.. जिवाला लावी पिसे Print

सुचिता देशपांडे ,रविवार २२ जुलै २०१२ ।
alt

असं काही सृजनशील काम- जे केल्याने रोजच्या कामातून, अभ्यासातून विरंगुळा मिळतो, तो म्हणजे छंद! असा छंद  मनाला टवटवीत करतो, पुन्हा कामाकडे वळण्याचा उत्साह देतो आणि त्यासोबत नवनिर्मितीचा आनंदही देतो. शालेय विद्यार्थ्यांना अशा काही अर्थपूर्ण छंदांकडे वळण्याचा मार्ग अर्चना जोशी लिखित ‘छंदमित्र’ या पुस्तकाने सुकर केला आहे. महागडय़ा वस्तूंच्या वाटेला न जाता भोवताली सहजगत्या उपलब्ध असलेल्या वस्तूंच्या साहाय्याने काय बनवता येईल, हे या पुस्तकात सांगितले आहे. काचा, काठय़ा, कागद, वाळू, जाळीदार पाने, शिंपले अशा गोळा केलेल्या विविध गोष्टींचा वापर करून बनविता येतील, अशा वेगवेगळ्या वस्तूंची कृती या पुस्तकात साध्यासोप्या शब्दांमध्ये सांगितली गेली आहे.
यात नारळाच्या करवंटीचा वापर करून केलेले मेणबत्तीपात्र, वाळक्या पानांचा पुष्पगुच्छ, बाटलीचा वापर करून केलेल्या बाहुल्या, सीडींचे झुंबर, वाळलेली फुले, शेंगा, टरफले, बिया यांचा वापर करून केलेला पुष्पगुच्छ, पुठ्ठय़ाच्या खोक्यापासून बनवलेला गड, सुशोभित डबा आणि चौरंग, दोऱ्याचा गणपती, पॉप-अप कार्ड, मक्याच्या कणसाच्या सालीपासून बनवलेलं टी कोस्टर, वेगवेगळ्या फुलांच्या पाकळ्यांपासून बनवलेला गणपती, पावडरच्या डब्याची फुलदाणी, रिळांचे पिरॅमिड झुंबर, रिंगांपासून बनवलेला पॉट अशा वेगवेगळ्या कलाकृतींचा समावेश आहे.
सृजनशील कलाकृती तसेच उत्तम मांडणी आणि छपाई यामुळे केवळ शाळकरी मुलांनाच नव्हे, तर काही तरी बनविण्याचा उत्साह जपणाऱ्या प्रत्येकात हे पुस्तक बरेच काही करण्याची इच्छा नक्की जागी करते.
छंदमित्र- अर्चना जोशी, कनक बुक्स, पृष्ठे- ३२, मूल्य- १०० रु.