सहल Print

शैलेंद्र राणे - २० मे २०१२
altजंगलातल्या प्राण्यांची मुंबईत आली सहल
वाघ, सिंह, हत्तीसवे झेब्रा आणि अस्वल।
कोल्हा, माकड, जिराफ, हरिण सारे एकदम खुशीत
छान छान गाणी म्हणत चालले मोठे ऐटीत।

म्हातारीचा बूट बघून सहलीस केली सुरुवात
बूट बघून हत्ती म्हणतो जाणार नाही पायात। तारांगणातील चांदण्या रात्रीत सारे झाले चूप
जोरजोरात आवाज करून गोंगाट केला खूप।

चौपाटीच्या वाळूत रंगला शिवाशिवाचा खेळ
टुणटूण उडय़ा मारत माकडाने आणली भेळ।
एस्सेल वर्ल्डच्या राइडवर साऱ्यांनी केली धम्माल
सोंडेतून पाणी उडवून हत्तीने केली कमाल।

डब्बा फस्त केल्यावर बघितली राणीची बाग
आपल्याच मित्रांना पिंजऱ्यात पाहून सर्वाना आला राग।
ट्रेनमधली गर्दी पाहून घाबरले सर्वजण
मुंबईपेक्षा जंगलच बरे म्हणती सारेजण।