वाक् प्रचाराची गोष्ट : बकासुरासारखे खाणे Print

मेघना जोशी ,रविवार २२ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

ए कचक्रा नगरीतल्या लोकांची ‘आजार परवडला, पण उपचार नको’ किंवा ‘भीक नको पण कुत्रं आवर’ अशी अवस्था झाली होती. सततचे परचक्र आणि पिशाच्चांचा त्रास यांनी कावून जाऊन त्यांनी ‘बक’ नावाच्या राक्षसाला नगरीच्या संरक्षणासाठी जवळ केले होते. पण हा बक म्हणजे साधासुधा नव्हता; तर दुष्ट,  नरभक्षक असा अक्राळविक्राळ राक्षस होता.
त्याने परचक्र आणि पिशाच्चापासून एकचक्रा नगरीतील जनतेला वाचविण्याचे आश्वासन दिले, पण त्या बदल्यात एक अचाट मागणी नगरवासीयांपाशी केली. तो म्हणाला, ‘मी आणि माझे राक्षसगण तुमचे रक्षण करतील, पण त्याबदल्यात नगरीतील एका कुटुंबाने मला एका वेळी २० खंडी तांदुळाचा भात, दोन रेडे जुंपलेला गाडा भरून अन्न व एक माणूस पाठवला पाहिजे. आणि हे सगळे अगदी रेडे व माणसासकट मी फस्त करीन.’ त्याप्रमाणे तो एका वेळी त्या सगळ्याचा फडशा पाडीत असे. जर एखाद्या कुटुंबाने त्याला विरोध करायचा प्रयत्न केला तर त्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना तो फस्त करून टाकत असे.
हा वीस खंडीचा हिशोब ऐकूनच आपले डोळे गरगरतील. खंडी, मण, पायली ही जुन्या काळातील धान्य मोजण्यासाठीची मापे होती. ती अंदाजे खालीलप्रमाणे.
एक खंडी= २।। मण (अडीच मण)
एक मण = १६ पायली
एक पायली = साधारणत: ३ किलोग्रॅम
एक खंडी = साधारणपणे १२० किलोग्रॅम
२० खंडी = २४०० किलोग्रॅम. (हा हिशेब मी माझ्या आजीकडून ऐकला होता.)
पुढे भीमाने अज्ञातवासात या बकासुराचा वध केला.
पण जरी बकासुराचा वध झाला तरी अचाट आणि अफाट खाणे याला ‘बकासुरासारखे खाणे’असे म्हणण्याची पद्धत मात्र कायमची रूढ झाली.
(क्रमश:)