बोनीची अंघोळ Print

मृणाल तुळपुळे ,रविवार ,१० जून २०१२

एका शेतकऱ्यानं त्याच्या शेतावर गाय, कोंबडय़ा, बदकं, कुत्रा, घोडे, शेळ्या असे खूप प्राणी पाळले होते. त्या सर्वाची एकमेकांशी अगदी गट्टी! त्यातला बोनी नावाचा खोडकर कुत्रा सगळ्यांचा खूप लाडका होता. तो सारखा पाण्यात, मातीत खेळायचा आणि मग घरभर चिखलाचे पाय उठवायचा. शेतकऱ्याची मुलगी -सारा बोनीला आंघोळ घालण्यासाठी पकडायला गेली की तो लपून बसायचा, कारण त्याला अंघोळ करायला अजिबात आवडायचं नाही.
एकदा सारानं शाम्पूची बाटली, टॉवेल, ब्रश, रबर मॅट आणि बादलीत गरम पाणी, अशी बोनीच्या आंघोळीची तयारी केली. बोनीनं ते पाहिलं आणि तिथून धूम ठोकली. सारानं बोनीला खूप हाका मारल्या, पण तो काही आला नाही. मग तिनं खिडकीजवळ खेळत असलेल्या शेळीला विचारलं, ‘तू बोनीला पाहिलंस का? तो कुठं आहे त्याला शोधून आण.’ शेळीनं बोनीला इकडं तिकडं शोधलं, पण तिला काही तो सापडला नाही.
मग शेळी घोडय़ाकडं गेली व तिनं घोडय़ाला विचारलं, ‘बोनी तुझ्या तबेल्यात लपला आहे का?’
घोडा म्हणाला, ‘नाही गं! थांब मी गाईंना विचारतो की तो त्यांच्या गोठय़ात लपला आहे का?’ पण बोनी गोठय़ातही नव्हता. मग शेळीनं बोनीला शेतात जाऊन शोधलं, पण तो काही सापडला नाही.
इकडे कोणाच्या नकळत बोनी हळूच घरातल्या बाथरूममध्ये जाऊन बसला होता. मनात म्हणाला, ‘मी इथं लपलो आहे हे कोणाला कळणारच नाही. मी आता साराला सापडलो नाही की ती मला आंघोळही घालणार नाही.’
ह्या आनंदात बोनी उडय़ा मारत खेळायला लागला. खेळता खेळता त्याचा धक्का लागून वर ठेवलेली बादली नळावर आपटून त्याच्या अंगावर पडली आणि बादलीची कडी त्याच्या पाठीला लागली. बादली आपटल्यानं शॉवर सुरू झाला आणि त्यातलं गार पाणी बोनीच्या अंगावर पडलं. बोनीची आपोआप गार पाण्यानं आंघोळ झाली. बादलीचा आवाज ऐकून सारा बाथरूमकडे गेली. बोनीचे चिखलांनी भरलेले पायाचे ठसे बाथरूमच्या दारापर्यंत उठले होते. तिनं लगेच ओळखलं की बोनीच बाथरूममध्ये आहे. सारा आत जाऊन बघते तर ओला चिंब झालेला बोनी कुडकुडत उभा होता. पाठीला बादलीची कडी लागल्यानं जखमेतून रक्त वहात होतं. सारानं शॉवर बंद करून घाबरलेल्या बोनीला टॉवेलमध्ये गुंडाळून प्रेमानं जवळ घेतलं. त्याचं अंग पुसून जखमेवर औषध लावलं.
तेव्हापासून बोनी अगदी शहाणा झाला. तो आता कधीही मातीत लोळत नाही आणि सारानं बोलावलं की लगेच आंघोळ करायला जातो.