छोटंसं घर माझं Print

वर्षां  भिसे

रविवार १५ जुलै २०१२
छोटंसं घर माझं
घराभोवती अंगण
अंगणामध्ये पाऊस
घालतो रिंगण

छोटंसं घर माझं
घराभोवती झाडे-वेली
पावसाने त्यावरची
पाने-फुले भिजवली

छोटंसं घर माझं
घरासमोर साचलं तळं
त्यात सांडले थोडे
ढग काळे काळे

छोटंसं घर माझं
घराभोवती अंगण
अंगणामध्ये भिजायला
या सारेजण!

एक कळी
रवींद्र जवादे
पानांमध्ये आत
एक होती कळी
खूपच लाजाळू
आणि फारच खुळी!

तिच्याशी खेळे
झुळूझुळू वारा
रानातल्या गोष्टी
सांगायचा सारा

लाजत यायचं
एक फुलपाखरू
दोघांचाच खेळ
मग होई सुरू

दुपारी हळूच
यायची चिमणी
कळीच्या कानात
चिवचिव गाणी

कधीतरी येई
दूरचा पक्षी
पानांवर तिच्या
गोंदवायचा नक्षी!

एकदा खरंच
घडलं नवल
कळीचं झालं
सुंदरसं फूल!