दुधाचा फुगा Print

altराजीव तांबे , रविवार , ६ मे २०१२
आज घरात आवराआवरी करताना आजोबांची आंघोळ राहूनच गेली. आजीने एका मोठय़ा गॅसवर आंघोळीसाठी पाणी तापवत ठेवलं, तर दुसऱ्या छोटय़ा गॅसवर चहासाठी दूध गरम करत ठेवलं. आजोबाही आंघोळीच्या तयारीला लागले.
इतक्यात आजीच्या मैत्रिणीचा फोन आला. आजोबा मिहीरला इशारा करत म्हणाले, ‘आता एक तास संपला. हा दुपारचा चहा रात्रीच्या जेवणानंतरच घ्यावा लागेलसं वाटतंय.’
आजोबांकडे मोठे डोळे करून पाहात आजी मिहीरला म्हणाली, ‘अरे मिहिरू, जरा मला मदत करतोस का? जरा या दुधाकडे आणि पाण्याकडे लक्ष ठेव. मी आलेच.’
मिहीर गॅससमोर उभा राहिला.
आता आजी फोनवर बोलण्यात गुंग, तर आजोबा आंघोळीच्या तयारीत मग्न!
दूध तापू लागलं. दुधात छोटे छोटे बुडबुडे येऊ लागले. दुधावर साय तरंगू लागली. आता हळूहळू दूध उकळू लागलं. सायीचा छोटासा फुगा तयार झाला. त्याच सुमारास पाणीही उकळू लागलं. पाण्यातून बुडबुडे येऊ लागले. वाफा उफाळू लागल्या. आता नेमकं काय करायचं, ते काही मिहीरला समजेना. आजीने तर त्याला फक्त ‘लक्ष ठेवायला’ सांगितलं होतं. पण लक्ष ठेवायचं म्हणजे नेमकं काय करायचं?
दुधाच्या पातेल्यातला दुधाचा फुगा मोठा होऊ लागला आणि अचानक दुधाच्या पातेल्यातून येणाऱ्या वाफा बंद झाल्या.
त्याचवेळी पाण्याच्या पातेल्यातील पाणी उकळून सळसळू लागलं. पाण्याच्या तळापासून वपर्यंत जोरजोरात बुडबुडे येऊ लागले. वेगात वाफा येऊ लागल्या.
मिहीरने चटकन दुधाच्या पातेल्याकडे पाहिलं. आता दुधाचा फुगा चांगला फुगला होता, पातेल्याच्या वपर्यंत! आणि वाफा मात्र पाण्याच्या मानाने फारच कमी!
मिहीरने पाण्याच्या पातेल्याकडे पाहिलं. त्यातून तर वाफांची कारंजीच उसळत होती. बुडबुडय़ांची माळ लागली होती.
इतक्यात पातेल्याच्या वरवर जाणारा तो दुधाचा फुगा फुटला. त्यातून भसकन दूध बाहेर आलं आणि उतू जाऊ लागलं.
मिहीर घाबरला. त्याने घाबरून दोन्ही गॅस बंद केले. आजीला अंदाज होताच. ती धावतच आली; पण काही क्षण उशिरा.
मिहीरकडे पाहात आजीने विचारलं, ‘अरे, दूध कसं काय उतू गेलं? आणि तू दोन्ही गॅस का बंद केलेस?’
‘अगं, नाहीतर हे पाणीसुद्धा उतू गेलं असतं ना? आणि मी तो दुधाचा फुगा पाहत बसलो. तेव्हढय़ात दूध उतू गेलं गं आजी.’ मिहीरने असं म्हणताच आजीने त्याला थोपटलं.
‘अरे मिहीर, दूध उतू जातं, पण पाणी नाही. आणि दूध उतू न जाण्यासाठी एक सोपी आयडिया करायची.’
आजीला थांबवत मिहीरने विचारलं, ‘कुठली आयडिया?’
‘सगळं काही मी सांगणार नाही. हे बघ. दूध का उतू जातं, हे तू समजून घेतलंस ना, की ती आयडिया तुला आपोआपच कळेल.’
आजी सविस्तर सांगू लागली, ‘दुधात पाणी, प्रथिनं आणि स्निग्ध पदार्थ यांचं मिश्रण असतं. दूध गरम होऊ लागलं की, त्यातले स्निग्ध पदार्थ दुधाच्या पृष्ठभागावर येऊन तरंगू लागतात. मग त्याचा एक पापुद्रा तयार होतो. सांग बरं, आपण त्याला काय म्हणतो?’
‘ही दुधावरची साय! हो ना आजी?’
‘एकदम बरोबर!’
मिहीर उत्साहाने म्हणाला, ‘थांब आजी, आता मी सांगतो. ही साय दुधाच्या पृष्ठभागावर अशी काही घट्ट बसली की, आतून येणारी वाफ या सायीने अडवली. मी मघाशी पाहत होतो. आणि आता मला कळलं, मी जो दुधाचा फुगा म्हणतोय ना, तो होता ‘सायीचा फुगा!’ कारण त्या सायीखाली वाफ कोंडल्यामुळे त्याचा फुगा तयार झाला. हो ना?’
‘शाब्बास मिहीर! थोडासा तर्क लढवला की समजू लागतं. पाण्याचं मात्र असं होत नाही. पाणी उकळू लागलं की त्याची वाफ सहजच सरळ बाहेर पडू लागते. त्यामुळे ते उतू जात नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वाफ कोंडल्यामुळे फुगा तयार होतो. पण या वाफेचा दाब खालच्या बाजूने वाढत जाऊन दूध वर वर यायला सुरुवात होते, तसतसा तो फुगा फुलायला लागतो. पण हा दाब अती झाला की, हा सायीचा फुगा-म्हणजेच सायीचा पापुद्रा फोडून दूध उतू जातं. आता मला सांग, दूध उतू न जाण्यासाठी काय करावं लागेल?’ ‘पाणी उतू जात नाही. कारण पाण्यावर साय तयार होत नाही. आपण जर दूध गरम होत असताना दुधावर सायच होऊ दिली नाही कर ते उतूच जाणार नाही. त्यासाठी काय करायचं.?’ - हाताने ढवळण्याची नक्कल करत मिहीरने आपलं बोलणं पुरं केलं.
‘काऽऽय समजलं ना, दूध का उतू गेलं?’