खेकडय़ाची चाल Print

मृणाल तुळपुळे ,रविवार,२ सप्टेंबर २०१२

लाल समुद्राकाठच्या कपारीत बरेच खेकडे राहात असत. त्यात चार-पाच लहान खेकडे होते. ते नेहमी वाळूत लपाछपी आणि पकडापकडी खेळत. तिथे सापडणारे लहान लहान किडे शोधणे, हा तर त्यांचा अगदी आवडता उद्योग होता.एके दिवशी लहान खेकडे वाळूत खेळत असताना त्यांची आई-असमा त्यांचा खेळ बघत उभी होती. तेवढय़ात तिचे लक्ष पाण्याच्या दिशेने चाललेल्या बगळ्याकडे गेले. तो बगळा आपल्या लांब पायांची लयबद्ध हालचाल करत चालत होता. त्याच्या मागोमाग त्याची तीन लहान लहान पिलेही तितक्याच रुबाबदारपणे चालत होती. असमा त्यांच्याकडे बघतच राहिली. तिच्या मनात आले, हे सगळे बगळे किती सुंदर दिसतायत आणि ते चालतायत तरी किती डौलदारपणे! असमा बगळ्यांच्या कौतुकात रंगली असतानाच समोरून तिची तिन्ही मुले वाकडी वाकडी चालत तिच्याकडे येत होती. त्यांचे ते वाकडे तिकडे चालणे बघून ती अगदी वैतागली. तिला वाटले की, आपली ही मुले किती बेढब दिसत आहेत. चालतायत तरी कशी वाकडी तिकडी, एखादं पोतं हलावं तशी. ती मनातून खूप खट्ट झाली. मुले जवळ आल्यावर ती त्यांच्यावर खेकसली ‘‘अरे तुम्ही दोघे असे काय अजागळासारखे चालताय? तुम्ही तुमची ही बेढब आणि एका बाजूला वाकून तिरकं चालण्याची पद्धत बदला आणि सगळेच्या सगळे सरळ रेषेत नीट चालायला शिका. तुमच्या चालण्यात त्या बगळ्यांसारखा डौलदारपणा येऊ दे’’.
त्यावर मुले म्हणाली ‘‘अगं आई, आम्हाला तू म्हणतेस तसे सरळ कसे चालता येईल?’’ ते ऐकून असमा त्यांच्यावर चिडली व म्हणाली,  ‘‘प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला सरळ चालता येईल.’’  दोघांनी आईचे ऐकून सरळ चालायचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना काही ते जमले नाही. मग अगदी रडवेली होऊन ती म्हणाली ‘‘ आई, तू शिकव ना आम्हाला सरळ कसे चालायचे ते.’’
असमा पुढे सरसावली आणि आपल्या मुलांना सरळ चालायला शिकवू लागली. तिनेही खूप प्रयत्न केले, पण व्यर्थ! अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर तिला आपली चूक उमगली. तिच्या लक्षात आले की, आपले पाय काही बगळ्यासारखे लांब आणि डौलदारपणे चालण्यायोग्य नाहीत. मग तिने सरळ चालण्याचा नाद सोडून दिला.
असमा आपल्या मुलांना जवळ घेऊन म्हणाली, ‘‘मी उगाचंच तुमच्यावर रागावले. निसर्गाने आपल्याला जे दिले आहे ते सोडून दुसऱ्याचे अनुकरण करणे बरोबर नाही. बगळ्याची चाल जशी डौलदार आहे तशी आपली तिरकी आहे. आपण तर असे तिरके आणि वाकडे चालणारे म्हणूनच ओळखले जातो. त्याचाच आपण अभिमान बाळगला पाहिजे.’’
(अरेबिक कथेवर आधारित)