बालजल्लोष Print

लता दाभोळकर - २६ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘त्या एका दिवशी’

माधुरी पुरंदरे यांचं सकस बालसाहित्य बालमनाबरोबरच मोठय़ांनाही समृद्ध करणारं आहे. गोष्टींमधून लहानग्यांचं मन अलवारपणे टिपण्याचं आणि त्यांना उत्तम चित्रांची जोड देण्यात त्यांचा हातखंडाच! लहानांसाठीची त्यांची पुस्तकं मोठय़ांनाही हवीहवीशी वाटतात, वाचावीशी वाटतात. अनोख्या चित्र व लेखनशैलीने मराठी बालसाहित्यात त्यांनी आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. ज्यांना माधुरी पुरंदरेंच्या बालसाहित्याची सफर घडली आहे, अशी मंडळी त्यांच्या नव्या पुस्तकाच्या प्रतीक्षेत असतात.  
‘त्या एका दिवशी’ हे पुस्तकंही त्यांच्या लिखाणातलं अनोखेपण दर्शविणारं आहे. या पुस्तकात ‘त्या एका दिवशी’ आणि ‘मला क्रियापद भेटले तेव्हा..’ या दोन गोष्टी वाचायला मिळतात. ‘त्या एका दिवशी’ या गोष्टीतला गौतम हा वयात येणारा मुलगा. आई-वडिलांवर खूप प्रेम करणारा; परंतु काही कारणास्तव त्यांच्यातील अबोल्यावर दु:खी होणारा, या अबोल्यातून निर्माण झालेल्या त्या दोघांच्या वर्तणुकीवर सखोल विचार करणारा एक संवेदनशील मुलगा. एक दिवस वडिलांबरोबर आत्याकडे जायला निघतो. त्याचा हा प्रवास त्याच्या साहसाचा ठरतो. गौतमचे साहस या गोष्टीतून वाचायला मिळतेच; परंतु त्यातही वयात येणाऱ्या मुलाची मानसिकता, होणाऱ्या शारीरिक बदलांचा त्याच्या तन-मनावर  होणारा परिणाम याची अलवार उकल लेखिका करते. वयात येणाऱ्या मुलाचं हळवं मन अलगदपणे लेखिकेने उलगडलं आहे.
चोराच्या तावडीत सापडलेले वडील आणि स्वत:ची मोठय़ा शिताफीने सुटका करण्यात गौतम यशस्वी होतो. साधी-सरळ अशी ही साहसकथा अनेक पैलू उलगडत जाते. या पुस्तकातीलच ‘मला क्रियापद भेटले तेव्हा..’ ही कथाही सुंदर आहे. खरं तर कथेचे शीर्षक अससेल्या नावाचा निबंध चिन्मयीला तिच्या सरांनी दिला आहे. पण हा काही निबंधाचा विषय झाला? असं म्हणत ती सरांवर थोडी चिडचिड करते. पण तिचा बाबा ‘तू लिहून तर बघ!’ असं तिला समजावणीच्या सुरात सांगतो आणि ती निबंध लिहायला बसते. हा निबंध लिहिता लिहिता तिच्या लहानपणीच्या आठवणींचा पटच उलगडत जातो. या निबंधात मरणे या क्रियापदाची आपल्याला कशी ओळख झाली हे सांगताना त्याच्याशी संबंधित गमतीदार, हळव्या, दुखऱ्या आठवणी ओघानं येऊन जातात आणि त्यातूनच तिचा निबंध साकार होतो. परंतु निबंध लिहून तो सरांना दाखवून आपली पाठ थोपटून घेण्याचा विचार दूर सारून, हा निबंध लिहिताना तिने अनुभवलेला आनंद तिला जास्त मोलाचा वाटतो. कथेतला हा भाग खूपच सुंदर आणि महत्त्वाचा! ही कथा वाचताना चिन्मयीचे आई-वडील आणि चिन्मयी यांच्यातील हळूवार नातंही उलगडत जातं.
या दोन्ही कथांमधून आई-वडील आणि मुलं यांच्यातील नातेसंबंधही अधोरेखित होतं.
‘त्या एका दिवशी’- माधुरी पुरंदरे, पृष्ठे-८७,
मूल्य-७५ रुपये.

