दु:खातलं सुख Print

भालचंद्र देशपांडे , रविवार , २९ जुलै २०१२

जुन्या काळची गोष्ट. अफगाणिस्तानातील हेरत या शहरात अब्दुल्ला नावाचा कोळी राहत होता. तो स्वभावानं सालस होता. परिस्थिती अगदीच गरिबीची. मासेमारी हे त्याच्या उपजीविकेचं  मुख्य साधन. हेरत शहराजवळून वाहणाऱ्या हारी नदीवर जाऊन तो मासेमारी करत असे. आपण बरं की आपलं काम बरं. तो ना कोणाच्या अध्यात ना मध्यात. त्याची बायको तशी साधीभोळी पण परिस्थितीनं कावलेली. घरात जेव्हा फाके पडायचे, तेव्हा ती चिडायची, आदळआपट करायची. हुसन्या आणि ममद्या ही त्यांची दोन मुलं. तेदेखील बालसुलभ हट्ट करायचे. आजूबाजूला चांगल्या भारी भरजरी पोशाखातली श्रीमंतांची मुलं त्यांना दिसायची; तेव्हा ते तसाच पोशाख हवा, दागिने हवेत, खेळायला भरपूर खेळणी हवीत असा हट्ट करायचे. आणि मुलांचे साधे हट्टदेखील पुरवता येत नाहीत याचं अब्दुल्लाला वाईट वाटे. तो नशिबाला बोल लावी. अशा वेळी त्याची बायको हमिदादेखील अगतिक होऊन म्हणे, ‘‘नाही माझे मेलीचे हट्ट पुरवता येत, तर नका पुरवू; पण हुसन्या आणि ममद्या यांनी काय पाप केलं आहे? निदान त्यांचे हट्ट तरी पुरवा.’’
‘‘हमिदा! त्यांनी आपल्या गरिबाच्या घरात जन्माला येण्याचं पाप केलं आहे.’’ असं म्हणत अब्दुल्ला दु:खी होई.
दुपारच्या वेळी हारी नदीवर वर्दळ नसे. ती वेळ शांत असे. अशा वेळी जाळ्यात मासे येण्याची शक्यता अधिक, हे लक्षात घेऊन अब्दुल्ला दुपारच्या वेळी मासेमारीकरिता नदीवर जात असे. दुपारच्या वेळी नदीत जाळं टाकून बसायचं. जाळ्यात जे मासे अडकतील त्यापैकी थोडेसे कालवणाकरिता घरी काढून ठेवायचे आणि बाकीचे येतील त्या भावानं विकून टाकायचे. आलेल्या पैशातून मीठ, पीठ, मिरची आणायची मग कोठे पोटोबाशी गाठ पडायची.
ज्या दिवशी मासे मिळत नसत त्यादिवशी उपास घडत असे. रमझानमध्ये असं घडलं, तर उपासाचं पुण्य अनायासेच पदरी पडलं, असं समाधान बिचारा अब्दुल्ला करून घेत असे. अशा वेळी हमिदा त्याला डिवचून बोलायची, ‘‘मासेमारी करता, त्यापेक्षा किताबे पढली असती. तर मगजमारी करून शाही दरबारात आरिफसारखे दिवाण झाले असते तुम्ही.’’
‘‘ममद्याची आई, तू म्हणतेस तसा दिवाणा होऊन किताबांच्या मागे लागलो असतो तर झालोही असतो शाही दरबारात दिवाण. नाही असं नाही; पण मग तुझ्यासारखी अस्मानची ‘हुस्नपरी’ या करंटय़ाला कशी बरं मिळाली असती?’’ आणि हे ऐकलं की ती दोन पोरांची आई कृतक कोपानं लाजून सफरचंदासारखी लाल व्हायची आणि म्हणायची, ‘‘चला, तुमचं आपलं काहीतरीच. बात बदलने में वस्ताद हो आप.’’
