प्रयत्नांती परमेश्वर Print

पु. ग. वनमाळी - २६ ऑगस्ट २०१२

एका चिमणीला
लागली तहान,
शोधलं तिनं
डबकं लहान.
    पाणी पिताना
    फिसकला पाय
    डबक्यात पडली
    करावं काय?
पंख भिजल्यामुळे
उडता येईना
बाहेर पडण्याचा
उपाय सुचेना!
    धडपड करून
    शीण आला
    शेवटी दैवावर
    हवाला ठेवला.
इतक्यात तिथं
आला एक बगळा
डोकावून डबक्यात
म्हणाला तिला-
    ‘प्राण वाचविण्यासाठी
    शर्थ कर
    प्रयत्नांती पाठीशी
    असतो परमेश्वर.’
बगळ्याचा सल्ला
चिमणीनं मानला,
बळ एकवटून
झुडपाचा आधार घेतला.
    लांबलचक चोचीनं
    काम फत्ते केलं
    झुडपावरच्या चिमणीला
    बगळ्यानं बाहेर काढलं.