‘नीती अनीतीच्या कथा’
नीती-अनीती, सत्य-असत्य यांच्यातल्या सीमारेषा धूसर होत चालल्या आहेत. पैसा, चैन हेच खरं जीवन असल्याचं चित्र आजच्या पिढीसमोर आहे. परिणामी सामाजिक मूल्यांना फारसे महत्त्व उरलेले नाही, अशी एकंदर समाजात परिस्थिती असताना नीती, सत्य, सदाचार अशाा गोष्टींना समाजात मोठे स्थान आहे, हे आजच्या पिढीला प्रकर्षांने सांगण्याची गरज भासू लागली आहे. या पाश्र्वभूमीवर जागतिक स्तरावर विख्यात असलेले कादंबरीकार लिओ टॉलस्टॉय यांच्या नीती-बोध कथांचे ‘नीती अनीतीच्या कथा’ हे अनुवादित पुस्तक नुकतेच बाजारात आले आहे. ‘आयुष्य व साहित्य दोन्हींमधेही ‘सत्य’ ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे’, अशी त्यांची धारणा होती आणि याच धारणेतून लिहिल्या गेलेल्या कथा या पुस्तकात आहेत. या कथांचे भाषांतर श्रीनिवास पंडित यांनी केले आहे. मुलांना नीतिमूल्ये सांगणाऱ्या या कथा वाचनीय आहेत.
‘नीती अनीतीच्या कथा’- लिओ टॉलस्टॉय- भाषांतर- श्रीनिवास पंडित,  पृष्ठे-१०४,
मूल्य- ८० रुपये

‘इरावतीच्या गोष्टी’
ही कथा आहे तुमच्यासारख्याच गोष्ट ऐकायला आवडणाऱ्या चार वर्षांच्या इराची म्हणजेच इरावतीची! तिला रोज नवनवीन गोष्टी ऐकायला हव्या असायच्या आणि त्याही साग्रसंगीत! त्या गोष्टींना शॉर्टकट नसे. आणि रोज इतक्या गोष्टी आणणार कुठून? मग तिच्या बाबानंच गोष्टी तयार केल्या आणि या गोष्टींमध्ये तिच्याच अवती-भवतीचा परिसर, माणसं, त्यांचं जगणं आलं. या कथेतल्या इरावतीला नऊ वर्षांचा भाऊ आहे- ईशान. त्याला पुस्तकं वाचायला आवडायची. इरालाही पुस्तकं हवी असायची. प्रवासाच्या गोष्टींची ती पुरती वेडीच! या गोष्टींचा प्रवास कधी शहरातला तर कधी गावांमधला. गावांमधला प्रवास वाचताना खूपच धमाल येते. तिथले प्राणी, निसर्ग या गोष्टींमधून भेटतात.
‘इरावतीच्या गोष्टी’- श्रीनिवास पंडित,
ऊर्जा प्रकाशन, मूल्य-४५ रुपये.

‘घरटय़ाकडे.. घराभोवती’
रशियन लेखक विताली बिआंकी यांच्या ‘घरटय़ाकडे.. घराभोवती’ हे श्रीनिवास पंडित यांनी अनुवादित केलेलं पुस्तक हातात येतं; तेव्हा मुखपृष्ठावरील चित्रावरूनच ते अनोखं असल्याचं जाणवतं. रशियन चित्रकार माय मितूरिच यांची चित्रे आणि विताली बिआंकी यांच्या गोष्टी यांचा अनोखा मेळ या पुस्तकात साधला गेला आहे. या कथांमध्ये प्राणी, पक्षी भेटतात. आपल्या घराचा निवारा किती आस्वस्थ करतो, याचीच प्रचिती ‘घरटय़ाकडे’ या कथेत येते. आपलं घरटं आणि पिल्लं यांना बोका आणि अन्य प्राण्यांपासून वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या चिमणा-चिमणी ‘चिक-चिरीका’ या कथेत भेटतात, तर ‘मुंगळ्यांची सफर’ या कथेत  सूर्योदयापूर्वी आपल्या वारुळात परतण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंगळ्यांची मजेशीर गोष्ट वाचायला मिळते.
या गोष्टींत प्राणी-पक्ष्यांचं जीवन पाहायला मिळतंच; त्याचबरोबर त्यांचं जीवन, त्यांच्या घरटय़ांचे प्रकार, वन्य जीवन याविषयींची माहितीही ओघानं या गोष्टींमधून येते.  हेच पुस्तक इंग्रजीतही (‘माय नेस्ट माय होम’) उपलब्ध आहे. या पुस्तकात लेखक व चित्रकाराचा छोटोखानी परिचय करून दिला असता तर योग्य झालं असतं.
‘घरटय़ाकडे.. घराभोवती’, विताली बिआंकी, पृष्ठे- ३५, मूल्य- ४० रुपये.