असाच एके दिवशी दुपारी अब्दुल्ला नदीवर गेला. आणि जाळं टाकून निवांत बसला. तेवढय़ात त्याला पूर्वेकडून धुळीचे लोट येताना दिसले. आणि लवकरच खूप मोठ्ठं वादळ आपल्या भागात थैमान घालणार आहे; हे त्याच्या लक्षात आलं. बघता बघता वादळ सुरू झालं. झाडं जमिनीला लवून कुर्निसात करू लागली. काही झाडं मोडून खाली पडली आणि पाऊस सुरू झाला. गारा पडू लागल्या. गारांचा मारा चुकविण्याकरिता अब्दुल्ला सैरावैरा धावू लागला. धावताधावता अगतिक होऊन मनाशी म्हणू लागला. ‘‘या अल्ला! आजही कयामत आनी थी?’’
कोठे थांबायचं? आसरा घ्यायचा? अब्दुल्लाला काहीच सुचेना. धावता धावता त्याला एक किल्ल्यासारखा जुनाट पडका वाडा दिसला. वाडय़ात भुताटकी आहे, अशी बोलवा होती. त्यामुळे त्या वाडय़ात कोणीही जात नसे, पण आता दुसरा मार्ग नव्हता. अल्लाचं नाव घेऊन अब्दुल्ला वाडय़ात शिरला आणि वाडय़ातील एका खणात जाऊन बसला.
वादळ आणि पाऊस यांचं तांडव सुरूच होतं. त्याच्या मनातही विचारांचं तांडव सुरू झालं. तो पडका वाडा पाहून अब्दुल्लाला वाटू लागलं, ‘‘हे राजे लोक किती भाग्यवान. त्यांचा शब्द झेलायला सगळे लोक तयार असतात. सुंदर सुंदर बायका, खायला प्यायला भरपूर त्यांची अगदी चंगळ असते. अल्ला! मी काय बरं पाप केलं म्हणून मला गरीब मासेमार व्हावं लागलं?’’ एवढय़ात अब्दुल्लाला कुठून तरी आवाज ऐकू आला. ‘‘काय अब्दुल्ला! तुला राजा व्हावंसं वाटतं ना?’’ अब्दुल्लानं कुतूहलानं आवाजाच्या दिशेनं पाहिलं. लांबलचक पांढरीशुभ्र दाढी असलेली एक भारदस्त व्यक्ती अब्दुल्लाला दिसली. त्या व्यक्तीला पाहिल्यावर अब्दुल्ला मंत्रमुग्ध झाल्यागत भारावलेल्या स्वरात म्हणाला, ‘‘हो ना? हे काय माझं जिणं आहे? मला राजा व्हावंसं वाटलं तर त्यात काय बिघडलं?’’ ‘‘ठीक आहे, तुला राजा व्हायची इच्छा आहे ना? तू राजा होशील.’’ आणि अब्दुल्लाला एकदम जाग आली. त्या वेळी तो विस्मयचकित होऊन आजूबाजूला पाहू लागला. एका सुवर्णपलंगावरील मऊ गाद्यागिरद्यांवर आपण लोळत पडलेले आहोत. सगळीकडे वैभव नुसतं ओसंडून वाहत आहे, असं त्याला दिसलं.
अब्दुल्ला उठून बसला. त्याबरोबर नोकर त्याच्याजवळ तस्त घेऊन धावले. आणि मग त्याच्या लक्षात आलं, अरेच्चा! आपण खरोखरीचेच राजे झालो आहोत. मग काय विचारता खाणं काय पिणं काय! चैनच चैन. हमिदा आता चांगल्या पोशाखात, अलंकारात नटून थटून त्याच्यासमोर आली. अब्दुल्ला मनोमन खूश झाला. तेवढय़ात त्याला मुलांची आठवण झाली. ‘‘हमिदा! अगंऽऽ! आपला ममद्या आणि हुसेन नाही दिसत. कुठं गेले ते?’’ ‘‘ते किनई सरदारांबरोबर शिकार करणं शिकायला गेले आहेत.’’ शिकारीचं नाव ऐकल्यावर घाबरट अब्दुल्ला घाबरला.
