वाक्प्रचाराच्या गोष्टी : श्रावणबाळ असणे Print

मेघना जोशी ,रविवार,२ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

अनेक वर्षे काशीयात्रेला जाऊन पुण्य मिळविण्याची सुप्त इच्छा मनात बाळगून असणाऱ्या आपल्या आईवडिलांची ती इच्छा पूर्ण करण्याचा श्रावणाने चंगच बांधला होता. त्या काळी काशीयात्रा हे अत्यंत अवघड काम होते. त्यासाठी मैलोन्मैल प्रवास करावा लागे, तोसुद्धा पायी. पण श्रावण जिद्दीलाच पेटला होता. त्याने एक कावड घेतली. तिच्या दोन्ही पारडय़ात आई आणि वडिलांना बसवले आणि आपल्या वृद्ध आणि दोन्ही डोळ्यांनी अंध अशा माता-पित्याचे काशीयात्रेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो कावड खांद्यावर घेऊन मजल-दरमजल करत निघाला.
प्रवास करता करता एक दिवस तो शरयू नदीच्या काठी पोहोचला. सूर्य तळपत होता. अंगाची लाही-लाही होत होती. तिघेही तहानेने व्याकूळ झाले होते. मात्या-पित्याची तहान भागवण्यासाठी त्यांना झाडाच्या सावलीत बसवून श्रावणबाळ नदीच्या दिशेने निघाला. त्याने नदीच्या पाण्यात मोगा (मातीचा छोटा लोटा) बुडवला. त्या बुडबुड आवाजाने जवळच्या झुडूपात लपलेला राजा दशरथ सावध झाला. मृगयेसाठी आलेला दशरथ सावज टिपण्यासाठी उतावळा झाला होता. त्याने आवाजाच्या दिशेने सर्रकन् बाण सोडला. बघता बघता बाणाने श्रावणाचा वेध घेतला. बाण श्रावणाच्या वर्मी लागला आणि त्याच्या किंकाळीने आसमंत भेदून गेले. माणसाची किंकाळी ऐकून राजा दशरथ हादरलाच. किंकाळीच्या दिशेने धावला. जखमी श्रावण दृष्टीस पडताच तो गडबडला. पण वेळ निघून गेली होती, बाण वर्मी लागला होता. पण या स्थितीतही श्रावणबाळ मातापित्यांना विसरला नव्हता. मृत्यूला कवटाळतच तो दशरथाला म्हणाला, ‘हे राजा, माझ्या मात्या-पित्यांना पाणी दे, मगच त्यांना माझ्या मृत्यूची वार्ता सांग.’
राजा पाण्याचा मोगा घेऊन त्या वृद्ध माता-पित्याजवळ पोहोचला. निशब्दपणे त्यांना पाणी पाजले. पण साशंकतेने ते पुन्हा पुन्हा चौकशी करू लागल्यावर दशरथाने सत्य कथन केले. ते ऐकून ‘तू असाच पुत्रशोकाने हळहळून मरशील.’ असा शाप देत ते वृद्ध जोडपे गतप्राण झाले. तेव्हापासून प्राणार्पण करावे लागले तरी आई-वडिलांच्या सेवेपासून न ढळणाऱ्या पुत्राला ‘श्रावणबाळ ’ म्हटले जाते.