फुलले रे क्षण... Print

सुचिता देशपांडे , रविवार , १३ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

एक टपोऱ्या डोळ्यांची स्वप्नाळू मुलगी होती. जुईली तिचं नाव. नवं काहीतरी करायला तिला खूप आवडे. साहसाची तर तिला उपजतच आवड. एके दिवशी ती आपल्या छानशा चहाच्या किटलीत बसून सागरी सफर करत जगप्रवासाला निघाली. ज्या नव्या नव्या प्रदेशांना ती भेटी देई, तिथली आठवण म्हणून ती तिथं उमलणाऱ्या नानाविध रंगांच्या आणि सुगंधाच्या फुलांच्या बिया आपल्या किटलीत भरून घेई. ठिकठिकाणच्या प्रदेशातील बी-बियाणांनी तिची चहाची किटली काही अवधीतच पूर्णपणे भरून ओसंडून वाहू लागली; तेव्हा जुईली मनाशी म्हणाली, ‘आता माझी बाग तयार करायची वेळ आलीय म्हणायची!’
किटलीतून प्रवास करता-करता थोडय़ा वेळातच तिला एक मोठं, गजबजणारं शहर नजरेला पडलं.
‘छोटय़ाशा मैत्रिणी, तुझं या नगरीत स्वागत असो. अशीच किटली वल्हवत तू पुढे-पुढे जात राहा. हे शहर तुला खूप खूप आवडेल, हे नक्की!’ त्या बंदराजवळच्या दीपगृहात बसलेले पांढऱ्याशुभ्र दाढीचे आजोबा जुईलीला म्हणाले आणि जुईली त्यांना नमस्कार करून धन्यवाद देत पुढे निघाली. तिनं मनाशी म्हणाली, ‘आधी सारं शहर तर बघून घेऊयात..’
आपल्या किटलीला बंदरात सुरक्षित जागी उभं करून ती शहर भटकायला निघाली. अबब! किती मोठं शहर म्हणायचं हे! कितीतरी माणसं, कितीतरी गाडय़ा, रस्त्यावर ठिकठिकाणी नुसती जत्रा भरल्यागत अवस्था.. सगळीकडे नुसता गोंगाट आणि आवाज..
ती पुढंपुढं जाऊ लागली तसा एका कोपऱ्यात तिला धुळीनं माखलेला जमिनीचा पट्टा दिसला. ती जमीन ओसाड, ओकीबोकी होती. कुणी फिरकतही नसावं तिथं. दूरवर कुणाचाही वावर तिथं दिसत नव्हता.
‘हं..’, जुईली मनाशीच उद्गारली. धुळीच्या कळकट्ट रंगाच्या या जमिनीच्या भेसूर दिसणाऱ्या पट्टय़ात सुंदर आकर्षक रंग कसे पेरता येतील, याचे मनसुबे तिच्या मनात जणू तयार होत होते..
जुईलीनं तिथली माती सारखी करायला सुरुवात केली. नांगर हाती घेतला. हे सारं करताना तिच्या मनात येत होतं- बाग तयार झाली की इथलं दृश्य किती छान असेल!
जेव्हा ती पेरण्यासाठी बिया आणायला आपल्या चहाच्या किटलीपाशी गेली, तेव्हा तिनं पाहिलं कितीतरी पक्षी तिच्या किटलीत डोकावले होते. आपल्या चोचीनं बिया टिपत भूर्र उडून जात होते. बिया घेऊन जाणारे पक्षी किती आनंदात होते..
‘अरे बापरे, आता काय करायचं?’ ती कळवळली. तिनं लगबग किटलीकडं धाव घेतली आणि किटलीच्या आत डोकावून पाहिलं. किटलीत शिल्लक राहिलेलं बी-बियाणं तिनं काळजीपूर्वक आपल्याजवळच्या पिशवीत भरून घेत ती घाईघाईनं नांगरणी केलेल्या जमिनीकडे परतली. त्या बिया जमिनीत पेरल्या आणि त्यातून लहान-लहान रोपं बाहेर येण्याची ती वाट बघू लागली. पण कितीतरी दिवस काही झालंच नाही.
वर्षां ऋतू आला.. पाऊस पडून तिथल्या जमिनीचा नुसता चिखल झाला. तरीही जुईली वाट बघत होती..
दिवसामागून दिवस गेले. उन्हाळा आला तसा सूर्य तापू लागला. उन्हाचे चटके जाणवू लागले, तरीही जुईली तिथून हटली नाही..