तेवढय़ात एक नोकर बातमी घेऊन आला, ‘‘हुजूर! बंदा माफी चाहतो, पण बुरी खबर आहे. आपल्या मुलांना शेजारच्या लोकांनी पकडून नेलं आहे.’’ बातमी ऐकल्यावर अब्दुल्ला दु:खानं बेशुद्ध पडला. शुद्धीवर आल्यावर तो शोक करू लागला. तेवढय़ात सेनापती धावत आला आणि म्हणाला, ‘‘हुजूर! मोठ्ठा घोटाळा झाला. आपल्या मुलांना शेजारच्या राजाच्या सैनिकांनी पकडून नेल्यावर आपल्या सरदारांनी मुलांना सोडविण्याकरिता त्यांच्यावर हल्ला केला, त्यामुळे चिडून जाऊन तो राजा मोठ्ठे सैन्य घेऊन आपल्यावर चालून येत आहे. त्याची ताकद खूपच मोठी आहे, पण त्याला प्रतिकार तर केलाच पाहिजे. आपण सैनिकांसमोर असल्याशिवाय त्यांना स्फुरण चढणार नाही, हे ऐकल्यावर अब्दुल्लाची भीतीनं बोबडीच वळली. तो ‘त.. त.. प..प’ करू लागला. ‘‘क.. क.. काय? मी तुमच्याबरोबर यायचं आणि लढायचं?’’
पण दुसरा पर्यायच नव्हता. त्याला युद्धावर जावंच लागलं आणि युद्धात शत्रुसैन्यानं अब्दुल्लाला पकडलं. त्याच्या मुसक्या बांधून त्यांच्या राजासमोर आणलं. राजानं आज्ञा दिली, ‘‘प्रथम या हरामखोराच्या मुलांची शिरं उडवा आणि नंतर याच्या खुबसूरत बेगमेला माझ्या जनानखान्यात आणून ठेवा.’’
‘‘आणि याचं काय करायचं हुजूर?’’
‘‘याला हत्तीच्या पायाखाली द्या.’’ झालं राजानं ही आज्ञा द्यायचाच काय तो अवकाश? ताबडतोब त्याच्या आज्ञेची तामिली होऊ लागली. अब्दुल्लाच्या पोरांची शिरं उडवून ती भाल्याच्या टोकावर रोवून शत्रूसैनिक बेभान होऊन नाचू लागले. अब्दुल्ला दु:खानं वेडापिसा झाला. ऊर बडवून घेऊ लागला. अब्दुल्लाची बायको दु:खानं गडबडा लोळू लागली. कपाळ बडवून घेऊ लागली. तेवढय़ात शत्रूसैनिक तिला घेऊन फरफटत खेचत नेऊ लागले. त्या वेळी तिचे लांबसडक सोनेरी केस जमिनीवर लोळत होते. एवढय़ात भला मोठा हत्ती अब्दुल्लाच्या रोखानं त्याला चिरडून टाकण्याकरिता धावत येऊ लागला. अब्दुल्लानं जिवाच्या भीतीनं डोळे गच्च मिटून घेतले आणि अब्दुल्ला मनाशी म्हणाला, ‘‘अरेऽऽ! सफेद दाढीवाल्या म्हाताऱ्या तू मला राजा केलेस पण मी मासेमार कोळी होतो, तेव्हाच खरा सुखी होतो. नको मला ते राजपद. अल्ला! मला वाचव.’’
..आणि अब्दुल्लाची मोहनिद्रा नाहीशी झाली. तो अजूनही त्या पडक्या वाडय़ातच बसलेला होता. अचानक आलेलं वादळ, पाऊस आणि अभ्र निघून गेली होती. स्वच्छ ऊन पडलेलं होतं बाहेर आणि अब्दुल्लाच्या मनातही. अब्दुल्लाला स्वत:च्या दु:खी जीवनातल्या सुखाची किंमत कळली होती.
(अफगाणी पुश्तू कथा)