अविचाराचे बळी Print

altरविवार , २७ मे २०१२
मी नेहमीच्या हॉटेलात शिरलो तेव्हा त्यानं माझा चेहरा न्याहाळला आणि एक स्मित केलं.
‘‘काय पण चेहरा पडलाय स्वारीचा! कंपनीत काही भानगड झालीय काय?’’
‘‘पोहोचायला उशीर झाला आणि बॉसच्या शिव्या खायला लागल्या, दुसरं काय?’’
त्याच्या शेजारी बसत मी म्हणालो. ‘‘अरे अरे! रोजच असा उशीर करतोस काय तू?’’
‘‘काहीतरीच काय? पण आज झालं काय, आज सकाळी नऊ वाजता बॉस काही महत्त्वाच्या सूचना देणार होता. त्यात उशीर झाला आणि चोरासारखं गुपचूप आत शिरावं लागलं. आणि हे सगळं झालं त्या हरामखोरामुळे!’’
‘‘आता हा कोण हरामखोर?’’ त्यानं माझ्यासाठी खाणं मागवलं आणि विचारलं. ‘‘मी ज्या उंच इमारतीत राहतो ना, त्यातच पहिल्या मजल्यावर राहतो तो. आता मी राहतो सातव्या मजल्यावर, त्यामुळे सकाळी घाईगर्दीच्या वेळी लिफ्टनं खाली येणं साहजिकच आहे. पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांनी जिना वापरायला हवा. त्यात वेळही कमी लागतो. पण हा लेकाचा लिफ्टनंच खाली येणार! वरच्या मजल्यावरून येणारे सगळे लोक  त्याच्याकडे जळजळीत नजरांनी बघतात, पण त्याला कसलीच फिकीर नसते. त्याच्याच कृपेनं आज थोडक्यात बस चुकली माझी आणि झाला उशीर!’’
‘‘वयस्क आहे का तो माणूस?’’
‘‘छे! साधारण माझ्याच वयाचा आहे तो.’’
‘‘पायानं अधू वगरे आहे का?’’
‘‘मलाही वाटतं असं, पण एकदा खरंच त्याला विचारून बघायचं आहे मला.’’
जरा वेळ थांबून तो म्हणाला, ‘‘माझ्या मित्रांमध्ये दोघेजण होते. त्यांची गाढ मत्री होती. आणि दोघेही एकाच ठिकाणी कामाला होते. त्यांचं एकमेकांशी छान जमायचं. मात्र एकाच बाबतीत त्यांच्यात जमीन-आसमानाचा फरक होता. एकानं ठरवलं होतं की, जिथे जिथे म्हणून शक्य असेल तिथे लिफ्टच वापरायची. अगदी पहिल्या मजल्यावर जायचं असलं तरीही! आणि दुसऱ्यानं निश्चय केला होता- काय वाट्टेल ते झालं तरी लिफ्ट न वापरता जिन्यानंच जायचं.’’
‘‘असं का म्हणे?’’
‘‘आपलंच बरोबर आहे अशी त्या दोघांचीही खात्री होती ना!’’
तो छद्मीपणे हसला आणि म्हणाला, ‘‘अरे, म्हणजे असं की लिफ्ट वापरणाऱ्याचं म्हणणं होतं की आजच्या युगात तसेही आपण अर्धमेल्या अवस्थेतच जगत असतो. त्यामुळे थोडी जरी शक्ती न वापरता राखून ठेवता आली तर ते आरोग्यासाठी चांगलं.’’
‘‘अस्सं!’’
‘‘आणि दुसऱ्याला वाटायचं की, आजच्या युगात तसाही आपल्याला व्यायाम कमीच पडतो, त्यामुळे निदान जिन्यानं चढउतर करून तरी पायांना आणि कमरेला थोडा ताण दिला पाहिजे.’’
‘‘तेही बरोबरच आहे..’’
मी मान डोलावली.
‘‘एक दिवस त्यांच्या कंपनीमध्ये भरदिवसा दरोडेखोर शिरले. दरोडेखोरांकडे बंदूक होती. पण त्या लिफ्ट वापरणाऱ्या मित्रानं त्यांचं लक्ष नाही असं पाहिलं आणि संधी साधून तिथून धूम ठोकली.’’
‘‘मग?’’
त्यांचं ऑफिस दुसऱ्या मजल्यावर होतं. तो जिन्यानं उतरून पळाला असता तरी निसटू शकला असता. पण लिफ्टचं दार उघडं असलेलं त्यानं पाहिलं. शिवाय त्याला नेहमीची सवय होतीच. घुसला बेटा लिफ्टमध्ये!’’
‘‘मग पुढे काय झालं?’’
‘‘मेला बिचारा.’’
‘‘..म्हणजे त्यांनी गाठलंच का त्याला शेवटी?’’
‘‘अरे, तसं नाही. लिफ्टचं दार बंद झालं असतं तर सहज पळू शकला असता तो. पण लिफ्टचं दार बंद झालंच नाही.’’
‘‘का?’’
‘‘तिथे फलक लावला होता. ‘तपासणी चालू, लिफ्ट बंद’. गडबडीत लक्षच गेलं नाही त्याचं फलकाकडे.’’
‘‘अरेरे!!’’
‘‘त्या दुसऱ्या मित्राला झालेल्या प्रकाराचा चांगलाच धक्का बसला. त्यानंतर तो नेहमी म्हणायचा. ‘‘लिफ्टमध्ये चढूच नये कधी. ‘तपासणी चालू, जिना बंद’ असा फलक कधीही लावणार नाही कुणी!’  पण ..’’
‘‘पण काय?’’
‘‘लवकरच तोही मरण पावला, दुसरं काय?’’
‘‘का? जिन्यावरून घसरून गडगडला की काय?’’
‘‘नाही रे, त्यांच्या कंपनीनं झालेल्या प्रकारातून धडा घेतला आणि आपली जागा दुसऱ्या ठिकाणी हलवली. एका उंच, गगनचुंबी इमारतीच्या चाळिसाव्या मजल्यावर..’’
जपानी लेखक  : जिरो अकागावा
अनुवाद :  निसीम बेडेकर