काय गुन्हा केला सांगा? Print

altपी. एस. परचुरे- दरेगावकर , रविवार , १३ मे २०१२
फुला-फुलांना सांगे भुंगा
काय गुन्हा केला सांगा?
देवाला का राग आला
काळे काळे केले मला-
रंगीबेरंगी तुम्ही सारे
मीच काळा का बरे?

तुम्ही लाडके का देवाचे,
कोडे पडते मजला याचे
फुलपाखरे अवतीभवती
तुम्हा भोवती पिंगा घालती
बसून तुमचा सुगंध घेती
विविध रंगी ती का असती?
रंग देवाने कधी वाटले?
देव तुम्हाला कुठे भेटले?
बोला खरे, नको खोटे
मी तर जात नाही कुठे!
हसून वदली सारी फुले
‘जीवन देवाला वाहून दिले’
सुगंधही नाही आमच्यासाठी
सारं काही इतरांसाठी!
तू तर स्वार्थी घेतो फक्त
तू कसला देवाचा भक्त?
जीवन नाही तुला समजले
म्हणून तुजला केले काळे