्या विविध भावभावनांच्या तरंगांचे हे चित्रण आहे. त्याला एक सहजसुंदर उत्स्फूर्तता लाभली आहे. पुस्तकाचे सरदार जाधव यांनी केलेले मुखपृष्ठ या लेखनाचे सार समर्थपणे प्रकट करते.
‘पाण्यावरचे दिवे’- छाया महाजन, जनशक्ती वाचक चळवळ, पृष्ठे- १८०, किंमत- रु. १५०.