बसराची ग्रंथपाल Print

रविवार ,१० जून २०१२

ही गोष्ट आहे, इराकमधील एका शहरातील ग्रंथपालाची. तिचं नाव आहे आलिया. युद्धाचे ढग जमू लागले तसे तिथल्या पुस्तकांचं काय होणार, ही चिंता आलियाला अस्वस्थ करते. प्रत्यक्ष युद्ध सुरू झाल्यानंतर असंख्य लोक मृत्युमुखी पडतात. सांस्कृतिक वारसा सांगणाऱ्या इमारती जमीनदोस्त होतात. अशा या वातावरणात पुस्तकांच्या मौल्यवान ठेव्याला कसं वाचवायचं, या विवंचनेत आलिया असते. या पुस्तकांची काळजी ती कशी घेते, पुस्तकांचा सुरक्षित सांभाळ ती करू शकते का, याचे मनोहारी चित्रण या लहानशा गोष्टीत करण्यात आले आहे. या पुस्तकाच्या पानोपानी काढण्यात आलेली चित्रंदेखील तितकीच वेधक आहेत. प्रत्येक पानावर मोठमोठाली चित्रं आणि कमी मजकूर अशी  बालसाहित्यासाठी आदर्श ठरणारी अशी या पुस्तकाची रचना आहे. लहान मुलांना ही बालकथा वाटेल, आणि मोठय़ांना त्यातून आणखी बरेच काही कळेल, असे हे पुस्तक आहे.
आपल्या बालसाहित्यात नेमके काय नाही, हे समजून घेण्यासाठी ही नितान्तसुंदर गोष्ट उपयुक्त ठरेल. वाचनाचा संस्कार, आशावाद, प्रतिकूल परिस्थितीशी केलेले दोन हात, ज्ञानाविषयीचा आदर, वाङ्मयाबद्दलचं प्रेम हे सारं काही या छोटेखानी गोष्टीत एकवटलं आहे. कुठलीही भाषणबाजी, उपदेश न करता तरल, पारदर्शी गोष्टीतून हे सारं काही आपण मुलांपर्यंत पोहोचवू शकतो, हेच या अनुवादित कथेतून स्पष्ट होते.
बसराची ग्रंथपाल (इराकमधील सत्यकथा)- जेनिट विन्टर, अनुवाद- पृथ्वीराज तौर, भारत ज्ञान-विज्ञान समुदाय, पृष्ठे- ३२, मूल्य- ३० रु.

जादूच्या बिया
ही गोष्ट आहे जॅक नावाच्या माणसाची. ज्याला एक जादूगार दोन सोनेरी बिया देतो. एक खाऊन टाकायला- जी खाल्ल्यानंतर वर्षभर त्याला भूक लागणार नाही आणि दुसरी पेरायला- ती पेरल्यानंतर आणि रोपं मोठी झाली की त्यांना पुन्हा दोन सोनेरी बिया येतील.. जॅक त्या बियांचं काय करतो, त्यातल्या किती पेरतो, पेरल्यानंतर खरोखरीच फळं धरतात का, त्यातून बिया येतात का? किती येतात? मग नव्या आलेल्या बियांचं तो काय करतो? अचानक आलेल्या वादळाने त्या बियांची स्थिती काय बरं होते? अशी वाढत जाणाऱ्या बियांची ही गोष्ट आहे. केवळ बियांचीच नव्हे, तर गणिताच्या गमतीचीही! लहानच काय, मोठेही या गोष्टीत पुरते गुंगून जातात. गोष्टीत रेखाटलेल्या चित्रांनीही वेगळीच गंमत आली आहे.
जादूच्या बिया - मित्सुमासा अ‍ॅनो, अनुवाद- पृथ्वीराज तौर, भारत ज्ञान-विज्ञान समुदाय, पृष्ठे- ३२, मूल्य- ३० रु.

सृजनपंख
कसं असतं बरं आजच्या मुलांचं भावविश्व? भोवतालच्या कोलाहलात त्यांचं निरागसपण संपून जातं की तस्संच राहतं, याचा अदमास घेण्यासाठी अलीकडेच एक अनोखा शैक्षणिक प्रयोग करण्यात आला. त्यातून निवडक साहित्य ‘सृजनपंख’ या पुस्तकात संपादित स्वरूपात प्रकाशित करण्यात आलं आहे. शब्द आणि चित्राच्या माध्यमातून अभिव्यक्त झालेल्या राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांच्या साहित्याचा यात समावेश करण्यात आला आहे. यात निवडक साडेचारशे चित्रे आणि तीनशेहून अधिक कविता देण्यात आल्या आहेत. लहानशा खेडय़ातील वाडी-तांडय़ापासून महानगरापर्यंत आणि आश्रमशाळेतील मुलांपासून इंटरनॅशनल स्कूलपर्यंत, सरकारी शाळांपासून सीबीएसई- आयसीएसई शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांपर्यंत अशा वेगवेगळ्या वातावरणातील मुलांनी यासाठी आपले साहित्य पाठवले आहे. हे विद्यार्थी मराठी, हिंदी आणि इंग्रजी शाळेत शिकणारे  आहेत. त्यांचा वयोगट आहे अगदी बालवाडीपासून अकरावीपर्यंतचा.
या प्रकल्पासाठी ठिकठिकाणच्या शाळांकडून विद्यार्थ्यांचे साहित्य मागविण्यात आले. त्या साहित्याचे संपादन प्रा. स्वाती काटे आणि डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले आहे. त्यांनी या शैक्षणिक प्रकल्पाद्वारे हाती आलेले काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. चित्रे आणि कविता पाठवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण हे मुलांपेक्षा अधिक असणे, मुलांमध्ये दिसून येणारे निसर्गाविषयीचे प्रेम, त्यांच्यात कायम असलेल्या बालसुलभ वृत्ती, त्यांच्या साहित्यात स्वप्निल जगापासून सण, उत्सव, सामाजिक प्रश्न, निसर्ग या सर्व विषयांचा असलेला समावेश या नोंदींचा समावेश आहे. शालेय पाठय़पुस्तकातील कवितांची अहिराणी व गोरमाटीतील रूपांतरे वाचताना मुलांची भाषेविषयीची समजही दिसून येत असल्याचे संपादकद्वयीने म्हटले आहे. मुलांची कल्पकता आणि स्वयंप्रेरणा या दोन निकषांवर निवड झालेली या प्रकल्पासाठीची चित्रं पाहणे हा एक रंजक अनुभव आहे. ‘सृजनपंख’च्या निमित्ताने राबविण्यात आलेला हा अभिनव शैक्षणिक प्रकल्प आजच्या मुलांचं भावविश्व जाणून घेण्यासाठी नक्कीच दुवा ठरेल, हे निश्चित. यासारखे अधिकाधिक प्रकल्प हाती घेतल्याने मुलांच्या अभिव्यक्तीला वाव मिळेल आणि ती जोपासण्याचा प्रयत्नही होईल.
सृजनपंख, सायन पब्लिकेशन, पृष्ठे- १०४, मूल्य- रु. १२५.
सुचिता देशपांडे
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it