टोपलीभर चांदणे! Print

altरविवार , २७ मे २०१२

चांदोमामा चांदोमामा
ऐक माझे थोडे!
टोपलीभर चांदणे दे
सोडव माझे कोडे!
गावाकडचा रस्ता माझ्या
दुर्गम आणि दूर! खाचखळगे, धूळ-फुफाटा
अंधाराने चूर!
बाबा माझे कामासाठी
रोज जाती शहरात!
रात्र होते येण्या त्यांना
पुन्हा आमच्या गावात!
साप, विंचू, काटे चुकवीत
जेव्हा ते निघतात,
श्वापदे जंगली कुठे
दबा धरून बसतात!
गाडी नाही गावाकडे
येत आमच्या अजून!
वाट बघत बाबांची मी
रोज जातो झोपून.
भेट आमची होत नाही
काय करू मी आता?
चांदण्यांचे ‘बी’ लावून
उजळीन म्हणतो वाटा!
उजेडात या बाबा माझे
घरी लवकर येतील!
परिकथा सांगत सांगत
कवटाळून मज घेतील!

सुदर्शन धस
अहमदनगर