वाक् प्रचाराची गोष्ट : यादवी माजणे Print

altमेघना जोशी , रविवार , ३ जून २०१२
यादव हे श्रीकृष्णाचे वंशज. कृष्ण व बलराम यांनी वंशाला मिळवून दिलेल्या नाव, कीर्तीमुळे ते मस्तवाल झाले होते. एकदा कण्वमुनी, विश्वामित्र ऋषी, नारद ऋषी अशी देवतुल्य मंडळी द्वारका नगरीत प्रवेश करत असता या मस्तवाल यादव तरुणांना त्यांची थट्टा करायची लहर आली. सुंदर व नाजूक दिसणाऱ्या सांब नावाच्या तरुणाला त्यांनी साडी-चोळी नेसवली व स्त्रीवेषातील सांबाला त्या ऋषींसमोर नेत, ऋषींची खिल्ली उडवण्याच्या हेतूने विचारले, ‘मुनिवर्य, ही स्त्री प्रसूत होऊन तिला पुत्र प्राप्ती होईल की, कन्यारत्न प्राप्त होईल?’ या त्यांच्या थट्टेने ते सर्व मुनी भयंकर अपमानित व क्रोधित झाले. ते क्रोधाने उद्गारले, ‘या बाईला लोखंडी मुसळ होईल व ते वृष्णी व अंथक कुळांचा नाश करील.’
मुनींची ही शापवाणी त्या युवकांनी हसण्यावारीच नेली, पण नंतर त्यांचे धाबे दणाणले जेव्हा खरेच सांबाच्या उदरातून मुसळ निघाले. त्या यादवपुत्रांनी त्या मुसळाचा नाश करण्याच्या हेतूने त्याचे चूर्ण केले व ते समुद्रात फेकले. असे ते यादवपुत्र अत्यंत उन्मत्त बनले होते. एवढे उन्मत्त की, शेवटी मादक पेयांचे सेवक करून ते एकमेकांच्या जिवावर उठले. त्यावेळी त्यांना परावृत्त करण्यासाठी श्रीकृष्णाने समुद्रतीरावरील लव्हाळी उपटून त्या यादवपुत्रांवर फेकली. त्यावेळी त्या लव्हाळ्याचे मुसळ बनले व त्या उन्मत्त यादवपुत्रांचा संहार करीत सुटले. अशारीतीने शेवटी सर्व यादवकुळाचा पूर्णपणे नायनाट झाला.
म्हणूनच, एकाच खानदानातील व्यक्ती लोभाने किंवा मदाने एकमेकांचा संहार करतात तेव्हा ‘यादवी माजणे’ असे म्हटले जाते.
(क्रमश:)