ऑलिम्पिक ज्योत Print

श्रीनिवास डोंगरे ,रविवार , २९ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

लंडनमध्ये २७ जुलैला सुरू झालेले ऑलिम्पिक १२ ऑगस्टपर्यंत चालेल.  ऑलिम्पिक सुरू होण्यापूर्वी चर्चा असते ती ऑलिम्पिक ज्योतीची! यंदा ही ज्योत पाच खंडांत फिरवली गेली नाही. अनेक वर्षांची ही परंपरा लंडनमधील संयोजकांनी मोडीत काढली. अथेन्समध्ये प्रज्वलित झालेली ही ज्योत फक्त इंग्लंडमध्ये रिले पद्धतीने फिरली. ऑलिम्पिक ज्योतीची परंपरा फार जुनी आहे. ग्रीसमध्ये ऑलिम्पिया या गावी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा प्रारंभ झाला. इसवी सन पूर्व १४५३ ते इसवी सन पूर्व ८८४ या दरम्यान या स्पर्धा सुरू झाल्या होत्या. त्या वेळी ही ज्योत मुख्य स्टेडियममध्ये सूर्यकिरणांच्या साहाय्याने पेटवण्यात आली. त्यासाठी खास बनवलेल्या आरशांचा वापर करण्यात आला होता. ऑलिम्पिक ज्योतीची दौड मुख्य स्टेडियममध्ये संपते व या ज्योतीच्या साहाय्याने स्टेडियममधली मोठी ज्योती प्रज्वलित केली जाते. ‘रिले’तला शेवटचा धावपटूच्या हस्ते स्टेडियममधली ज्योत पेटवली जाते, त्याचं नाव अखेपर्यंत गुप्त ठेवलं जातं. मशाल पेटवायला मिळणं हा त्या व्यक्तीचा सन्मान असतो. १९२८ मध्ये अ‍ॅमस्टरडॅम ऑलिम्पिकमध्ये नव्याने या ज्योतीला ओळख देण्यात आली. ती साऱ्या विश्वाची एकवाक्यता म्हणून मिरवू लागली.
जगात कुणाचे कितीही मतभेद, वाद, संघर्ष असोत. दर चार वर्षांतून एकदा भरणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या कितीतरी महिने अगोदर ग्रीसमध्ये ज्या ठिकाणी हेराचं मंदिर उभं होतं, त्याच जागेवर ही ज्योत पेटवण्यात येते. तिथून या ज्योतीचा प्रवास सुरू होतो. विविध देशांमधून ज्योत धावपटूंकडून मिरवायची संकल्पना उचलून धरली गेली ते नाझी तत्त्वज्ञानाच्या प्रचाराचा एक भाग म्हणून. १९३६ मधल्या बर्लिन ऑलिम्पिक्सच्या वेळी ही कल्पना पहिल्यांदा मांडली गेली. हिटलरला अग्निदेवता ही आर्याच्या संस्कृतीची रक्षणकर्ती वाटे.
१९४८ मध्ये या ज्योतीचा प्रवास बोटीने झाला. इंग्लिश खाडी पार करून तिचा प्रवास पार पडला. १९५२ मध्ये पहिल्यांदा या ज्योतीने विमान प्रवास केला, तर १९५६ मध्ये ती घोडेस्वारांमार्फत मिरवण्यात आली. १९७६ मध्ये ही ज्योत रेडिओ सिग्नलमार्फत प्रज्वलित करण्यात आली. पहिल्यांदाच ही ज्योत हायटेक झाली. मागच्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या वेळी या ज्योतीने ७८ दिवसांत ७८ हजार कि.मी.चा प्रवास केला. ११३०० धावपटूंच्या हातातून ती पुढे नेण्यात आली. १९९२ मध्ये बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये स्टेडियममधील असणारी ज्योत धनुष्यातून सोडलेल्या बाणाच्या साहाय्याने प्रज्वलित करण्यात आली.
क्रीडा स्पर्धा पार पडेपर्यंत ही ज्योत विझू दिली जात नाही. तिचं रक्षण करण्यासाठी ऑलिम्पिकमध्ये एक स्वतंत्र यंत्रणाच असते. गेल्या ऑलिम्पिकमध्ये चीनने ज्योतीच्या आतापर्यंतच्या प्रवासाचा उच्चांक मोडून नवीन विक्रम केला. ज्योतीच्या विश्वसंचारासाठी चीनने खास सजवलेले जेट विमान वापरले होते.