सीमोल्लंघन Print

रविवार,२१ ऑक्टोबर २०१२

हर्ष उल्हासाचा
नूतन वस्त्रांचा
शुभ आरंभाचा
सण मोठा

मनामनातली
स्वप्ने करू मूर्त
उत्तम मुहूर्त  
दसऱ्याचा

साजरी करू या
जय परंपरा
विजयी दसरा
सन्मानाचा

देऊ आलिंगने
अतीव प्रेमाने
वाटूयात पाने
आपटय़ाची

शस्त्रास्त्र पूजन
थोरांना वंदन
नव संक्रमण
मांगल्याचे

असुराचा नाश
करतो दसरा
पराक्रमी धरा
भारतीय

षड्विकारांचे
करू सीमोल्लंघन
चारित्र्यसंपन्न
घडवूया