बटण Print

रविवार २२ जुलै २०१२
alt

रात्रीची वेळ. रस्त्यानं एकजण चालत जात होता. तेवढय़ात सावलीतून अचानक समोर आलेले काही धटिंगण त्याच्यावर झेपावले आणि त्यांनी त्याला पकडलं. ते त्याला घेऊन कुठेतरी गेले. डोळ्यांवरची पट्टी काढली गेली तेव्हा त्यानं आजूबाजूला पाहिलं. एखाद्या तळघरासारखी दिसणारी खोली. अवतीभवती तेच धटिंगण. काहींच्या हातात सुरे. काहींच्या पिस्तुलं.
पण तरीही धीर करून तो म्हणाला, ‘‘काहीतरी गफलत होतेय तुमची. कुणी माझ्या वाईटावर असल्याचं आठवतही नाही मला. एक साधा सरळ माणूस आहे मी.’’
पण त्यांची गफलत झाल्यासारखंही दिसत नव्हतं किंवा ते त्याची गंमत करत असल्यासारखंही वाटत नव्हतं. त्यानं विचार केला, ‘डोकी फिरलेली दिसतायत यांची. उगीच प्रतिकार न करणंच बरं. आपल्याला मरून चालणार नाही. सुखरूप घरी परत गेलं पाहिजे. निष्कारण प्रतिकार करून फुकट जीव गमावणंही मूर्खपणाचं!’
‘तुझ्याकडून एक काम करून घ्यायचंय आम्हाला. साधं आहे अगदी. तेवढं केलंस की लगेच सोडतो तुला.’’ त्यांच्यापकी एक जण म्हणाला. त्यानं मान डोलावली.
‘‘माझा उपयोग होणार असला, तर काहीही..’’ असं उत्तर देण्यापलीकडे त्याच्यापाशी दुसरा मार्गच नव्हता. अशा प्रसंगी कोणीही तेच केलं असतं. करूया काय सांगतात ते. काहीही असलं तरी आपल्यावर गुदरलेल्या प्रसंगाची हकीकत सांगितली, तर लोकांना नक्कीच सहानुभूती वाटेल आपल्याबद्दल.
‘‘ठीक. तर मग ते तिथलं बटण दाब. ’’
त्यानं चेहऱ्यावर उसनं स्मित आणलं आणि िभतीवरचं बटण दाबलं.
बस, झालं काम! त्यांनीही म्हटल्याप्रमाणे त्याला त्या पूर्वीच्याच अंधाऱ्या रस्त्यावर आणून सोडलं.
ते धटिंगण आपापसात बोलत होते, ‘‘हे बरं झालं, कमांडरसाहेब. ‘अनवधानानं’ आण्विक क्षेपणास्र डागलं जाऊन तिसऱ्या जागतिक महायुद्धाची आता ठिणगी पडेल.
खरी गोष्ट ठाऊक असलेल्या आपल्यासारख्या लोकांकडून काही केल्या बटण दाबलंच जात नाही.. भीतीनं बोटं थरथरतात..’’
जपानी लेखक ** शिनीची होशी
मराठी भाषांतर **निसीम बेडेकर