गुरुदक्षिणा Print

alt

म. अ. खाडिलकर , रविवार १९ ऑगस्ट २०१२
पुरातनकाळी आजच्यासारख्या शाळा नव्हत्या. गुरुगृही राहायचं, त्यांच्या घरात पडेल ते काम करायचं आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरुदक्षिणा देऊन घरी परतायचं, अशी त्यावेळी पद्धत होती.
अशाच एका ऋषीकडे काही मुलं अध्ययनासाठी राहिली होती. त्यापैकी दोघांचं शिक्षण पूर्ण झालं होतं. ते गुरुजींना म्हणाले, ‘‘आचार्य आमचं शिक्षण पूर्ण झालं आहे. आम्ही आपला निरोप घेण्यासाठी आलो आहोत. आपली गुरुदक्षिणा किती ते सांगावं.’’ त्यांनी आचार्याच्या पायांवर मस्तक ठेवलं.
आचार्य म्हणाले, ‘‘मला गुरुदक्षिणा काही नको; पण तुमची इच्छा असेल तर मला मिळतील तेवढी वाळलेली पानं गुरुदक्षिणा म्हणून आणून द्या.’’ आचार्याची मागणी ऐकून दोन्ही कुमारांना फार आश्चर्य वाटलं. ‘‘ठीक आहे.’’, असं म्हणून ते दोघं जंगलातून हिंडू लागले.
जंगलात फिरताना एका झाडाखाली त्यांना वाळलेल्या पानांची मोठी रास दिसली. ते त्या राशीतील पानं गोळा करणार इतक्यात एक गृहस्थ धावत त्या ठिकाणी आला. तो म्हणाला, ‘‘मुलांनो, सकाळपासून ही पानं मी वेचली आहेत. ती आता मी जाळणार आहे आणि त्याची राख खत म्हणून माझ्या शेतात वापरणार आहे. म्हणजे पीक चांगलं येईल.’’
ते कुमार पुढे निघाले. काही अंतरावर एका मुलानं बरीच वाळलेली पानं गोळा केली होती. ती पानं तो दोरीनं बांधत होता. त्या कुमारांनी विचारलं, ‘‘या पानांचं तू काय करणार आहेस?’’
तो मुलगा म्हणाला, ‘‘माझे बाबा मोठे वैद्य आहेत. ते या पानांपासून औषध तयार करणार आहेत.’’
कुमार पुढील वाटचाल करू लागले. काही अंतर चालून गेल्यावर त्यांना असं दिसून आलं की, एका झाडाखाली काही पक्ष्यांनी वाळलेली पानं आपल्या चोचीतून आणून गोळा केली आहेत. एका कुमारानं दुसऱ्याला विचारलं, ‘‘पक्ष्यांना ही पानं कशासाठी लागतात?’’
दुसरा म्हणाला, ‘‘अरे, ही पानं त्यांना घरटी बांधण्यासाठी उपयोगी पडतात.’’ काही अंतर चालून गेल्यावर त्यांनी पाहिलं की, दोन स्त्रियांनी बरीच लहानमोठी वाळलेली पानं गोळा केली होती. त्यांनी त्या स्त्रियांना विचारलं, ‘‘या पानांचं तुम्ही काय करणार आहात?’’
पहिली स्त्री म्हणाली, ‘‘मी मोठी पानं गोळा केली आहेत, ती मी माझ्या झोपडीवर टाकणार आहे. त्यामुळे ऊन आणि पाऊस यांपासून आमचं संरक्षण होईल.’’
दुसरी स्त्री म्हणाली, ‘‘मी या पानांचा द्रोण आणि पत्रावळी लावण्यासाठी उपयोग करणार आहे. तो माझा व्यवसाय आहे.’’
ते कुमार पुढे निघाले. त्यांना एक तलाव दिसला. तलावाच्या  काठाला काही वाळलेली पानं पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगताना त्यांना दिसली. एका कुमारानं ती काढण्याचा प्रयत्न केला. पण त्या पानांवर शेकडो मुंग्या होत्या. त्यानं दुसऱ्याला विचारलं, ‘‘मुंग्यांचं इथे काय काम?’’
दुसरा म्हणाला, ‘‘अरे, तलावातून वाहात आलेले कीटक या मुंग्यांना खाऊन टाकतात. पाण्यातील पानं हे या मुंग्यांचं आश्रयस्थान आहे. त्या आणखी थोडय़ा खाली गेल्या तर बुडून मरतील.’’
दोघेही कुमार चालून चालून दमले होते. वाळलेल्या पानांचे अनेक उपयोग आता पाहायला मिळाले, पण आचार्यासाठी वाळलेली पानं ते गोळा करू शकले नाहीत. ते आश्रमाकडे परतले. त्यांनी आचार्याना सर्व घटना निवेदन केली.
आचार्य म्हणाले, ‘‘वाळलेल्या पानांचेसुद्धा किती उपयोग होतात ते तुम्ही पाहिलंत. तुम्ही जे ज्ञान संपादन केलंत आणि मला दिलंत तीच माझी गुरुदक्षिणा. आपणदेखील परोपकारबुद्धी ठेवून इतरांना सर्वतोपरी मदत करावी, हाच माझा तुम्हाला संदेश आहे.’’
आचार्याना वंदन करून कुमार आपापल्या घरी गेले.