आयत्या बिळावर नागोबा Print

altडॉ. लीला दीक्षित, रविवार २९ एप्रिल २०१२
श्रीकर शाळेतून अगदी खुशीत घरी आला. त्याला आज नवा मित्र भेटला होता. केदार त्याचं नाव. त्याच्या बाबांची बदली झाली होती. ते बँकेत ऑफिसर होते. आणि गंमत म्हणजे तो श्रीकरच्या घरापलीकडील सदनिकेत रहायला आला होता. आज वर्गात त्याची प्रथमच गाठ पडली. सारिकालाच त्यानं आल्या आल्या हुशार मुलाचं नाव विचारलं. सारिकानं श्रीकरचं नाव सांगितल्यावर तो श्रीकरजवळ येऊन बसला. श्रीकर म्हणाला- ‘अरे, ही श्रेयसची जागा. तो येईल आता.’
‘तो बसेल की दुसऱ्या जागेवर’, असं म्हणत श्रीकरजवळ केदार बसला. केदारची वाणी मिठ्ठास होती. श्रेयस आला. केदारनं डोळे मोठ्ठे केले आणि मागे हात केला. बिचारा श्रेयस मागे बसला. श्रीकरला हे आवडलं नाही. केदार म्हणाला, ‘मी आता तुझा मित्र. मला लागेल ती मदत तू करायचीस. काय?’
‘आणि मला लागेल ती मदत तू करायचीस केदार’, श्रीकरने सांगून टाकलं.
‘हुशार मुलांना नाही लागत रे मदत’ केदारनं त्याचा हात कुरवाळीत म्हटलं. श्रीकर साधा मुलगा. तो केदारच्या मिठ्ठास वाणीला भुलला.
शाळेतून घरी आल्यावर आपल्या नव्या मित्राची बातमी त्यानं आजीला दिली. इतक्यात बेल वाजली. दार उघडलं तर केदार उभा.
‘अरे, घरी दाराला कुलूप आहे. मी विचार केला मला गणित येत नाही. उद्या सरांनी दहा गणितं दिली आहेत. तुझ्या मदतीनं गृहपाठ करावा. चालेल ना?’
‘ये ना आत. आजी, माझा मित्र केदार आलाय. त्यालाही दे खायला.’
दोघांनी मटारपोहे, करंजी खाल्ली. श्रीकर- केदार आपल्या खोलीत गेले. आजी डोकावली, ‘श्रीकर, अरे तू काय त्याची गणितं करतोस. त्याला समजून सांग. त्याचा अभ्यास त्यालाच करायला हवा.’
परंतु केदारनं गणितं श्रीकरकडूनच करून घेतली. सरांनी केदारचं कौतुक केलं तेव्हा तो चक्क म्हणाला- ‘सर मला गणितात पैकीच्या पैकी मरक मिळतात’, श्रीकर गोंधळला. केदारनं गणितं तर माझ्याकडून करून घेतली. मग तो खोटं का बोलतोय?
आठ दिवसांनी शाळेत कथाकथनाची स्पर्धा होती. आजीनं श्रीकरची छान तयारी करून घेतली. केदारनं गोड बोलून श्रीकर कुठली कथा सांगणार हे विचारलंच. एवढंच नाही तर आजीनं शिकवलेलं सादरीकरण कसं करायचं तेही विचारलं. श्रीकर साधा. त्यानं उभं राहून साभिनय कथा म्हणून दाखवली. स्पर्धेचा दिवस उजाडला. केदारचा नंबर श्रीकरच्या आधी होता. आजी खास स्पर्धेसाठी आली होती. केदारची वाणी मिठ्ठास, वक्तृत्व चांगलं. त्यानं सुरुवात केली.
‘माझ्या कथेचं नाव ‘सुंदर घर.’
