पाऊस आला Print

रविवार २२ जुलै २०१२
alt

पाऊस आला, पाऊस आला  
सुवास मातीचा सांगत सुटला

बांबूच्या बनातून सनईची धून
तबल्याचे तालही आले ढगातून  

ताडमाड डोलती, पाने पिटती टाळ्या
फुलझाडांतून कशा उसळ्या मारती कळ्या

पंखांच्या दुलईत चिऊ काऊ घरटय़ात
स्वप्नांच्या राज्यात भिजून आले पावसात

बेडकांच्या लग्नाला पाचोळ्याची वाजंत्री
‘डराव डराव’ भटजींच्या डोई कुत्र्याची छत्री

कापसासारखा ससा भिजून झाला ओला
रडत रडत म्हणतो कसा ‘‘चांदोबा कुठे गेला?’’
श्रीपाद पु. कुलकर्णी

छोटंसं घर माझं
alt
छोटंसं घर माझं
घरोभोवती अंगण
अंगणामध्ये पाऊस
घालतो रिंगण

छोटंसं घर माझं
घराभोवती झाडे-वेली
पावसाने त्यावरची
पाने-फुले भिजवली

छोटंसं घर माझं
घरासमोर साचले तळे
त्यात सांडले थोडे
ढग काळे काळे

छोटंसं घर माझं
घरोभोवती अंगण
अंगणामध्ये भिजायला
या सारेजण!
वर्षां मारूती भिसे

झिम्मड!

alt
ढगांचे तांडव
विजेची लव्लव्
हरवल्या दिशा
कुणीकडे?..

वाऱ्याचा दंगा
झाडांचा पिंगा
पावसाचा झिम्मा
चोहीकडे!..१

टिप्-टिप्; रिम्-झिम्
तन-मन ओलेचिंब
पाखरांची भीर-भीर
कुणीकडे?

तुडुंबले पाणी
अंगणात गाणी
बेडकांचा ऋतुरव
चोहीकडे!..२

तुझी माझी जोडी
कागदाची होडी
‘इंद्रधनु’ कमान
कुणीकडे?


ऊन सोनसळी
फुलांवर पाकोळी
मृदगंध परिमळ
चोहीकडे!..३

रानात कुजबुज
झऱ्यांचे अलगुज
पायवाटा खुणावती
कुणीकडे?

मातीत हुंकार
अणू-रेणू हिरवागार
आनंदु झिम्मड
चोहीकडे!!..४
- डॉ. प्रकाश गोसावी