वाक्प्रचाराची गोष्ट : त्रिशंकू अवस्था होणे! Print

altमेघना जोशी , रविवार , ६ मे २०१२
रामायण- महाभारतातील वाक्प्रचारांचा वापर करून खूप जटिल गोष्ट सहजरीत्या समजेल अशी सांगितली जाते. पण ती सहज समजण्यासाठी त्यामागील कथा ज्ञात असणे गरजेचे असते. त्यातील काही वाक्प्रचार आणि
संदर्भित कथा..
क्रमश:
राजा त्रिशंकू हा इस्वाकू कुळातील एक राजा होता. आपण सदेह स्वर्गात जावे अशी त्याची मनोमन आकांक्षा होती. त्यासाठी त्याने ऋषी वसिष्ठांची भेट घेऊन त्यांना तशी विनंती केली. पण वसिष्ठ ऋषींनी त्याला सदेह स्वर्गात पाठविण्यासाठी प्रयत्न करण्यास ठाम नकार दिला. वसिष्ठ ऋषी ऐकत नाहीत असे पाहून त्रिशंकूने त्यांच्या शंभर पुत्रांना आपल्याला स्वर्गात सदेह पाठविण्याची विनंती केली. पण त्यांनीही त्रिशंकूला ठाम नकार दिला. त्रिशंकूला राग अनावर झाला. तो म्हणाला, ‘तुम्हाला शक्य नसेल तर मी दुसऱ्या गुरूचा शोध घेतो.’, हे ऐकून वसिष्ठपुत्र कोपले. त्यांनी त्रिशंकूला ‘तू चांडाळ होशील’ असा शाप दिला.
परंतु त्रिशंकूने आपले प्रयत्न थांबविले नाहीत. चांडाळ रूपातील राजा त्रिशंकू विश्वामित्रमुनींकडे गेला. त्यांना सर्व परिस्थिती कथन केली. ती ऐकून मुनी विश्वामित्रांनी त्याला मदतीचे आश्वासन दिले. आणि एका यज्ञास प्रारंभ केला. त्या यज्ञाच्या प्रभावाने त्रिशंकूला पुन्हा पूर्वस्वरूप प्राप्त झाले. यशाचे फल म्हणून त्याला सदेह स्वर्गगमनाची परवानगी मिळाली. यज्ञाच्या धुराबरोबर त्रिशंकू सदेह स्वर्गाच्या दारात गेला. त्याला सदेह स्वर्गात आलेला पाहून इंद्राला राग अनावर झाला. तो म्हणाला, ‘तुला स्वर्गात सदेह येता येणार नाही. खाली डोके व वर पाय अशा प्रकारे वेगाने पृथ्वीवर पड’ त्याप्रमाणे त्रिशंकू परत पृथ्वीवर येण्यास निघाला. ते पाहून विश्वामित्रांनी मंत्रसामर्थ्यांने त्रिशंकूला परत वर ढकलले. त्याला आज्ञा केली, ‘राजन, तिथेच थांब.’ इकडून इंद्र व तिकडून विश्वामित्र- दोघांनी ढकलल्यामुळे त्रिशंकू अधांतरिच राहिला. तेव्हापासून अधांतरी असलेला त्रिशंकू हा नक्षत्राप्रमाणे प्रकाशमान दिसतो असा एक समज आहे. ते काही असो पण मनाच्या दोलायमान स्थितीला ‘त्रिशंकू अवस्था होणे’ असे आजही म्हटले जाते.