नाचता येईना, अंगण वाकडे! Print

altडॉ. लीला दीक्षित , रविवार , ३ जून २०१२
यंदा सुधाताईंचा दिवाळसण होता. त्यामुळे गावाला सारं कुटुंब जमलं होतं. सुधाताईंच्या सासरची पाच-सहा मंडळी आयत्या वेळी येणार होती. सुधाताईंच्या दोन्ही मावश्या, त्यांचे कुटुंबीय सुलभा आत्या, तिचा जयेश आणि जयंती. आजी-आजोबा तर होतेच, पण सुधाताईंच्या आजोळहून नातीचे कौतुक पाहायला आजी-आजोबा आले होते. घरात चांगली २५-३० माणसे. दिवाळीच्या आधी दोन दिवस सारी मंडळी दिवाळसणाची तयारी करायला हजर. सुजय सुधाताईंचा लाडका भाऊ. सारी चुलत माणसं, मामे भावंडं जमा झाल्याने तो खूश झाला. नानुमामा साऱ्यांचा म्होरक्या. गावाकडचा वाडा चांगला चौसोपी, दुमजली. मधल्या चौकात छान मांडव घातला होता. नानुमामा चतुराईने मुलांकडून कामे करून घेत होता.
‘हे बघा मुलांनो, आता आज आपण साऱ्यांनी मंडप सुशोभन करू. मी रंगीत कागद आणले आहेत. तुम्ही नऊ मुले आहात ना! तुमचे तीन गट. तुम्ही प्रत्येकाने मंडपाला लावण्यासाठी कातरकाम करून माळा, पताका, नक्षीकामाचे आकार तयार करा. तोपर्यंत मी वाडीत नारळाचा पाडा चाललाय, तेथे जाऊन येतो.’ नानुमामाने प्रत्येकाला कात्री, गोंदाची बाटली, दोरा, रंगीत कागद दिले आणि तो वाडीत गेला.
सुलभा आत्याची जयंती जरा आगाऊ. नुसतीच बडबडी. हाताने प्रत्यक्ष काम कमी. बडबडच जास्त. नानुमामाने सर्वाचे गट करून काम वाटून दिले तशी म्हणाली- ‘मामा, त्याचे काय आहे, हे सारे मी एकटीनेपण करीन. अगदी छानपैकी. तू पाहातच राहशील.’
‘बरंऽ बरंऽ आधी तुला दिलेल्या कागदातून तर कौशल्य दाखव तुझे,’ मामा हसत म्हणाला.
सारी मुले कामाला लागली. कुणी जाड पुठ्ठय़ाचे त्रिकोण-चौकोन करून त्याला जाळ्या चिकवटल्या. कुणी लांबच लांब जपानी कातरकामाच्या माळा तयार केल्या. कुणी सुंदर पताका बनवल्या. जयंतीच्या गटात जयेश होता. तो तर लहानच आणि सुमन मावशीची ललिता होती. ती सर्वात मोठी अन् खूप हुशार. तिने पुठ्ठय़ाच्या चांदण्या केल्या. त्याला तिनेच बरोबर आणलेला चंदेरी कागद चिकटवला आणि शिडीच्या साहाय्याने सुजयची मदत घेऊन छताला चांदण्या लटकवून टाकल्या. जयंतीला काहीच जमले नव्हते. कातरकाम करायचा प्रयत्न केला, पण घडय़ा चुकल्या. त्यामुळे कागद उलगडल्यावर नक्षी तर राहू द्या, पण कागदाचे कपटे हाती आले.
नानुमामा आला. प्रत्येकाची वस्तू पाहून खूश झाला. म्हणाला- ‘जयंती, तू काय केलंस?’
‘त्याचे काय आहे नानुमामा, माझ्या पायाच्या अंगठय़ाला ठेच लागलीय ना? मला बसता येईना नीट. मग कसं करणार मी कातरकाम? आणि त्यात कात्रीला धार नाही.’
सारी मुले हसली. ‘पायाने धरतात का कात्री?’ ललिताला माहीत होती, जयंतीची टंगळमंगळ. मुळात काही येत नाही आणि आव  केवढा? ती मोठय़ांदा म्हणाली- ‘जयंती तुझे कसे आहे? नाचता येईना अंगण वाकडे.’
‘काय म्हणतेस तू? मला येत नाही? आता पाहुणे आले की, दाखवतेच माझी करामत,’ जयंती पाय आपटून निघून गेली.
दिवाळीचे दिवस सुरू झाले. सारी पाहुणी जमली. गप्पा, फराळ, मुलांचा धूडगूस, पाहुण्यांची सरबराई यात दिवस मजेत चालले होते. पाडव्याच्या दिवशी पंगतीला चांगली ३० माणसे होती. नानुमामांनी प्रत्येक मुलाला एकेक ताटाची रांगोळी काढायला दिली. बाकीच्या रांगोळ्या नानुमामा, शरदकाका, शारदाकाकू, अशा साऱ्यांनी काढल्या. पंगत रांगोळ्यांनी सजली. मुलांनी छान रांगोळ्या काढल्या. फक्त जयंतीने रांगोळी काढली नव्हती. नुसते ताटाभोवती फराटे. नानुमामा म्हणाला-
‘अगं जयंतीऽ तुझी करामत कुठे गेली?’ इतक्यात सुजय नानुमामाच्या कानात काहीसे कुजबजला. ‘त्याचे काय आहे मामा, माझ्या रांगोळीच्या वाटीत कुणीतरी पाणी घातले. त्यामुळे रांगोळी हातातून पडेनाच. नाहीतर शाळेत माझा रांगोळीत पहिला नंबर असतो,’ जयंती म्हणाली,
नानुमामाला राग आला. स्वत:च्या रांगोळीच्या वाटीत थोडं पाणी जयंतीनेच घातले होते. इतक्या पाहुण्यांच्या देखत जयंतीला रागावणे बरे नव्हे. तो जयंतीला घेऊन मागच्या अंगणात गेला. जयंतीच्या आई- सुलभा आत्या मागून गेली. नानुमामा म्हणाला, ‘जयंती, तुझे वागणे मला अजिबात आवडले नाही. ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी तुझी गत आहे. आपल्याला जे येत नाही ते आईकडून, मैत्रिणींकडून शिकावे. तुझ्या नुसत्याच बढाया आणि साधनांना नावे ठेवायची. आज तर तू खोटं बोललीस. तुझ्या रांगोळीला तूच पाणी घातलेस खरं ना?’
मागे जयंतीची आई उभी होती. ती म्हणाली, ‘दादाऽ बरं केलंस. जयंतीला समज दिलीस. काम तर काही करीत नाही. नुसती साऱ्याला नावे ठेवायची वाईट सवय.’
जयंती रडू लागली. ‘जयंती डोळे पूस. चल, मी तुला शिकवतो रांगोळी. सोपी रांगोळी काढू या. येईल तुला.’
मामाने तिचा हात धरला. जयंती खुदकन् हसली. तिची चूक तिला कळली ना!