‘गोष्ट पावसाची’ Print

लता ,रविवार,२ सप्टेंबर २०१२

पावसाविषयीचे आपल्या हवामान खात्याचे अंदाज नेहमीच हास्याचा विषय ठरतात. परंतु निसर्गाने या पावसाचा अंदाज वर्तविण्याची सोय केली आहे, याचं गुपित उलगडलं आहे ‘गोष्ट पावसाची’ हे विलास गोगटे यांच्या पुस्तकात. यंदा पाऊस कसा पडणार, कधी पडणार याच्या सूचना निसर्ग आपल्याला देत असतो,  परंतु त्याकडे पाहण्याची क्षमता आपल्यात नाही, कारण आपण निसर्गापासून अधिकाधिक दूर चाललो आहोत. अनेकदा आपले आजी-आजोबा वातावरणातील बदलामुळे किंवा विशिष्ट पक्षी-किडय़ांच्या हालचालींवरून ‘पाऊस पडेल हो’ असा अंदाज वर्तवितात तेव्हा आपण त्याकडे कानाडोळा करतो. पण अनेकदा त्यांचं भविष्य खरं ठरतं आणि आपल्याला मात्र त्यातली नेमकी गोम कळत नाही. विलास गोगटे यांचं पुस्तक या गोष्टींचा उलगडा करतं. पाऊस पडणार की नाही,  किती पडेल याबाबत सांगातानाच लेखक निसर्गातल्या अनेक मजेशीर गोष्टींची ओळख करून देतात. लेखक भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. शास्त्रज्ञ म्हणून काम करताना त्यांना मिळालेल्या सखोल ज्ञानाचा पुरेपूर उपयोग या गोष्टींमध्ये केला आहे. या गोष्टी लहानग्यांना वाचायला व ऐकायला आवडेल अशा रसाळ भाषेत लिहिल्या आहेत. प्रयोग, प्रात्यक्षिकं यांच्या माध्यमातून निसर्ग उलगडून दाखविण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. लहानग्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं या गोष्टींमधून मिळतात. पक्षी-प्राण्यांमुळे हवामानाचा अंदाज कसा येतो, पावसाशी निगडित त्यांच्या कृती यांची माहिती लेखक देतात. ही माहिती वाचून आपल्याला थोडी गंमतही वाटते आणि अचंबाही! लेखकाने यामागची शास्त्रीय कारणेही नमूद केली आहेत. आवर्जून वाचावं आणि निसर्गाच्या किमयेमागं दडलेलं विज्ञान समजून घ्यावं, यासाठी हे पुस्तक महत्त्वाचं ठरतं. सध्या पावसानं ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकरीच नव्हे तर शहरातली मंडळीही त्याच्या वाटेकडे आस लावून बसली आहेत. मग बच्चेकंपनींनो या पुस्तकात सांगितल्याप्रामणे पावसाचे भविष्य वर्तविणाऱ्या  पक्षी-किटकांच्या मागावर राहा, त्यांचे निरीक्षण करा आणि पावसाचा अंदाज घ्या.
‘गोष्ट पावसाची’- विलास गोगटे, पृष्ठे- २६ , मूल्य- ३५ रुपये.

‘करामती गुगी’, ‘भटक बहाद्दर’
विद्या डेंगळे यांची ‘करामती गुगी’ आणि ‘भटक बहाद्दर’ ही दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. लाघवी, प्रेमळ पण थोडासा बावळट असलेल्या गुगीच्या करामती वाचताना त्याच्या बावळटपणावर हसता हसता तुम्ही त्याच्या प्रेमातही पडता. ‘भटक बहाद्दर’ या पुस्तकातही प्राण्यांच्या गमतीशीर गोष्टी वाचायला मिळतात. या गोष्टी मुलांचं चांगलंच मनोरंजन करतात.
‘करामती गुगी’- विद्या डेंगळे, पृष्ठे- ४४, मूल्य- ४० रुपये. ‘भटक बहाद्दर’- विद्या डेंगळे, पृष्ठे- ३१, मूल्य- ३५ रुपये.
(पावसाची गोष्टी, करामती गुगी,  भटक बहाद्दर, त्या एका दिवशी, नीती अनीतीच्या कथा, इरावतीच्या गोष्टी, घरटय़ाकडे.. घराभोवती ही सर्व पुस्तके ऊर्जा प्रकाशनाने प्रकाशित केली आहेत. )