समोर बसलेला श्रीकर गोंधळला. तो उभा राहिला. ‘सऽर.. सऽर’ सर म्हणाले- ‘श्रीकर खाली बस.’ आजीही चक्रावली. केदार नंतर श्रीकर उभा राहिला. त्यानं कथेला सुरुवात केली. मुलांनी गोंगाट केला. ‘तीच कथा नको.’ श्रीकर पुरता गोंधळला आणि जागेवर येऊन बसला. केदारला दुसरं बक्षीस मिळालं. स्पर्धा संपल्यावर आजीनं केदारला पकडलंच.
‘केदार, श्रीकर तुझा मित्र. का सांगितलीस त्याची कथा? मी तुला दिली असती दुसरी कथा. आणि लेखिकेची परवानगी आहे तुझ्याकडे? नाही ना? ही कथा माझी आहे. पण परवानगी नाही म्हणून मी तुझं बक्षीस काढून घेणार नाही. आयत्या बिळावर नागोबा कुठला!’
शेजारी श्रीकर उभा होता. आजीनं श्रीकरचा हात धरला आणि ती घरी आली. शाळेत गॅदरींगसाठी चित्रकला स्पर्धा होती. आजीनं श्रीकरला बजावून सांगितलं की तुझा विषय बिलकुल केदारला सांगायचा नाही. शाळेत स्पर्धा झाली. सर्व मुलांनी चित्रं काढली. सर चित्रं गोळा करू लागले. केदारनं चटकन श्रीकरचं चित्र घेतलं.
‘अरे, अरे केदार, चित्रामागं नाव आणि नंबर विसरलो बघ’ केदार हीच संधी पहात होता. त्यानं आपल्या चित्रामागं मुद्दाम नाव घातलं नव्हतं. त्यानं आपल्या चित्रामागं श्रीकरचं व श्रीकरच्या चित्रामागं स्वत:चं नाव घातलं. श्रीकरला हे समजलंही नाही. ‘श्रीकर मी घातलंय नाव’ दोघेही खुशीत घरी आले. त्यानं नाव घालण्याचा घोळ आजीला सांगितला. ‘श्रीकर’ तुला कळेना कारे तो केदार संधिसाधू आहे. नक्की घोळ होणार!’ रिझल्ट लागला. केदारला बक्षिस मिळालं. दरवर्षी पहिला क्रमांक मिळवणाऱ्या श्रीकरचं चित्र फारच सामान्य होते. सरांनी वर्गात केदारचं चित्र दाखवलं. श्रीकरनं ओळखलं, हे चित्र तर आपलं आहे. तो पळत सरांकडे गेला. रडू लागला. केदारही गेला. ‘सर मला बक्षिस मिळालं म्हणून श्रीकर खोटेपणा करतोय.’ केदारकडं पाहून सरांनी डोळे मोठे केले. श्रीकर हे चित्र तुझंच आहे याची काही खूण सांगशील. श्रीकरला एकदम आठवलं- ‘सर, माझ्या चित्रात नदी आहे.’
‘हॅंूऽ माझ्याही चित्रात नदी आहे.’- केदार उर्मटपणे म्हणाला.
‘सर, माझे बाबा चित्रकार आहेत. ते चित्रावर सही करतात. मीही केली आहे. पाण्यातली चिमुकली होडी पाहा. त्यामध्ये मी रऊ शब्द बसवलेत. ‘ऊ’ म्हणजे होडी आणि र दोन शिडं. श्रीकर देवधर. सर पाहा.’
श्रीकर सांगत होता तसं खरंच होतं. सर केदारला चांगले रागावले. बक्षीस श्रीकरला मिळालं. ‘केदार, आयत्या बिळावर नागोबा ही सवय सोड आता. असं दुसऱ्याचं श्रेय लाटून, माणूस मोठा होत नाही. तुझ्या आईबाबांशी मी बोलेनच. कष्ट न करता असं दुसऱ्याचं यश स्वत: घेणं बरं नव्हे केदार.’ श्रीकर मात्र खूष झाला आणि बक्षीस घेऊन तो आनंदाने घरी गेला.