बोध अन् मनोरंजनाचा खजिना Print

२० मे २०१२
altसध्याचे दिवस सुटीचे.. आणि सुटी म्हटली की धमाल मस्ती ही आलीच! पण बालमित्रांनो, धमाल मस्ती करताना थोडा वेळ वाचनासाठीही राखून ठेवा. कारण तुमच्यासाठी गोष्टींची अनेक पुस्तकं बाजारात आलेली आहेत..
गोष्टी बाराखडीच्या..
एखादी गोष्ट शिकविताना ती गोष्टीरूपाने सांगितली की मुलांच्या मनावर अधिक ठसते. शालेयपातळीवर वाचन आणि लिखाण या दोन प्रमुख गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात. मराठी भाषेतील मुळाक्षरे, बाराखडी मुलांना गोष्टीरूपाने सांगण्याचा प्रयत्न डॉ. पुष्पा पई यांनी केला आहे. मराठी मुळाक्षरांच्या गोष्टी या पुस्तकात वाचायला मिळतात. केवळ रूक्षपणे मुलांना मुळाक्षरांची ओळख करून देण्याऐवजी गोष्टीरूपाने मुलांपर्यंत ती पोहाचविणं अधिक प्रभावी ठरू शकतं, याचाच प्रत्यय हे पुस्तक देतं. मुलांच्या मनावर शिकण्याचा कोणताही ताण न देता हसत खेळत या पुस्तकातून मुळाक्षरे शिकवू शकता. या गोष्टींमध्ये पुरातन काळातील राजेरजवाडे आहेत, वर्तमान काळात नेहमी भेटणाऱ्या व्यक्तिरेखा आहेत. तशाच विज्ञान-तंत्रज्ञानाचा धागा पकडून काही भविष्यातील कल्पनातीत गोष्टींचाही यात समावेश आहे. लेखिकेने बाराखडीसंबंधी उच्चाराचे व लिखाणाचे नियमही या पुस्तकात दिले आहेत.
गोष्टी बाराखडीच्या- डॉ. पुष्पा पई, दिलीपराज प्रकाशन, पृष्ठे- ९५, मूल्य- १०० रुपये.

मज्जाच मज्जा
‘मज्जाच मज्जा’ हा एकनाथ आव्हाड यांचा बालकाव्यसंग्रह मुलांना निसर्गाच्या विविध रूपांचे दर्शन घडवितो. या कवितांमध्ये जंगलातले प्राणी लहानग्यांना भेटतात. त्यांच्याशी बोलतात, खेळतात. या कवितांमधली मुलं निसर्गाशी एकरूप झालेली दिसतात. कवितेतला निसर्ग मुलांशी संवाद साधतो, त्यांच्याशी दोस्ती करतो. मुलांच्या विश्वातील अनेक गोष्टींना या कविता स्पर्श करतात.
मज्जाच मज्जा- एकनाथ आव्हाड, अखिल भारतीय सानेगुरूजी कथामाला, पृष्ठे-४०,  मूल्य- ३० रुपये.

स्फूर्तिदायी व बोधप्रद कथांचा संच
altअशोक देशपांडे यांचा लहानग्यांसाठी स्फूर्तिदायी व बोधप्रद कथांचा संच नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या संचातील अनेक पाश्चात्य कथांचा स्वैरअनुवाद करून त्या भारतीय  वातावरण, संस्कृती, व्यक्तिरेखा, यांच्यात चपखल बसविल्या आहेत. त्यामुळे त्या लहानग्यांना खूप जवळच्या वाटतात. मधुराज पब्लिकेशन्स प्रा. लि.ने हा संच प्रकाशित केला आहे.
‘बेटावरचा कैदी’
ही किशोर कादंबरिका म्हणजे जगप्रसिद्ध फ्रेंच कादंबरीकार अलेक्झांडर डय़ुमा यांच्या ‘काऊंट ऑफ मॉंटेक्रिस्टो’ या कादंबरीचे भारतीय रूपांतर होय.
‘सतीचं वाण’ या पुस्तकात लोककथांमधून अजरामर झालेल्या झलकारीची लोकविलक्षण कहाणी इतिहासाच्या आधारे लिहिली आहे. तिचा त्याग, देशप्रेम, तिची प्रखर निष्ठा या कथेतून दिसून येते.
‘बिलंदर बबलू’ या पुस्तकात बबलूच्या धमाल गोष्टी वाचायला मिळतात.
‘आक्रमण’ म्हणजे मध्ययुगीन भारतातील गुजरातचे राजे व माळव्यातील परमार राजे यांच्यातील भांडणावर आधारित ऐतिहासिक कादंबरिका. मानवी स्वभावधर्माची विविध रूपं या कथेत पाहायला मिळतात.
‘अमृता’ या पुस्तकातील कथा म्हणजे अमृता आणि मंदार या दोन पात्रांची लोकविलक्षण कथा.
‘झाला निळा पावन’ ही कादंबरिका महाराष्ट्रातील संतश्रेष्ठांपैकी एक संत निळोबा यांच्यावर आधारित आहे. तर ‘देव आले पंढरीला’ ही कथा  पंढरीच्या पांडुरंगाशी निगडित घटनेवर बेतलेली आहे.
‘मेवाडचा महावीर’ या कथेत औरंगजेबाविरोधात समर्थपणे लढा देणारा राजपूत महावीर आपल्याला भेटतो. ‘सरदार कडकराम’ ही कथाही बालगोपाळांचं उत्तम मनोरंजन करणारी आहे.
लहानग्यांना स्फूर्तिदायक, बोधप्रद व निखळ मनोरंजन करणारी ही पुस्तकं आहेत.
लता