वाक् प्रचाराची गोष्ट : भीष्मप्रतिज्ञा Print

alt

मेघना जोशी , रविवार १९ ऑगस्ट २०१२
शंतनू हा हस्तिनापूरचा राजा होता. तो गंगेच्या प्रेमात पडला. गंगासुद्धा त्याच्याशी विवाहाला कबूल झाली. पण त्यासाठी तिने एक अट घातली, ‘राजन, तुझ्याशी विवाह झाल्यावरही मी स्वच्छंदपणे जीवन जगणार; जेव्हा तू मला विरोध करशील त्याक्षणीच मी तुझा त्याग करीन.’
राजाने ही अट मान्य केली व तो गंगेशी विवाहबद्ध झाला. त्यानंतर त्यांना सात पुत्र झाले. हे सातही पुत्र जन्मताक्षणी गंगा म्हणजे शंतनूची पत्नी गंगानदीला अर्पण करत असे. पुत्रांना असे गंगार्पण करताना पाहून राजाला अतीव दु:ख होई, पण पत्नीची अट आठवून तो गप्प बसे. राणी गंगा आठव्यांदा प्रसूत होऊन पुन्हा तिला पुत्रप्राप्ती झाली. यावेळी मात्र शंतनू राजाला राहवेना, त्याने तो पुत्र नदीला अर्पण करण्यास विरोध केला. तत्क्षणी आपल्या अटीनुसार गंगा अंतर्धान पावली. जाताना सोबत आठव्या पुत्रालाही घेऊन गेली. पुढे काही वर्षांनी हाच पुत्र परत राजा शंतनूकडे आला. त्याचे नाव गंगादत्त, देवव्रत किंवा भीष्म.
तरुण भीष्म परत आला त्याचवेळी त्याचा पिता म्हणजे राजा शंतनू मत्स्यगंधा सत्यवतीवर लुब्ध झाला होता. सत्यवतीशी विवाहाचा प्रस्ताव घेऊन राजा शंतनू तिच्या वडिलांकडे गेला. व्यवसायाने धीवर असलेल्या सत्यवतीच्या पित्याने या प्रस्तावाला ठाम नकार दिला. कारण देवव्रत हा शंतनूचा ज्येष्ठ पुत्र असल्याने त्याचाच शंतनूच्या सर्व संपत्तीवर अधिकार असेल. सत्यवती वा तिचे पुत्र यांना कोणताच अधिकार प्राप्त होणार नव्हता. हे जेव्हा देवव्रत भीष्माला समजले, तेव्हा तो ताबडतोब सत्यवतीच्या वडिलांकडे गेला व त्यांच्यासमोर त्याने प्रतिज्ञा केली, ‘मी कधीही राजसिंहासनावर बसणार नाही. आजन्म अविवाहित व  ब्रह्मचारी राहीन. तुमच्या कन्येच्या मुलाबाळांवर व त्यांच्या मुलाबाळांवर प्राणापलिकडे प्रेम करीन.’
भविष्यात ही प्रतिज्ञा पाळण्यासाठी त्याला खूप त्रास सोसावा लागला. मनाला मुरड घालावी लागली. पण प्रतिज्ञेपासून तो तसूभरही ढळला नाही.
त्यामुळे कोणताही दृढनिश्चय किंवा प्रतिज्ञा करणे व असिधाराव्रताप्रमाणे तिचे पालन  करणे याला ‘भीष्मप्रतिज्ञा करणे’ म्हणतात.