थंडगार झोंबऱ्या वाऱ्यांमुळे तिला कळलं की, आता थंडी पडणार आहे, तरी जुईली ठिय्या देऊन रोपे बाहेर येण्याची वाट पाहू लागली..
थोडय़ाच दिवसांनी हिमवर्षांव सुरू झाला. कानटोपी नि स्वेटर घालून ती आपल्या रोपांची वाट बघतच होती. हिवाळा सरत आला. जमिनीवर साठलेलं बर्फ वितळू लागलं. तिथली जमीन ऊबदार झाली. तरीही जुईली आपल्या रोपांची वाट बघतच होती. कधीतरी आपण पेरलेल्या बिया जाग्या होतील, तरारून वर येतील, याची जणू तिला खात्री होती.
जुईलीला तिथं वाट बघताना अनेकजण बघत होते, निरखत होते.. तिच्या होणाऱ्या बागेची, तिनं पेरलेल्या बियांची गोष्ट एव्हाना त्या शहरात पसरू लागली.. आणि एका ऊबदार दिवशी एक छोटीशी मुलगी जुईलीसाठी एक फूल घेऊन तिथे आली. तिनं जुईलीसाठी एक कागदाचं फूल आणलं होतं. ‘मी स्वत: बनवलंय, तुझ्या बागेसाठी..’ ती छोटीशी मुलगी म्हणाली. ‘किती छान आहे,’ म्हणत जुईलीनं आनंदानं ते फूल त्या जमिनीत खोवलं.
दुसऱ्या दिवशी एक मुलगा तिथं आला. त्याच्या हातातही एक कागदी फूल होतं. जुईलीचा चेहरा उजळला. ‘मी पेरलेल्या बिया रुजून त्यातून उमलणाऱ्या फुलांना या कागदी फुलांची चांगली सोबत होईल’, ती मनात म्हणाली.
दिवसेंदिवस जुईलीला भेटायला येणाऱ्या मुलांची संख्या वाढू लागली आणि त्या प्रत्येकाच्या हातात एकेक कागदी फूल असायचं. तिला भेटायला येणाऱ्या प्रत्येक मुलाला तिची गोष्ट अगदी तोंडपाठ होती.. जुईलीचं किटलीतून जगप्रवासाला निघणं, सगळीकडे फिरणं, तिथल्या बिया आणणं आणि या ओसाड जमिनीत रुजवणं.. त्या शहरातील प्रत्येक लहान मुलाच्या तोंडी जुईलीचं नाव झालं होतं.
मिळालेलं प्रत्येक कागदी फूल जुईली तिच्या बागेतल्या जमिनीत पेरायची. थोडय़ाच दिवसांत ती जमीन म्हणजे एक रंगीबेरंगी गालिचा झाला होता- कागदी फुलांचा! जणू हजारो फुलं तिथं उमलल्याचा भास पाहणाऱ्याला होत होता. जुईली आनंदून गेली.. त्या कागदी फुलांचा बगीचा ती दिवसभर निरखत राहायची..
एके दिवशी तिला कसली तरी गुणगुण ऐकू आली. तिला काळजीपूर्वक पाहिलं तर ती एक गुणगुणणारी मधमाशी होती. ती एका लाल रंगाच्या गुलाबावर बसली होती. जुईली त्या फुलाजवळ गेली आणि काय आश्चर्य! त्या फुलाला एक छानसा सुगंध होता. तिने अलगद फुलांच्या पाकळ्यांना हात लावून पाहिला, तेव्हा खऱ्याखुऱ्या पाकळ्यांचा मऊ स्पर्श तिच्या बोटांना जाणवला. आणि तिला मनोमन जाणवलं की ते फूल काही कागदी नाहीए! खरंखुरं फूल आहे ते, तिनं पेरलेल्या बियांमधून उमललेलं.. आणि तिला जाणवलं की, भोवताली अशी अनेक खरीखुरी फुलं उमलली आहेत- मंदसा सुगंध असणारी, रंगीबेरंगी!
प्रत्येक फूल- मग ते खरोखरीचं  असो की कागदी, तिच्या भोवती ती उमलली होती. याचं कारण होतं जुईलीचा विश्वास! तिनं दाखवलेल्या विश्वासातून तिची बाग फुलली होती.. आसपासची मुलंही तिची बाग बघायला आली होती..
जुईलीला कळून चुकलं की, तिचा प्रवास आता संपलाय.. या बागेतच तिनं आपलं घरकुल थाटलं आणि ती तिथंच राहू लागली..
(पाश्चात्य कथेचा भावानुवाद)