शल्य बोचणे : वाक्प्रचाराची गोष्ट Print

मेघना जोशी - २० मे २०१२
altकौरव-पांडव युद्धात द्रोणाचार्याचा वध झाला आणि द्रोणाचार्यानंतर सेनापती कोण? असा जटिल प्रश्न कौरवांना पडला. त्यावर तोडगा म्हणून दुर्योधनाने सेनापतीपद अंगराज कर्णाकडे सोपविलं. कर्ण दुर्योधनाला म्हणाला, ‘जर पांडवांचा पराभव करायचा असेल तर मला कृष्णासारखा कुशल सारथी दे.’ त्यावर दुर्योधन म्हणाला, ‘आपल्या सैन्यात कृष्णासारखा कुशल सारथी कोण?’
कर्ण उत्तरला, ‘राजा शल्य!’ दुर्योधन लगेचच हा प्रस्ताव घेऊन राजा शल्याकडे गेला. सूतपुत्र कर्णाचे सारथ्य स्वीकारण्याचा हा प्रस्ताव शल्याला घोर अपमानास्पद वाटला. प्रथम त्याने नकारच दिला, पण हो- नाही करता करता तो सारथ्य करण्यासाठी एकदाचा तयार झाला. पण त्यासाठी शल्याने एक अट घातली, ‘सारथ्य करताना मी जे बोलेन ते कर्णाने निमूटपणे ऐकून घेतले पाहिजे’ आणि खरेच, ज्या क्षणापासून त्याने लगाम हाती घेतला त्या क्षणापासून कर्णाला वाक्बाणांनी घायाळ करण्यास सुरुवात केली. तो कर्णाला पळपुटा म्हणाला, उष्टय़ा अन्नावर मातलेला कावळा म्हणाला, आईने नदीत सोडलेला नावडता पुत्र म्हणाला. ‘सूतपुत्र’ म्हणून त्यानं वारंवार त्याला खिजवलं. कर्णाचं पुरतं मानसिक खच्चीकरण करण्याचं त्यानं ठरवलंच होतं जणू! अगदी शेवटपर्यंत एकही क्षण त्यानं असा सोडला नाही की, शब्दाच्या फटक्यानं कर्णाला घायाळ केलं नाही. तो वाक्बाणांनी कर्णाला सतत बोचत राहिला. त्या अंगराजाच्या मनाला बोचतील अशी विधानं सतत करत राहिला.
म्हणून एखादी गोष्ट मनाला सतत बोचत असेल तर ‘शल्य बोचणे’ असं सर्रास म्हटलं जाऊ लागलं.
क्रमश: