हत्ती आले जमिनीवर Print

श्रीपाद कुलकर्णी ,रविवार १५ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘‘बा बा, हा टिन्या म्हणतो हेलिकॉप्टर कुठूनही उडू शकतं आणि कुठेही उतरू शकतं. विमानासारखी लांबलचक धावपट्टी लागत नाही त्याला.’’  गजाभाऊ खुर्चीत विसावतात तोच बन्या माहिती देऊ लागला.  
‘‘बरोबर आहे त्याचं. फक्त हेलिपॅड असलं पाहिजे म्हणजे ते अलगद त्या हेलिपॅडवर उतरतं. मग एखाद्या जहाजावर, सीमेवरच्या पर्वतावर एवढंच काय घराच्या छपरावरही ते उतरू शकतं.’’
‘‘खरंच?’’ बन्या अविश्वासानं उद्गारला.
‘‘अरे, परवा बातम्यांत नाही का सांगितलं, भारतातले ते सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत ना त्यांनी २७ मजली प्रशस्त घर बांधलंय, त्यांच्या टेरेसवर हेलिपॅड आहे त्यांचं खाजगी हेलिकॉप्टर उतरण्यासाठी.’’
‘‘कित्ती गंमत ना!’’ टिन्या बन्याला टाळी देत उद्गारला आणि पुढे म्हणाला, ‘‘काका, खूप वर्षांपूर्वी प्राण्यांनापण पंख होते ना हो? बाबांनी मला तो सिनेमा दाखवला नं डायनासोरचा, त्यात होते मोठे पंखवाले डायनासोर. अबब, केवढे अवाढव्य ते प्राणी आणि केवढे त्यांचे पंख! एकदम सही दाखवलेले.’’
त्यावर गजाभाऊ हसून म्हणाले, ‘‘ते प्राणीच काळाच्या ओघात नष्ट झाले रे. पण आपल्या परिचयाचे हत्ती.. त्यांनापण खूप खूप युगांपूर्वी चार चार पंख होते बरं का पाठीवर.. ओरिसात त्यावर एक दंतकथाच प्रचलित आहे. दंतकथा म्हणजे पूर्वापार लोक पिढया न् पिढय़ा सांगत येतात त्या गोष्टी रे..’’
‘‘सांगा नं बाबा मग ती गोष्ट.’’ असं म्हणून बन्यानं गजाभाऊंपुढे मांडच ठोकली. टिन्याही  त्याच्याशेजारी बसला. गजाभाऊ सांगू लागले,
‘‘इंद्राचं वाहन माहिती आहे नं तुम्हाला.. हत्ती, नाव त्याचं ऐरावत. तो आणि त्याचे भाऊबंद हत्ती देवांना िहडवून आणायचे स्वर्ग आणि पृथ्वीभर.  त्यांना वेगात सर्वत्र संचार करता यावा म्हणून पाठीवर भलेमोठे चार पंख दिले होते ब्रह्मदेवानं. ते हळूहळू पृथ्वीवासी स्थिरावले, त्यांना देवांच्या मदतीची फारशी गरज उरली नाही. देवांनाही  पृथ्वीवर काम राहिलं नाही. ते स्वर्गातच जास्त वेळ काढू लागले. पण हत्तींची शटल आपली सुरूच. त्यांना अशा काही गमतीशीर सवयी लागलेल्या होत्या की त्यामुळे त्यांचा उपद्रवच वाढू लागला म्हणजे बघा, आकाशात उडत बसायचं, मध्येच तरंगत येऊन नदीवरनं भरकन जाताजाता मोठे तरंग उठवायचे आणि माणसांच्या, पशुपक्ष्यांच्या अंगावर पाणी उडवून विनाकारण भिजवायचं, पहाटे पहाटे कौलारू घरांच्या छपरावर उडी मारून उगाचच कर्कश्श ओरडायचं, असे विक्षिप्त प्रकार चालू केले हत्तींनी. यामुळे व्हायचं काय तर पिकांची नासधूस होऊ लागली, घरं मोडकळीला आली, नव्हे बरीचशी पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोलमडूनच पडली. पण यात हत्तींना मजाच वाटायची.  
हा सारा उच्छाद मांडलेला पाहून देवांना माणसांची दया आली. या हत्तींना अद्दल घडवायची वेळ आली हे देवांनी ओळखलं. इंद्रानं ऐरावताला सांगितलं, ‘जा, तुझ्या साऱ्या भाऊबंदांना माझा निरोप दे. त्यांना देवांनी एक जोरदार मेजवानी द्यायचा बेत केलाय म्हणून सांग. उद्याच दुपारी भोजनाला येऊदे सगळ्यांना. तू सगळ्य़ांना हवं नको बघ बरं का.’  ऐरावतानं हे निमंत्रण देताच सारे हत्ती त्यांना सांगितलेल्या एका जंगलात मेजवानीला जमले . देवांनी अगदी आग्रह करून करून सगळ्यांना केळीचे घडच्या घड, फणस, ऊस काय हवं ते खाऊ घातलं. एवढं जाम झालं पोट सगळ्या हत्तींचं की त्यांना झोप अनावर झाली. तिथल्या तिथेच बसले, मग हळूहळू आडवे झाले, पोटाचा नगारा सांभाळणं जड झालं तेव्हा चक्क ते चारी पाय वर करून पाठीवर उताणेच झाले आणि अपचन झालेले हत्ती अक्षरश: गडाबडा लोळू लागले. देव याच गोष्टीची वाट बघत होते. पाठीवर उताणे होऊन लोळणाऱ्या हत्तींचे पंख देवांनी हळूच वेगळे केले. बिनपंखांचे बिचारे हत्ती मग निमूटपणे जंगलात जाऊन झाडपाला खाऊन, नदीकाठी जाऊन पाणी पिऊन राहू लागले. त्यांचा त्रास कमी झाला, म्हणून माणसांनीही देवांचा जयजयकार केला. पुढे गजाननाच्या रूपानं माणसानं हत्तीलाही मान दिलाच की. पण ओरिसातल्या या दंतकथेचा पुढचा मजेशीर भाग म्हणजे, देवांनी म्हणे या पंखांचं काय केलं तर त्यातले दोन पंख दिले मोराला ज्यांचा पिसारा फुलवून मोर नाचतो पाऊस आला की आणि दोन पंख लावले केळीच्या झाडाला. जेवायला पंगतीमध्ये लोक वापरतात ना मोठी केळीची पानं ती म्हणजे ते हत्तींचे छाटलेले पंख, असा समज आहे. अशा तऱ्हेनं हत्तींची हेलिकॉप्टर्स कायमची जमिनीवर उतरली. यातनं बोध काय घ्यायचा तर आपल्या बळाचा गरवापर करणाऱ्यांना देव शिक्षा करतो आणि कायम जमिनीवर ठेवतो.  
(ओरिसातील दंतकथेवर आधारित)